आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लॅशबॅक : इच्छा नव्हती, बंधूंच्या इशाऱ्यामुळे निवडणूक लढवली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अशोक अडसूळ | मुंबई कऱ्हाडात वकिली करावी अन‌् जमेल तसे काँग्रेसचे काम करावे, असा यशवंत चव्हाण या युवा नेत्याने जीवनमार्ग आखला होता. पण, मोठ्या बंधूंनी रुग्णशय्येवर असताना आग्रह धरला अन‌् ते निवडणुकीला उभे राहिले. निवडून आले आणि मुंबई प्रांताच्या विधिमंडळात आमदार म्हणून पोहाेचले. यशवंतराव यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीचे सर्व श्रेय मोठ्या बंधुला दिले आहे. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात चव्हाण बंधू तुरुंगात होते. गणपतरावांना तुरुंगातच क्षयाची बाधा झाली. त्यांच्यावर मिरजेच्या हाॅस्पिटलमध्ये उपचार चालू होते. वकिली चालवावी अन‌् घर सावरावे असा निर्णय आर्थिक कोंडी फोडण्यासाठी यशवंतने घेतला होता.  देशात सत्तांतराची तयारी चालू होती. १९४६ मध्ये मुंबई राज्याच्या निवडणुका लागल्या. कार्यकर्त्यांनी यशवंतला उभे राहण्याचा आग्रह धरला. मात्र घरची जबाबदारी आणि बंधूंचा उपचार यामुळे निवडणुकीच्या फंदात पडायचे नाही, असे यशवंतने ठरवले हाेते. ताे रुग्णालयात बंधूंची शुश्रूषा करत होता. गळ घालण्यासाठी कार्यकर्ते रुग्णालयातही आले होते. यशवंत निर्णयावर ठाम होता. तेव्हा गणपतरावांनी यशवंतला आत बोलावले. ‘तू माझ्यासाठी मागे हटू नकोस. हे दिवसही जातील. निवडणुकीला उभे राहा. नाहीतर मी उपचार घेणार नाही’, असा निर्वाणीचा इशारा दिला. त्यानंतर मग यशवंतने नाईलाजाने निवडणुकीस उभे राहण्यास होकार दिला.  सातारा जिल्ह्यातून बाबूराव गोखले, व्यंकटराव पवार व के. डी. पाटील व यशवंत चव्हाण असे काँग्रेसचे पॅनल होते. चौघांनी एक टुरिंग गाडी भाड्याने घेतली. ती मध्येच बंद पडे. चौघे उमेदवार खाली उतरत व ढकलून चालू करत. या निवडणुकीत काँग्रेसचे पूर्ण पॅनल विजयी झाले. यशवंतराव मुंबई प्रांताच्या कौन्सिलमध्ये पोहाेचले. आयुष्यात पुढे त्यांनी दहा निवडणुका लढवल्या, जिंकल्या ही आणि थेट उपपंतप्रधानापर्यंत मजल मारली.