आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवारांनी मानले केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आभार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कट्टर विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये क्वचितच असा प्रसंग येतो जेव्हा ते एकमेकांचे कौतुक करतात. बऱ्याचवेळा हे कौतुक उपहासात्मक असते. परंतु, राजकीय विचारसरणी आणि पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कसे कामकाज पाहतात याचे उदाहरण राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. महाराष्ट्राचे अर्थसंकल्प सादर करताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजप नेते गडकरींबद्दलचा किस्सा आवर्जून सांगितला. एवढेच नव्हे, तर त्यांचे कौतुकही केले.

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या एका दिवसापूर्वी अर्थमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गडकरींची भेट घेतली. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींची भेट घेऊन महाराष्ट्र सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांच्यासमोर राज्यातील प्रलंबित रस्ते प्रकल्पाचा प्रश्न मांडला. यावेळी झालेल्या आढावा बैठकीत गडकरींनी पुणे रिंग रोडच्या प्रलंबित प्रकल्पाला वेळीच 1200 कोटी रुपये मंजूर केले. केंद्रीय मंत्र्यांनी रस्ते निधीमधून राज्याला 1200 कोटी रुपये देणार असल्याचे आश्वासन दिले. याबद्दल मी गडकरींचे अभिनंदन करतो असे सभागृहात अर्थमंत्री म्हणाले. त्यांच्या या मदतीचा राज्याला निश्चितच फायदा होणार आहे. त्याच बरोबर पुण्यातील रिंग रोडची संपूर्ण रक्कम राज्य सरकारने जमीन घेण्यासाठी खर्च करावी, रस्ते उभारणीचा खर्च केंद्र सरकार करेल, असेही गडकरी म्हणाल्याचे अजित पवारांनी सांगितले. याबद्दल आपण महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने गडकरींचे अभिनंदन करतो असे अजित पवार म्हणाले.