आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MahaElection : मुख्यमंत्र्यांनी रथावर चढण्यासाठी दिलेला हात आमदार सत्तारांना तारणार का?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेदरम्यान आ.अब्दुल सत्तार यांना रथावर घेण्यासाठी पुढे केलेला हात सत्तारांना भाजपत नेणार की भाजपमधील कार्यकर्त्यांचा  विरोध लक्षात घेता त्यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागणार, हा चर्चेचा विषय झाला आहे. काहीही घडले तरी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात सत्तार यशस्वी झाले आहेत. 

 आ.अब्दुल सत्तार यांचे भाजपशी जवळीक साधण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न व त्यांच्या प्रयत्नांना भाजपचे कार्यकर्ते करीत असलेला तीव्र विरोध हाच सध्या मतदार संघात चर्चेचा विषय आहे. दोन टर्म म्हणजे दहा वर्षे आ. सत्तार सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. १९९९ पासून त्यांची लढत भाजपशीच राहिली आहे. २००९ व २०१४ या दोन्ही निवडणुकीत त्यांनी भाजपच्या सुरेश बनकरांना पराभूत केले. परंतु त्यापूर्वी १९९९ व २००४ च्या निवडणुकांमध्ये अनुक्रमे भाजपच्या किसनराव काळे व सांडू पाटील लोखंडे यांनी सत्तारांना पराभूत केले होते. १९९९ चीच परीस्थिती आज निर्माण झाली आहे. त्यावेळीही त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. आज ते पुन्हा त्याच वाटेवर आहेत. आ.सत्तार हे भाजपचे कायम विरोधक राहिले आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांच्या भाजप प्रवेशासह भाजपशी जवळीक साधण्यालाही तीव्र विरोध अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपमधील इतर नेत्यांशाी अा. सत्तार यांची असलेली सलगी कार्यकर्त्यांना खटकते. या लोकसभा निवडणुकीत केली तशी त्यावेळीही सत्तारांनी भाजपला लोकसभा निवडणुकीत अप्रत्यक्ष मदत केली होती. यावेळी सरळसरळ प्रत्यक्ष मदत केली हाच काय तो फरक आहे. मागच्या काही वर्षांमध्ये हे साटेलोटे उघड झाल्यामुळे मतदारसंघातील कट्टर हिंदुत्ववाद कमी झाला व त्याचा सत्तारांना फायदा होत गेला. २००९ पर्यंत तिरंगी लढतीचा फायदा भाजपला झाला. तसाच त्यानंतर तो सत्तारांना होतो आहे. 
 

दलित-मुस्लिम सत्तारांची व्होटबँक
या मतदार संघात एकूण  ३ लाख १७ हजार २१६ मतदार असून साधारणपणे एक लाख पाच हजारापर्यंत मराठा, ओबीसी एक लाखाच्या जवळपास, मुस्लिम सत्तर हजार, दलित वीस तर अन्य मतदार पंधरा हजार अशी सर्वसाधारण विभागणी आहे. आजपर्यंतच्या निवडणुकीचा अनुभव पाहता दलित-मुस्लिम मतदान मोठ्या प्रमाणात सत्तार यांना मिळालेले आहे. एकूण मराठा मतदानाच्या पंधरा  व ओबीसीच्या पंधरा टक्के मतदान व अन्य मतदान मिळाल्याने २०१४ च्या निवडणुकीत आ.सत्तार यांना ९६ हजार ३८ मते मिळाली होती. विशेष म्हणजे त्यावेळीही मोदी लाट होती. भाजपच्या सुरेश बनकरांना ८२ हजार ११७ व शिवसेनेच्या सुनील मिरकरांना १५ हजार ९०९  मतदान मिळाले होते. 
 

भाजपत गेल्यास हिंदू मतांचे काय?
आगामी निवडणुकीत सत्तार यांनी अपक्ष निवडणूक लढवली तर भाजप-शिवसेना युती व काँग्रेसचा उमेदवार हिंदू असण्याची शक्यता असल्याने हिंदू मत विभाजनाचा सत्तारांना फायदा होऊ शकतो. सत्तारांच्या हातात कमळ आल्यास मुस्लिम मतदार किती प्रमाणात त्यांच्या- सोबत राहतील व भाजप विचाराचे मतदार पक्षासोबत असतील की अन्य पक्षातील प्रबळ हिंदू उमेदवारास मतदान करतील यावर त्यांचे निवडून येण्याचे गणित अवलंबून असणार आहे. त्यातच सत्तारांनी लोकसभा व विधान परिषद निवडणुकीत युतीला मदत केल्याने भाजप नेतृत्व किती प्रखर विरोध त्यांना करु शकेल यावर बरेच काही अवलंबून आहे. यावेळी दलित मतदान मात्र वंचित बहुजन आघाडीकडे मोठ्या प्रमाणात जाऊ शकते.