आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MahaElection: What Is Going On In The Coalition: Who Is The Chief Minister? That's The Talk

MahaElection : युतीत चाललंय काय : जागावाटप अन‌् मुख्यमंत्री कुणाचा? याचीच चर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्य मराठी विशेष - २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत भांडभांड भांडलेले भाजप-शिवसेना काही महिन्यांतच सत्तेत एकत्र आले, मात्र तरीही त्यांच्या कुरबुरी सुरू हाेत्या. मात्र २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीपूर्वी दाेन्ही पक्षांनी जुळवून घेत फिफ्टी- फिफ्टी फाॅर्म्युला मान्य केला. त्यानुसार लाेकसभा निवडणुकीत तर ठरल्यानुसार सर्व काही सुरळीत पार पडलं. मात्र खरी गाेम आहे ती विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाची. त्याबाबत सेना व भाजपचे नेते आजवर माध्यमांशी बाेलताना वेगवेगळे दावे करत आले आहेत.
 

भाजपच मोठा भाऊ
यंदाच्या लाेकसभा निवडणुकीचा निकाल पाहता राज्यात भाजपच माेठा भाऊ आहे. शिवसेनेच्या जागा निवडून आणण्यासाठी आम्हीच प्रयत्न केला. लाेकसभेला जिथे शिवसेना कमकुवत हाेती, तिथे आम्हीच मदत केली. सर्वांची भावना आहे की भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा.
- गिरीश महाजन, जलसंपदामंत्री
 

प्रत्येकी १३५ जागा
महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण जागा २८८ आहेत. त्यापैकी १८ जागा महायुतीतील छाेट्या मित्रपक्षांना दिल्या जातील. जागावाटपाच्या सूत्रानुसार उर्वरित २७० जागांपैकी प्रत्येकी १३५ जागा भाजप व शिवसेना उमेदवार लढवतील. मुख्यमंत्रिपदाबाबत मात्र अद्याप काही ठरलेले नाही.
- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री
 

सेना १४५ जागा लढवेल
शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार विधानसभेच्या २८८ जागा लढवतील, त्यापैकी १४५ जागा शिवसेना लढवेल. मुख्यमंत्रिपद हेदेखील समसमान राहणार आहे. शिवसेनेकडे हे पद आल्यावर त्यावर आदित्य ठाकरे असतील, अशी पक्षात व जनतेत लाेकभावना आहे.
- संजय राऊत, प्रवक्ते तथा राज्यसभा खासदार, शिवसेना
 

शिवसेनेकडून आदित्यचे ब्रँडिंग
युतीच्या जागावाटप फाॅर्म्युल्यात सीएमपदासह सर्वच प्रमुख मंत्रिपदांचे फिफ्टी-फि‌फ्टी वाटप ठरल्याचे सेनेचे नेते सांगत आहेत. सेनेकडून आदित्य ठाकरे यांना जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभर जनतेत फिरवले जात आहे. तेच उद्याचे मुख्यमंत्री असतील, असेही दावे केेले जात आहेत. ‘जनतेच्या मनात असेल तर आपण मुख्यमंत्री व्हायला तयार आहाेत,’ अशी प्रतिक्रियाही आदित्य यांनी दिली हाेती.
 

पुढचाही मुख्यमंत्री मीच : फडणवीस
‘मी एकट्या भाजपचा नव्हे तर शिवसेना व इतर मित्रपक्षांचाही मुख्यमंत्री आहे. कुणी काही बाेलले म्हणून मुख्यमंत्रिपद ठरत नसते. काही लाेकांना बाेलायची खुमखुमीच असते. मित्रपक्षाकडे खुमखुमी असणारे थाेडे जास्तच आहेत, आपल्याकडेही काही आहेत. पुन्हा मीच मुख्यमंत्री हाेणार हे यापूर्वीच मी सांगितलेले आहे,’ अशी प्रतिक्रिया सीएम देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावरील चर्चेत दिली हाेती.
 

जागावाटप- मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा मात्र सावध पवित्रा
उद्धव ठाकरे यांनी मात्र अद्याप काेणतेही जाहीर भाष्य केलेले नाही. फडणवीस- ठाकरेंमध्ये उत्तम समन्वय आहे. त्यामुळे काेणी कितीही दावे केले तरी दोन्ही नेते याेग्य वेळी याेग्य ताेडगा काढतील, अशी चर्चा आहे. दुसरीकडे मात्र दाेन्ही पक्ष आपापल्या जागांवर ठाम असल्यामुळे जागावाटपावरून २०१४ प्रमाणे पुन्हा युती दुभंगेल, असाही अंदाज काही विश्लेषक वर्तवत आहेत.