आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रासंगिक- महाजनांची पुन्हा 'आकाशवाणी' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगावात रविवारी भाजपचा उत्तर महाराष्ट्र शक्तिकेंद्र मेळावा झाला. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी आवर्जून हजेरी लावली होती. भाजप सरकारवर वारंवार नाराजी व्यक्त करणाऱ्या एकनाथ खडसेंचीही इथे उपस्थिती होती. त्यामुळे या बैठकीत होणाऱ्या भाषणबाजीतून शह-काटशहाचे राजकारण उफाळून येईल,असे वाटले होते.

 

पण इथे गटबाजीचे दर्शन तर झाले नाहीच, उलटपक्षी कार्यकर्त्यांना गोंजारण्याचे आणि निवडणुका जिंकण्याचे आवाहन करत आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील नेते गिरीश महाजन आणि खडसेंकडून झाला. अन्य नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या घरावर पक्षाचे झेंडे तर लाभार्थ्यांच्या घराबाहेर त्यांच्याच घरातून तेल घेऊन दीप प्रज्वलित करण्याची सूचना केली. कार्यकर्त्यांच्या घरावर स्टिकर लावावे, असेही सांगण्यात आले. शक्तिकेंद्र मेळावा असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील पक्षाची ताकद तपासण्याचा हा पहिला टप्पा समजला जात आहे. भाजप-शिवसेनेची अद्याप युती झालेली नसल्यामुळे उमेदवार कोण? आणि विद्यमान खासदारांचे तिकीट निश्चित झाले आहे किंवा कसे? याचेही या बैठकीत संकेत मिळाले नाहीत. त्यामुळे विद्यमान खासदारांना कोणताही दिलासा नेत्यांनी दिला नाही. जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी चांगले काम केले आहे. यापूर्वीचे खासदार 'मौनी बाबा' होते, असे बोलून खडसेंनी काही प्रमाणात नाराजी ओढवून घेतली. कारण बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी माजी खासदारांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर दिसला. डॉ. सुभाष भामरे, जयकुमार रावल यांनीही निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम केले. गिरीश महाजन हे सध्या निवडणूक जिंकून देणारे आणि मुख्यमंत्री आणि सरकारतर्फे मध्यस्थी करणारे मंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीत आमदार गोटेंशी पंगा घेतला आहे. तिकडे बारामती जिंकण्याची भाषा करून साक्षात पवार साम्राज्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महाजनांनी आता धुळे आणि बारामतीत निवडणूक लढवूनच दाखवावी असे प्रतिआव्हान त्यांना आमदार गोटे आणि अजित पवारांनी दिले आहे. पवार आणि गोटेंना उत्तर दिलेच पाहिजे, म्हणून या मेळाव्यात महाजनांनी तुम्ही आधी माझ्या कार्यकर्त्यांशी लढा तेच तुम्हाला भारी पडतील, असे सूतोवाच करून त्यांनी आपण तेल लावलेला पहिलवान आहोत हे पुन्हा दाखवून दिले. याच मेळाव्यात त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील आठही लोकसभेच्या जागा जिंकण्याची 'आकाशवाणी' केली. अर्थात, उत्तर महाराष्ट्रातील शिर्डी आणि नाशिक या दोन ठिकाणी शिवसेनेचे खासदार आहेत, सहा जागा भाजपकडे आहेत. अजून युतीची घोषणा झालेली नाही. मात्र महाजनांच्या आकाशवाणीची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. 


महाजनांच्या वाणीला आकाशवाणी यासाठी म्हटले जाते, ते निवडणुकीच्या आधी जे आकडे बोलतात, तेच निकालात दिसतात हे जामनेर, जळगाव, धुळे, अहमदनगर, सोलापूर, मिरज या पालिकांच्या निवडणुकीत खरे ठरले आहे. आता त्यांनी लोकसभेची निवडणूक अंगावर घेतल्याचे पहिल्या उत्तर महाराष्ट्र शक्ती मेळाव्यात दिसले. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी टीकाही सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत व्होटिंग मशीन हॅक करणे एवढे सोपे आहे का? असा सूरही कुठे निघाला. तर कुणी म्हणू लागले ते महाजन आहेत, काहीही करतील. एकंदरित महाजन यांनी आठही जागा जिंकण्याची जी भाषा केली,त्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांना चांगलेच जिव्हारी लागले आहे. महाजनांचे फंडे कसे उलटवता येतील याची तयारी सुरू केली आहे. भाजपने जसे अजून उत्तर महाराष्ट्रातील किती खासदारांचे तिकीट कायम असेल, किती नवे चेहरे असतील. त्यात महिला असतील का? हे जसे गुलदस्त्यात ठेवले आहे तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीनेही पत्ते उघडलेले नाही. उमेदवाराच्या तोडीस तोड उमेदवार देता यावा आणि नाराज इच्छुकांची नाकाबंदी करता यावी म्हणून आघाडीतील घटकपक्ष उमेदवार निश्चिती आणि जागावाटपाच्या बोलणीपर्यंत आलेले नाही. २०१९ची निवडणूक ही कोणत्याही लाटेवर नाही. पाच राज्यांच्या निकालांनी मोदी आणि भाजपला धडा शिकवला आहे. तर काँग्रेसला जिंकण्याचे बळ मिळाले आहे. त्यामुळे भाजप राज्य, विभाग आणि जिल्हानिहाय रणनीती आखत आहे. महाजन हे नाशिकचे पालकमंत्री, जळगाव जिल्ह्याचे रहिवाशी आणि नंदुरबारचे माजी पालकमंत्री आणि धुळे, अहमदनगरच्या महापालिका निवडणुका जिंकण्याचा अनुभव असल्यामुळे त्यांच्याकडेच बहुधा पक्ष लोकसभेची सूत्रे सोपवतील असे दिसते. त्यात त्यांनी आठही जागा जिंकण्याची जी आकाशवाणी केली आहे, ती खरी करण्याचा प्रयत्न करतील. आणि खरंच त्यांची आकाशवाणी खरी ठरली तर 'ईव्हीएम' घोटाळ्याची चर्चा होईल, हे मात्र तेवढेच खरे आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...