आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - निवडणूक निकालाच्या २५ दिवसांनंतरही महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा गुंता सुटू शकलेला नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधी यांच्यात चर्चेनंतर साेमवारी शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी सरकार स्थापनेच्या निर्णयावर शिक्कामाेर्तब हाेईल, अशी आशा हाेती. मात्र त्यावरही दाेन्ही नेत्यांनी पाणी फेरले.
संसदेच्या अधिवेशनासाठी पवार साेमवारी दिल्लीत दाखल झाले. पत्रकारांनी सकाळीच त्यांना घेरले व ‘महाराष्ट्रात सत्तास्थापना कधी हाेणार?’ अशा प्रश्नांचा भडिमार केला. त्यावर पवारांनीही ‘हा प्रश्न भाजप-शिवसेनेला विचारा’ असे मिश्किलपणे सांगत पत्रकारांचीच विकेट घेतली. मात्र पवारांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात हाेते. सायंकाळी पवारांनी साेनिया गांधींच्या घरी जाऊन त्यांच्याशी ४५ मिनिटे चर्चा केली.
बैठकीनंतर पत्रकारांशी बाेलताना पवार म्हणाले, ‘महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीची साेनियांना मी माहिती दिली. सरकार स्थापनेबाबत मात्र आमची चर्चा झाली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते याबाबत चर्चा करून आम्हाला कळवतील. आघाडीतील इतर मित्रपक्षांना नाराज न करता त्यांची मतेही विचारात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.’
संजय राऊतही शरद पवारांना भेटले; चर्चा गुलदस्त्यात
साेनिया गांधींसाेबतच्या चर्चेत अपेक्षित निर्णय जाहीर न झाल्याने शिवसेनेच्या गाेटात अस्वस्थता हाेती. खासदार संजय राऊत तातडीने पवारांच्या बंगल्यावर दाखल झाले. त्यांनी भेटीतील चर्चेचा तपशील घेतला, मात्र ताे जाहीर केला नाही. पत्रकारांशी बाेलताना राऊत म्हणाले, ‘पवारांसाेबत राजकीय नव्हे तर अाेला दुष्काळ व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली. साेनिया व पवार दाेन्ही माेठे नेते अाहेत. त्यांच्यात काय चर्चा झाली हे मी त्यांना कसे विचारू शकताे?’
भाजपसह सर्व पक्षांनी राष्ट्रवादीकडून बोध घ्यावा : मोदी
राज्यसभेच्या २५० व्या सत्रानिमित्त आयोजित चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीची प्रशंसा केली. हौद्यात उतरून गोंधळ घालणाऱ्या नेत्यांवर टीका करत माेदी म्हणाले, राष्ट्रवादी व बिजू जनता दलाने सभागृहात आसनाजवळ न जाण्याचा संकल्प केला आहे. हौद्यात न उतरता त्यांनी प्रभावीपणे म्हणणे मांडले. सत्तापक्षात बसलेल्या भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी या दाेन्ही पक्षांकडून बोध घेतला पाहिजे.
‘एनडीए’तून बाहेर म्हणजे ‘यूपीए’त नाही : संजय राऊत
‘शिवसेना एनडीएतून बाहेर पडली म्हणजे आम्ही यूपीएसोबत आहोत, असे नाही. ‘एनडीए’ ही कुण्या एका पक्षाची मक्तेदारी नाही. शिवसेनेला एनडीएबाहेर करताना भाजपने मित्रपक्षांना विचारले हाेते का? ’ असा प्रश्न खा. संजय राऊत यांनी केला.
आठवलेंनी भाजप-सेनेला दिला ३ : २ चा फॉर्म्युला
महाराष्ट्रात भाजप व शिवसेनेचेच सरकार येणार,असे अमित शहा यांनी मला सांगितले अाहे, असे रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले. शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेस तयार नाही. यामुळे शिवसेनेने भूमिका बदलावी. मी संजय राऊतांशी चर्चा केली. ३ वर्षे भाजपचा आणि २ वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री, असा फॉर्म्युला मी सुचवला आहे. भाजप तयार असेल तर सेना विचार करेल, असे राऊतांनी सांगितल्याचे ते म्हणाले.
उद्धव यांचा अयोध्या दौरा रद्द :
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला २४ नोव्हेंबरचा प्रस्तावित अयोध्या दौरा रद्द केला आहे. सुरक्षेच्या कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. शिवसेनेच्या सूत्रांनुसार, सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत व्यग्र असल्याने उद्धव यांनी दौरा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव यांच्या प्रस्तावित दौऱ्याला हिंदुत्वाच्या विचारधारेशी जोडत मुद्दा उपस्थित केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.