आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

MahaElection : ज्यांना शेतीतील काहीच अनुभव नाही ते निघाले आता मुख्यमंत्री व्हायला; अजित पवारांची टीका

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव - ‘ज्यांना शेतीतले काही कळत नाही ते मुख्यमंत्री आहेत. तर ज्यांना काहीच अनुभव नाही ते मुख्यमंत्री व्हायला निघाले आहेत’, असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी देवेंद्र फडणवीस व आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. 

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा शेवगावात आल्यानंतर तेथील सभेत पवार बोलत होते. खासदार डॉ. अमोल काेल्हे, माजी आमदार नरेंद्र घुले व पांडुरंग अभंग, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अविनाश आदिक, प्रदेश युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख अादी उपस्थित हाेते. 

‘राज्यातील जनता पुरात अडकलेली असताना मुख्यमंत्री प्रचारात आहेत. काही ठिकाणी पूर परिस्थिती, तर काही ठिकाणी कमी पाऊस. नैसर्गिक आपत्तीत मदत करण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे, परंतु या सरकारच्या डोक्यात सत्तेची मस्ती शिरली आहे. लोकशाहीची थट्टा यांनी चालवली असून प्रसार माध्यमांची मुस्कटदाबी ते करत अाहेत’, असा आरोप पवार यांनी केला. या सरकारने कुठल्याही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. योजना द्यायची, पण अशी मेख मारायची की लाभ मिळायलाच नको, असे सरकारचे धोरण आहे. वेगवेगळ्या चौकशा व कारवाईची भीती दाखवून अनेकांना पक्षांतर करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. तीन हजार कोटी खर्च करून सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा सरकारने उभारला, मात्र ज्या छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन मते मागितली, त्यांचे  व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मात्र साधा दगडसुद्धा बसवला नाही, अशी टीका त्यांनी केली.
खासदार अमाेल कोल्हे म्हणाले, ‘महाराष्ट्रात महाजनादेश व जनआशीर्वाद अशा लादलेल्या दोन यात्रा सुरू आहेत. आमची शिवस्वराज्य यात्रा रयतेचे राज्य आणण्यासाठी आहे. ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ अशा जाहिराती करून सत्तेवर आलेल्या युती सरकारने जातीपातीत विष पेरण्याचे काम केले. मागील पाच वर्षांत यांनी महाराष्ट्र खड्ड्यात नेऊन घातला. एक बुरुज ढासळल्याने किल्ला कधी पडत नसतो, अशा शब्दांत कोल्हे यांनी राष्ट्रवादीतून होत असलेल्या पक्षांतराबाबत भाष्य केले. आगामी काळात जनतेच्या पाठबळावर पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. नव्या स्वराज्याचा हा नवा लढा असून नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले. सभेपूर्वी शहरातील प्रमुख मार्गावर रोड शो करत डॉ. कोल्हे यांनी युवकांशी संवाद साधला
 
 

0