आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिक - ‘आज मी भाषण करणार नाही, उद्या पंतप्रधान नरेंद्र माेदीजी यांच्यासमाेर मला समाराेप करायचा आहे. आज महाजनादेश यात्रा संपली, मात्र उद्यापासून विजय यात्रा सुरू हाेणार आणि विधानसभेवर भाजपचा झेंडा फडकवल्यानंतरच त्याची सांगता हाेणार,’ असा निर्धार बुधवारी नाशकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा बुधवारी नाशिकमध्ये पाेहाेचली. शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील प्रमुख मार्गावरून त्यांनी राेड शाे केला.
पालकमंत्री गिरीश महाजन, राज्याचे प्रभारी भूपेंद्रसिंग यादव, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते. पावणेपाच वाजता पाथर्डी फाटा येथून यात्रेला सुरुवात झाल्यानंतर साधारण सहा वाजेच्या सुमारास माेटारबाइक रॅली त्र्यंबक नाक्यावर आली. तेथून अवघे काही अंतर जात नाही ताेच जाेरदार पाऊस सुरू झाल्यामुळे कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. मात्र नियाेजित मार्गावरून यात्रा गेली.
शालिमार, गाडगे महाराज पुतळा, भद्रकाली, मेन राेड येथून रविवार कारंजा येथे आल्यानंतर दाक्षिणात्य पद्धतीने फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर व्हिक्टाेरिया पुलावरून यात्रा पंचवटी कारंजा येथे आली. येथे समाराेपाचे भाषण करताना, फडणवीस यांनी प्रथम भारतमाता की जय अशा घाेषणा दिल्या. अभूतपूर्व स्वागत केल्याबद्दल नाशिककरांचे आभार मानले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या कानाकाेपऱ्यात यात्रेद्वारे फिरलाे. लाेकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रभू रामचंद्रांच्या या भूमीत समाराेपाचे भाग्य मला लाभले.
मला आशीर्वाद देणार का ?
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तुमचा जनादेश आहे का, मला आशीर्वाद देणार का, असा प्रश्न विचारला. त्यास लाेकांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर तुमचा आशीर्वाद हाच जनादेश असून विजयी झेंडा फडकवल्यानंतर पुन्हा एकदा प्रभू रामचंद्रांच्या या पुण्यभूमीत दर्शनासाठी नतमस्तक हाेईन, असे सांगून त्यांनी भाषण संपवले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.