विधानसभा 2019 / महाराष्ट्र-हरियाणात निवडणुकीच्या तारखांची घोषणा आज, दोन्ही राज्यांत एकाच टप्प्यात मतदानाची शक्यता

मागीलवेळी निवडणुकीची घोषणा 20 सप्टेंबरला झाली होती

Sep 21,2019 11:46:53 AM IST

नवी दिल्ली - गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा आज होणार आहे. निवडणूक आयोगाने यासाठी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. तर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वातील सरकारचा कार्यकाळ 2 नोव्हेंबरपर्यंत आहे. या दोन्ही राज्यांमध्ये यापूर्वी विधानसभा निवडणुकीची घोषणा 20 सप्टेंबर रोजी झाली होती. 15 ऑक्टोबर रोजी मतदान तर 19 ऑक्टोबर रोजी निकाल लागले होते. विशेष म्हणजे, या दोन्ही राज्यांमध्ये भाजपचे सरकार असून काश्मीरात कलम 370 रद्द झाल्यानंतर ही पहिलीच मोठी निवडणूक ठरणार आहे.

महाराष्ट्रात 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजप-शिवसेनेची युती तुटली होती. दोन्ही पक्षांनी 25 वर्षांनंतर स्वतंत्र निवडणूक लढवली होती. यात मोदी लाटेत भाजपला 122 आणि शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा जागांवरून एकमत न झाल्याने स्वतंत्र निवडणूक लढवण्यात आली होती. याच दरम्यान, हरियाणात भाजपने हरियाणा जनहित काँग्रेससोबतची युती तोडून 90 सर्वच जागांवर विधानसभा लढवली होती. यापैकी 47 जागांवर भाजपला यश मिळाले. राज्याच्या इतिहासात भाजपला प्रथमच पूर्ण बहुमताने सरकार स्थापनेची संधी मिळाली.

X