आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरुण जेटलींच्या निधनावर महाराष्ट्राच्या राज्यपालांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले- 'जेटलींच्या जाण्याने भारतीय राजकारणाची मोठी हानी झाली'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी माजी अर्थमंत्री अरुण जेटलींच्या निधनावर शोक व्यक्त केला. ते म्हणाले, "अरुण जेटली हे एक जबरदस्त राजकारणी, वकिली क्षेत्रातील आयकॉन, हुशार खासदार आणि एक उत्कृष्ट केंद्रीय मंत्री होते, ज्यांनी जवळ-जवळ तीन दशकांपेक्षा अनेक काळ राष्ट्रीय राजकारणावर आपली वेगळी छाप पाडली. तसेच ते एक प्रतिभासंपन्न वक्तेही होते, जेटलींच्या जाण्याने भारतीय राजकारणाची मोठी हानी झाली आहे."

पुढे ते म्हणाले, एक केंद्रीय अर्थ, कॉर्पोरेट अफेअर्स, कॉमर्स आणि इतर विभागांचे मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामातून वेगळी छाप पाडली आणि आणि सामान्य माणूस, उद्योग, व्यवसाय आणि इतर गुंतवणुकदारांना सक्षम बनविण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयात मी अरुण जेटलींच्या सानिध्यात काम करण्याचे सौभाग्य मला लाभले. प्रत्येकाचे आधारस्तंभ असलेला बोलके नेते होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशाचे मोठे नुकसान झाले आहे."

झंझावाती नेतृत्व गमावले - विनोद तावडे
विद्यार्थी दशेपासूनच नेतृत्व, उत्कृष्ट वक्तृत्व असे गुण असेलेले देशाचे माजी केंद्रिय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने एक झंझावाती नेतृत्व गमावला असल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, अभ्यासपूर्ण युक्तिवादाने भल्याभल्यांना गारद करण्याची शक्ती अरुण जेटली यांच्याकडे होती. उत्कृष्ट वकिल म्हणून ख्याती मिळवणाऱ्या अरुण जेटली यांनी विद्यार्थी नेते ते केंद्रीय अर्थमंत्रीपदापर्यंतच्या प्रवासात त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. देश उभारणीसाठी योगदान देणाऱ्या अरुण जेटली यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश मुकला आहे.

सर्वसमावेशक आणि मनमिळावू नेतृत्वाचा अस्त- सुधीर मुनगंटीवार
माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या निधनाने  देशपातळीवर सर्वसमावेशक विचार करणारे, मनमिळावू, मुत्सदी, प्रचंड विद्वान असे जेष्ठ नेतृत्व काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे. ही राष्ट्राची मोठी हानी आहे. एक मोठा आधारवड आज हरवला आहे अशा शब्दात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. पेशाने वकिल असलेले अरूण जेटली हे अतिशय विनम्र, अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या स्वभावामुळे विरोधक ही त्यांच्या प्रेमात पडत असत असे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, देशात वस्तू आणि सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीच्यानिमित्ताने वारंवार त्यांच्याशी संवाद साधण्याचा, त्यांच्यासमवेत बैठकांमध्ये सहभागी होण्याचा योग आला. त्यावेळी त्यांचे सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व जे सर्वांना भारून टाकणारे होते ते पहायला मिळाले. त्यांच्या सर्वसमावेशक दृष्टीमुळे जीएसटीचे सर्व निर्णय पक्षीय भेद न राहता ना केवळ एकमताने तर ते एक दिलाने मंजूर झाले. सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळेच देशात या करप्रणालीची अंमलबजावणी यशस्वी ठरली असे ही श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. आधी ज्येष्ठ भगिनी आणि माजी मंत्री, राष्ट्रीय नेत्या सुषमा स्वराज यांचे आपल्यातून जाणे आणि आता अरुण जेटली यांच्या निधनाने राष्ट्र दोन अनमोल व्यक्तिमत्त्वाच्या नेतृत्वाला गमावून बसले आहे असेही मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.