आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MahaElection : विधानसभा निवडणूक अशाेक चव्हाणांची सत्त्वपरीक्षा पाहणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची चोहोबाजूने कोंडी करण्याची व्युह-नीती आखण्यात आल्याने त्यांच्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक सत्त्वपरीक्षा ठरणार आहे. माजी आमदार व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब गोरठेकर यांचा भाजप प्रवेश त्याच एक रणनीतीचा भाग असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 


नांदेड मतदार संघात अशोक चव्हाणांचा पराभव होऊच शकत नाही अशी ठाम समजूत लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस कार्यकर्त्याची होती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय चातुर्य दाखवत प्रताप पाटील चिखलीकरांना त्यांच्या विरोधात लढवून चव्हाणांचाही पराभव होऊ शकतो हे दाखवूून दिले. त्यावेळी चव्हाण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही होते. आजपर्यंतच्या जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात चव्हाण म्हणतील तीच पूर्व दिशा असे समीकरण होते. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर ही समीकरणे बदलली. प्रताप पाटील चिखलीकर यांनी पॉलिटिकल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून सर्व चव्हाण विरोधकांना एका छताखाली आणले. त्याचा पहिला प्रयोग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झाला. त्याच आधारावर लोकसभेतही तोच फाॅर्म्युला राबवून चिखलीकरांनी चव्हाणांवर मात केली. चव्हाणांसारख्या दिग्गज उमेदवारांचा पराभव करून मिळवलेला विजय चिखलीकरांना भाजपमध्ये पुढच्या रांगेत बसवणारा ठरला. आता त्यांनी आपले लक्ष विधान सभेवर केंद्रित केले आहे. 
चव्हाणांची सत्त्वपरीक्षा  : अशोक चव्हाण आता प्रदेशाध्यक्ष नाहीत. सत्तेचे कोणतेही पद त्यांच्याकडे नाही. जिल्हा परिषद व महानगर पालिका हीच दोन बलस्थाने त्यांच्याकडे राहिली आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने कार्यकर्तेही खचून गेली आहेत. त्यात त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याची व्यूह-नीती भाजपने आखली आहे. लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला मारक ठरलेली वंचित बहुजन आघाडी विधान सभेच्याही सर्व जागा लढवणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही मतविभाजनही मोठ्या प्रमाणात होणार हे निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यस्तरावरच मोठी गळती लागल्याने थेट विधानसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादीची स्थिती काय असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे चव्हाणांना दमदार मित्र पक्षाची साथ मिळणेही अवघड आहे. चोहोबाजूने अशी सगळी संकटाची वादळे घोंघावत असताना चव्हाणांना किल्ला लढवावा लागणार आहे. 

 

कुणी मदतीलाही नाही
राज्यस्तरावर अशोक चव्हाणांशिवाय दुसरा मासबेस नेताही काँग्रेस जवळ नाही. त्यामुळे स्वपक्षातूनही फार मोठी मदत त्यांना मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे विधानसभेचा किल्ला त्यांना एकाकीच लढवावा लागणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई असून त्यांची सत्त्वपरीक्षा पाहणारी ठरणार आहे.