आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - शिवसेनेसाेबत सत्तास्थापनेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सहमती दर्शवली असली तरी अद्याप ही तिघाडी (तिन्ही पक्ष) ठाेस निर्णयापर्यंत येऊ शकलेले नाहीत. बुधवारी काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंची पहिल्यांदा भेट घेऊन किमान समान कार्यक्रम ठरवण्याबाबत भूमिका मांडली. यानंतर सायंकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक हाेणार हाेती. मात्र, अजित पवार हे बैठकस्थळावरून तडकाफडकी निघून गेल्यामुळे बैठक रद्द झाल्याच्याही वावड्या उठल्या. मात्र काही वेळाने दाेन्ही पक्षांची बैठक पुन्हा सुरू झाल्याने हे पेल्यातील वादळ शमले. दरम्यान, आघाडीच्या बैठकीत दाेन्ही काँग्रेस व शिवसेनेच्या जाहीरनाम्याची तपासणी केली. यातील शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्द्यावर सर्वांचे एकमत झाले, मात्र इतर वादग्रस्त बाबींवर ताेडगा निघणे अद्याप बाकी आहे.
दरम्यान, आणखी दाेन दिवस तरी सत्तास्थापनेच्या चर्चेतून अंतिम ताेडगा निघण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी आपापल्या नवनर्वाचित आमदारांना मतदारसंघात जाऊन शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्रिपदी ठाकरे कुटुंबातील सदस्य नकाे; काँग्रेसची अट
शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्द्यावर दाेन्ही काँग्रेस व शिवसेनेत एकमत असले तरी किमान समान कार्यक्रमासह इतर विषयांवर एकमत हाेणे बाकी आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार असलाे तरी ठाकरे कुटुंबीयांतील कुणालाही मुख्यमंत्रिपद दिले जाऊ नये, अशी अट काँग्रेसने घातल्याचे समजते. त्यातच साेनिया गांधींचे निकटवर्तीय काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी उद्धव ठाकरे यांना ‘आठ दिवस थांबा’ असा सल्ला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
चर्चा योग्य दिशेने
काँग्रेस नेत्यांबरोबर आमची योग्य दिशेने चर्चा सुरू असून जो काही निर्णय होईल तो योग्य वेळी सर्वांना कळेलच.’
- उद्धव ठाकरे (काँग्रेस नेत्यांशी बैठक झाल्यानंतर बोलताना)
शिवसेनेच्या अवास्तव मागण्या स्वीकारणे अशक्यच - अमित शहा
शिवसेनेसाेबत वाटाघाटी झाल्या त्या वेळीच आम्ही भाजप माेठा पक्ष ठरल्यास देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री हाेतील हे स्पष्ट केले हाेते. त्या वेळी कुणी आक्षेप घेतला नाही. आता शिवसेना नव्या मागण्या करत आहे त्या स्वीकारणे आम्हाला शक्य नाही. बंद खाेलीतील चर्चा सार्वजनिक करणे आमची संस्कृती नाही,’ असे भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.