आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापैठण - छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन भाजप सत्तेवर आला. आता मात्र मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेशमध्ये छत्रपतींचे नावही घेतले जात नाही. शिवसेनाही फक्त महाराजांचे नाव घेते. काम मात्र काहीच करत नाही. शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा निघते. त्यांना राज्यातील पूरपरिस्थिती, दुष्काळ दिसत नाही का. राज्यातील देशातील वाढती बेकारी, रोजगार प्रश्न, दहा लाख कंपन्या बंद पडल्या यावर ते काही बोलत नाही. मात्र आता मतदारांनी यांच्या ज्या यात्रा निघाल्या त्याच रोखल्या पाहिजेत. त्यांना जाब विचारला पाहिजे, असे मत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज पैठण तालुक्यातील बालानगर येथे बोलताना व्यक्त केले. डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थित राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्यच्या दुसऱ्या टप्प्यातील यात्रेला आज पैठणमधून सुरुवात झाली.
संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन या यात्रेला प्रारंभ झाला. यात माजी उप मुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आदी सहभागी होते. बालानगर येथील सभेत माजी आमदार संजय वाघचौरे, विक्रम काळे, कदीर मौलाना, अप्पासाहेब निर्मळ, कैलास पाटील. रवींद्र शिसोदे, अनिल घोडके यांची उपस्थिती हाेती.
आवाज उठवला की ईडीची नाेटीस : धनंजय मुंडे
राज ठाकरे यांनी सरकारविराेधी अावाज उठवला. त्यांना काल इडीने नाेटीस दिली. पण तुम्ही आमचा आवाज दाबू शकणार नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले.
आता दळभद्री सरकार नको :
शिवसेना केवळ शिवाजी महाराजांचे नाव घेते. मात्र मराठा समाजातील एवढे मोर्चे निघाले असताना त्यांची मुक्का मोर्चा, अशी चेष्टा केली. हे दळभद्री सरकार आता कोणालाच नको अाहे, असे सांगत अजित पवार यांनी या सरकारला सत्तेवर येऊ देउ नका, असे आवाहन केले. या वेळी माजी आमदार संजय वाघचौरे, अप्पासाहेब निर्मळ, धोंडीराम पुजारी, रवींद्र शिसोदे, रेवण कर्डीले, उमेश पंडुरे, विशाल वाघचौरे, जितू परदेशी, अक्षय पाटील, अनिल हजारे, भाऊसाहेब तरमळे, गोविंद शिंदे, गोपीनाथ गोर्डे, विजय गायकवाड, बजरंग लिंभोरे, ज्ञानेश घोडके, विलास निर्मळ, सुषमा खडसन यांच्यासह राष्ट्रवादी चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुराचे थैमान; मुख्यमंत्री प्रचारात
बदनापूर | महाराष्ट्रातील २२ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला याचा विचार करण्याची गरज आहे. असंवेदनशील असलेले मुख्यमंत्री ३ ऑगस्टपासून पुराने थैमान घालणे सुरू केलेले असताना ७ ऑगस्टपर्यंत प्रचार सभा घेत फिरत होते. लाटेत ओंडकेही तरंगतात. मात्र पडत्या काळात साथ देणारे सर्व सहकाऱ्यांच्या साथीने व गोरगरीब शेतकऱ्याच्या विकास व्हावा, यासाठी ३५० वर्षानंतरही रयतेचे राज्य यावे, यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. दरम्यान, आमचा आमदार झाल्यास बदनापूरमध्ये तात्काळ बसस्थानक तयार करु, असे आश्वासनही खासदार अमोल कोल्हे यांनी याप्रसंगी दिले. शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात बदनापूर येथील बालाजी गल्लीत झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश टोपे, माजी आमदार अरविंद चव्हाण, विक्रम काळे, प्रदीप सोळुंके, बबलू चौधरी आदींसह तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
नेत्यांचीच मेगा भरती :
या वेळी धनंजय मुंडे म्हणाले की, महाराष्ट्रात ७२ हजार पदांची मेगा भरती करण्याऐवजी या सरकारने दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांची भरती केली.
सेल्फीच्या घोळक्यात अमोल कोल्हे अडकले
संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अभिनेते व खासदार अमोल कोल्हे यांच्या बरोबर सेल्फी घेण्यासाठी तरुणांची एकच गर्दी झाली. तोपर्यंत अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा पैठण शहराच्या बाहेर पडला. मात्र डॉ. अमोल कोल्हे चाहत्यांच्या गराड्यातच अडकले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.