MahaElection / MahaElection : आमचं ठरलंय; युतीबाबत शहा, मुख्यमंत्र्यांसोबतच चर्चा, उद्धव ठाकरे यांची माहिती

जागावाटपाच्या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांची माहिती

Aug 29,2019 08:27:00 AM IST

मुंबई - आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना युतीतच लढणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी युती जाहीर करतानाच भाजप अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझे विधानसभेसाठी युती करण्याचेही ठरले होते. स्वतः मुख्यमंत्र्यांनी ब्ल्यू सी हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत युतीबाबत जाहीर केले आहे. त्यामुळे युतीच्या मनोमिलनावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात काहीही अर्थ नाही. आमचं ठरलं आहे. त्यामुळे या चर्चेला काहीही अर्थ नाही. तसेच बाकीच्या चर्चेला (चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबत) अर्थ नाही, जे काही असेल ते तुमच्या माध्यमातूनच सांगणार आहे. आमच्या सर्वांच्या साक्षीने पुढची युती होईल, असे याआधी स्पष्ट केले आहे, अशी प्रतिक्रिया युतीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिली.


साेपल, मानेंनी बांधले शिवबंधन
बुधवारी सोलापुरातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल आणि काँग्रेस कार्यकर्ते नागनाथ क्षीरसागर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसांत आणखी काही जण शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

राष्ट्रवादीचे भास्कर जाधवही शिवसेनेत जाणार
उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही ज्या कुणाला पक्षात घेत आहोत, त्यांना कुठेही अंधारात ठेवून किंवा माहिती न देता पक्षात घेत नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले असून कार्यकर्ते आणि कुटुंबीय यांच्याशी बोलून शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे भास्कर जाधव यांनी बुधवारी स्पष्ट केले. त्यावरून तेही लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत हे स्पष्ट होत आहे.

X