आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'महानाेर, संमेलनाला जाऊ नका, त्रास हाेईल', ब्राह्मण महासंघाने पाठवले पत्र

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद : साहित्य संमेलनाचे नियाेजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटाेंपेक्षा अापण ज्येष्ठ अाहात. मराठी साहित्य चळवळीत अनेक नामवंत साहित्यिक असताना दिब्रिटाे हे अाम्हाला अध्यक्ष म्हणून मान्य नाहीत. त्यांची विचारसरणी मान्य नसल्याने अशा संमेलनाचे उद्घाटक म्हणून अापण उपस्थित राहू नका, अन्यथा अापल्याला त्रास हाेईल, असे धमकीवजा फाेन अाणि पत्र अाल्याचे संमेलनाचे उद्घाटक, ज्येष्ठ कवी ना. धाें. महानाेर यांनी सांगितले.

साहित्य संमेलन अाणि वाद ही प्रथा या वेळी खुंटते असे संमेलनाच्या पूर्वसंध्येपर्यंत वाटत असतानाच ना. धाें महानाेर यांना हे फाेन अाणि पत्र मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मला ब्राह्मण महासंघाकडून पत्रच अालेलं अाहे. त्याचे अध्यक्ष अानंद दवे अाहेत. ते म्हणाले की, दिब्रिटाे संमेलनाचे अध्यक्ष अाहेत. त्यांचे लेखन अाणि विचारसरणी अाम्हाला मान्य नाही. त्याच्यामुळे अाम्ही त्यांचा तीव्र निषेध करताे. अाम्ही संमेलनात माेठ्या प्रमाणात पत्रकं वाटणार अाहाेत. याशिवाय जे-जे शक्य अाहे ते-ते अाम्ही करणार अाहाेत. पण मी त्यांना म्हटलं की, दिब्रिटाे यांची लाेकशाही मार्गाने, घटनात्मक पद‌्धतीने निवड झालेली अाहे. त्यामुळे काेणी काही करू शकत नाही. पण यावरही ते म्हणाले की, अाम्ही तरी निषेध नाेंदवणार अाहाेत. त्याचा तुम्हाला त्रास हाेईल, तुम्ही येऊ नका. तुमच्यासारख्याने त्या ठिकाणी तिथे येणे बराेबर नाही, असं ते म्हणाले. पण मी त्यांना सांगितलं की, माझी साहित्य परिषद अाहे, संमेलन माझं अाहे. मी अायाेजक, संयाेजकांना उद्घाटक म्हणून येण्याचा शब्द दिल्यानंतर मी माझा शब्द मागे कसा घेऊ? मी शब्द दिल्यामुळे मला त्रास झाला तरी मी तिथे जाणार असल्याचे ते म्हणाले.

हे साहित्य संमेलन की ख्रिस्ती संमेलन?

उस्मानाबाद : ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी वसई-पालघर भागातून १२५ पादरी उस्मानाबाद येथे येणार आहेत. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. हे मराठी साहित्य संमेलन आहे की ख्रिस्ती संमेलन आहे, असा सवाल अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने उपस्थित केला आहे. याबाबत संमेलनस्थळी येऊन निषेध करणार असल्याचे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी दिव्य मराठीला सांगितले.

कुलकर्णी म्हणाले, संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो यांनी १२५ पादरींना निमंत्रण दिले आहे. हे साहित्य संमेलन आहे की ख्रिस्ती संमेलन आहे ? साहित्य साहित्याच्या जागी असावे. कोणत्याही जाती -धर्माचा अध्यक्ष बनू शकतो. तो मुळात साहित्यिक असावा, मात्र हे सर्व ख्रिस्ती प्रचारकाकडे नेत आहेत. त्याचा आम्ही निषेध करतो आहोत. साहित्याला धर्माचा रंग देऊ नये, असेही ते म्हणाले.