आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहेश रामदासी/ बिपिन खंडेलवाल महाराष्ट्र राज्य स्थापनेपासूनच्या ५९ वर्षांत राज्याला २७ मुख्यमंत्री लाभले. एकूण १८ नेत्यांनी हे पद भूषवले. त्यापैकी ६ जणांना एकापेक्षा जास्त वेळा हे पद मिळाले. या ५९ वर्षांत ४८ वर्षे काँग्रेसची राजवट राहिली. त्यात या पक्षाला २३ वेळा मुख्यमंत्रिपद मिळाले, तर चार बिगर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनाच आजवर हे राज्यातील सर्वात महत्त्वाचे पद भूषवता आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव नाईक यांनी १९६३ ते १९७५ असे सुमारे ११ वर्षे दाेन महिने सलग मुख्यमंत्रिपद भूषवण्याचा मान मिळवला. एवढी प्रदीर्घ कारकीर्द गाजवणारे ते महाराष्ट्रातील एकमेव मुख्यमंत्री ठरले आहेत.
सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे फडणवीस दुसरे
आपला सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरेच आणि पहिलेच बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री ठरले आहेत. भाजपचे पहिलेच मुख्यमंत्री ठरलेल्या फडणवीसांनी वसंतराव नाईकांचा विक्रम तब्बल ४७ वर्षांनी मोडला. ऑगस्ट २०१९ पर्यंत विचार केला तर फडणवीस १७६६ दिवस मुख्यमंत्रिपदी राहिले आहेत.
१९७२ नंतर २१ सीएम
वसंतराव नाईक यांनी १ मार्च १९६७ ते १३ मार्च १९७२ अशी ५ वर्षांची टर्म पूर्ण केली. त्यानंतर ४७ वर्षांत २१ जण मुख्यमंत्री झाले. मात्र एकालाही टर्म पूर्ण करता आली नाही. त्यापूर्वीही नाईक हेच सर्वािधक काळ सीएम (१५४८ दिवस) होते.
पवार सर्वात तरुण सीएम
सर्वात कमी वयात मुख्यमंत्रिपदी आरूढ होण्याचा पराक्रम शरद पवार यांनी केला. ते १८ जुलै १९७८ ला वयाच्या ३७ व्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते. देवेंद्र फडणवीस हे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले आहेत. ते वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्री बनले.
२ कुटुंबातील २ पिढ्यांना संधी
एकाच कुटुंबातील दाेघांनी मुख्यमंत्रिपद भूषवण्याचा मान पुसदचे नाईक व नांदेडचे चव्हाण या परिवारांना मिळाला. वसंतराव नाईकांनंतर १६ वर्षांनी त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री झाले. शंकरराव चव्हाण यांच्यानंतर २० वर्षांनी त्यांचे पुत्र अशाेक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली.
पवारांना तीनदा संधी, पक्ष वंचित
‘पुलाेद’ व काॅँग्रेस या दाेन पक्षांकडून तीन टर्म मुख्यमंत्रिपद भूषवणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी १९९९ मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मात्र आजवर एकदाही मुख्यमंत्रिपदाची संधी मिळू शकली नाही. काँग्रेससाेबत सुमारे १५ वर्षे सत्ता उपभाेगूनही हा पक्ष या पदापासून वंचितच राहिला आहे.
सेनेचे एका टर्ममध्ये २ मुख्यमंत्री
भाजपसाेबत युतीत सत्तेत आलेल्या शिवसेनेला एकदाच साडेचार वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मिळाले. मात्र अंतर्गत वादामुळे या कार्यकाळात त्यांना दाेन नेत्यांना संधी या पदावर द्यावी लागली. सुरुवातीची ३ वर्षे १० महिने ज्येष्ठ नेते मनाेहर जाेशी यांना, तर नारायण राणे यांना आठ महिन्यांसाठी हे पद मिळू शकले.
वादात अडकल्याने या मुख्यमंत्र्यांनी गमावले पद
ए. आर. अंतुले : (१९८० ते १९८२)
सिमेंट टंचाईच्या काळात बिल्डरांना सिमेंट उपलब्ध करून देण्याच्या बदल्यात इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान या संस्थेच्या नावे देणग्या गाेळा केल्याचा तत्कालीन मुख्यमंत्री अंतुले यांच्यावर आराेप हाेता. या प्रकरणात हायकाेर्टाने ताशेरे आेढल्यामुळे अंतुले यांनी पदाचा राजीनामा दिला हाेता. मात्र कालांतराने न्यायालयाने त्यांना निर्दाेष साेडले हाेते.
शिवाजीराव निलंगेकर (१९८५ ते ८६)
पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षेत आपल्या मुलीचे दाेन मार्क वाढवण्यासाठी परीक्षक मंडळावर दबाव आणल्याचा आराेप निलंगेकरांवर हाेता. कोर्टाने ताशेरे आेढल्यामुळे निलंगेकर यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. संसद, विधानसभा किंवा विधान परिषद यापैकी काेणत्याही सभागृहाचा सदस्य नसताना निलंगेकरांना या पदाची लाॅटरी लागली हाेती.
मनाेहर जाेशी (१९९५ ते १९९९)
जावई प्रदीप व्यास यांना पुण्यातील जमीन मिळवून देण्यासाठी अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका कोर्टाने ठेवल्याने जाेशींना पद साेडावे लागले.
विलासराव देशमुख (२००४ ते ०८)
२६ नाेव्हेंबर २००८ राेजी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला हाेता. हल्ला झालेल्या ताज व ट्रायडंट हाॅटेलची पाहणी करताना विलासरावांनी मुलगा अभिनेता रितेश व निर्माता-दिग्दर्शक राम गाेपाल वर्मा यांना सोबत नेले हाेते. एवढ्या संवेदनशील घटनेत बेजबाबदारपणे वागल्यामुळे विलासरावांविराेधात राज्यभरात संतापाची लाट उसळली हाेती. त्यामुळे त्यांना पद साेडावे लागले. तसेच या घटनेवर प्रतिक्रिया देताना ‘बडे बडे शहराें मे छाेटी छाेटी बाते हाेती है’ असे बेजबाबदार वक्तव्य केल्यामुळे उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनाही राजीनामा द्यावा लागला हाेता.
अशाेक चव्हाण (२००९ ते २०१०)
शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी राखीव असलेल्या मुंबईतील आदर्श साेसायटीला राज्याचे तत्कालीन महसूलमंत्री अशाेक चव्हाण यांनी कथितरीत्या अधिकाराचा गैरवापर करून जादा जागा वापराची मुभा दिली होती. त्याबदल्यात सासूबाईंच्या नावाने फ्लॅट घेतल्याचा अशाेक चव्हाणांवर आराेप हाेता. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर चव्हाणांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार हाेण्याचे आदेश हायकमांडने बजावले हाेते. हे प्रकरण हायकोर्टात गेल्यानंतर राज्यपालांनी दिलेले चौकशीचे आदेश बेकायदेशीर ठरवण्यात आले. त्यामुळे चव्हाणांना दिलासा मिळाला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.