किसान सभेचा पुन्हा / किसान सभेचा पुन्हा एल्गार, नाशिकहून निघणार मोर्चा, राज्यातून शेतकरी सहभागी होणार 

Feb 06,2019 08:25:00 AM IST

नाशिक - दोन वर्षांपूर्वीचा मुक्काम मोर्चा, गेल्या वर्षीचा पायी मोर्चा यापाठोपाठ अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने पुन्हा एकदा नाशिक ते मुंबई लाँग मार्चचा नारा देण्यात आला आहे. आतापर्यंतच्या मोर्चांच्या वेळी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा ठपका ठेवून येत्या २० फेब्रुवारीपासून नाशिकमधून निघणारा हा लाँग मार्च २७ फेब्रुवारीस मुंबईत पोहोचणार असल्याचा निर्णय नाशिकमध्ये झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. या मोर्चात राज्यभरातील २३ जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी होणार असल्याचे किसान सभेचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, दीडपट हमीभाव, पीक विमा योजनेेचा सावळागोंधळ, रोजगार हमी योजनेचा उडालेला फज्जा आणि आदिवासींना वन हक्क देण्यात होणारा विलंब या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेने गेल्या दोन-अडीच वर्षांपासून सातत्याने आंदोलने केली आहेत. २०१६ च्या जानेवारीस नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाभोवती तीन दिवसांचा मुक्काम मोर्चा करण्यात आला. २०१८ मध्ये नाशिक ते मुंबई असा पायी मोर्चा काढण्यात आला. हे प्रश्न सोडवण्याच्या सरकारच्या आश्वासनानंतर ही आंदोलने मागे घेण्यात आली होती. मात्र, त्यास वर्ष पूर्ण होत आले तरी त्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याने पुन्हा या लाँग मार्चची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, किसान मोर्चाने आता मोर्चा काढण्याची घोषणा केल्याने राज्य सरकारची काय भूमिका राहिल, याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

आश्वासने पूर्ण नाहीत, सरकारला परिणाम भोगावे लागतील
सरकारच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही मुंबईतून परतलो. राज्यातील ४० हजार शेतकरी अनवाणी, अर्धपोटी मुंबईत चालत गेल्याचे संपूर्ण राज्याने पाहिले. त्यानंतर दिल्लीत झालेल्या किसान मोर्चातही किसान सभेच्या वतीने लाखो शेतकरी सहभागी झाले होते. तरीही सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. केंद्र सरकारतर्फे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात तर शेतकरी, शेतमजूर यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला दररोज सव्वातीन रुपयांचे गाजर दाखवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. डॉ. अजित नवले, सरचिटणीस, किसान सभा

X