आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनगर समाजाला लाॅटरी; ओबीसींसाठी 36 वसतिगृहे, 1200 रुपयांची शिष्यवृत्ती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महायुतीच्या सरकारने मंगळवारी सादर केलेल्या सन २०१९-२० च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात धनगर समाजाला चक्क लाॅटरी लागली. गेली पाच वर्षे धनगर समाजाची एसटी आरक्षणाची मागणी फडणवीस सरकार पूर्ण करू शकले नाही, मात्र आरक्षणाची कसर भरून काढण्यासाठी या समाजाला आदिवासी समाजाच्या धर्तीवर तब्बल २२ योजना दिल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीकडे धनगर समाजाच्या वाढत्या कलास चाप लावण्याची किमया या अर्थसंकल्पाने साधली आहे.


२०१४ लोकसभा व विधानसभा आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील धनगर समाज भाजपच्या मागे एकमुखी उभा राहिला. तरी मोदी, फडणवीस सरकार या समाजाची एसटी आरक्षणाची मागणी पूर्ण करु शकले नाही. त्यामुळे धनगर समाज नाराज होता. या समाजाचा आंबेडकर-ओवैसी यांच्या वंचित बहुजन आघाडीकडे कल वाढला आहे. त्यामुळेच धनगर समाजाची नाराजी दूर करण्यासाठी या अर्थसंकल्पात २२ योजना दिल्याची शक्यता आहे.


मेंढीपालनासाठी जागा उपलब्ध करुन देणे, त्यासाठी अर्थसाहाय्य देणे, मेंढ्यासाठी विमा संरक्षण, वसतीगृहापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य, गुणवंत विद्यार्थ्यांना स्वाधार योजना, नामांकीत इंग्रजी शाळांत प्रवेश देणे, परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अशा २२ योजनांची अर्थसंकल्पात धनगर समाजावर खैरात करण्यात आली आहे. या योजनांसाठी १ हजार कोटींचा निधी राखून ठेवण्यात आला आहे.


बंजारा समाजाला अर्थसंकल्पात खूष केले आहे. या समाजाचे वाशीम जिल्ह्यात पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज मोठे श्रद्धास्थान आहे. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे. ग्रामीण भागातील महसूल व्यवस्थेचा कणा असलेल्या कोतवालांच्या मानधनातही ५० टक्केपेक्षा अधिक वाढ करण्यात आली आहे. एकुण फडणवीस सरकारने आजच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून बलुतेदार, आलुतेदारांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चांगलेच खूष केले आहे.


ओबीसी मतांवर डोळा
धनगर समाजाबरोबर इतर मागासवर्ग समाजाला (ओबीसी) खूष करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ३६ वसतीगृहे बांधली जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यीनींसाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे. दरमहा शंभर रुपये शिष्यवृत्ती ओबीसी वर्गातील २ लाख २० हजार विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच ओबीसी महामंडळाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर २०० कोटीचा निधी देण्यात आला आहे.


जयमल्हार व्यायामशाळा
मागच्या अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक सभागृह बांधण्याची घोषणा झाली होती. त्यासाठी या अर्थसंकल्पात ३५ कोटी निधी ठेवला आहे. त्याबरोबरच सार्वजनिक जय मल्हार व्यायामशाळा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती ग्रंथालय उभारण्याचे या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे. 


मागास, अतिमागास जाती खुश 
अर्थसंकल्पात सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकरिता १२ हजार ३०३ कोटींची विक्रमी तरतूद करत अनुसूचित जातींना (अतिपिछडा) खुश केले आहे. 
- दुसरीकडे विजाभज, इमाव, विमाप्र विभागासाठी २ हजार ८१४ कोटींची तरतूद करत मध्यम मागास जातघटकांचे (मागास) समाधान केले आहे.

बातम्या आणखी आहेत...