आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएमसी बँकेचे होणार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलीनिकरण! सरकारकडून हालचाली

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

मुंबई - पीएमसी बँक घोटाळ्यानंतर पैसे अडकल्याने त्रस्त असलेल्या ग्राहकांना महाराष्ट्र सरकारने दिलासा देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक अर्थात पीएमसी बँक महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याचा सल्ला दिला आहे. असे झाल्यास पीएमसी बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल अशी माहिती राज्य सरकारचे मंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी दिली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मी दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या चेअरमनशी बोललो. यामध्ये आम्ही राज्य सहकारी बँकेला पीएमसी बँक आपल्यात विलीन करण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून पीएमसी बँकेत पैसे अडकलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. यासंदर्भात गरज पडल्यास आम्ही भारतीय रिझर्व्ह बँकेशी देखील बोलणार आहोत." जयंत पाटील माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. ज्यांचा पैसा या बँकेत अडकला त्यांनी मुळीच घाबरू नये. राज्य सरकार त्यांच्या पाठीशी आहे असे आश्वासन पाटील यांनी दिले आहेत.

पीएमसी बँकेत 4,355 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला. त्यानंतर आरबीआयने या बँकेचे सर्व व्यवहार बंद करून निर्बंध लादले. अशात आपल्या हक्काचे पैसे अडकल्याने पीएमसी बँकेचे ग्राहक रस्त्यावर उतरले होते. आरबीआयने सुरुवातील पीएमसी बँकेच्या ग्राहकांना 1 हजार रुपये काढण्याची परवानगी दिली. त्यानंतर ही रक्कम काढण्याची मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत गेली. या बँकेत पैसे अडकल्याने काहींच्या मुलींचे लग्न तर काहींचे उपचार अशी सर्वच कामे थांबलेली आहेत. या निर्बंधांना कंटाळून आतापर्यंत पीएमसी बँकेच्या 8 ग्राहकांचा मृत्यू झाला. यामध्ये आत्महत्या केलेल्यांचा देखील समावेश आहे.