आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांच्या शोधात महाराष्ट्र!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय आवटे, राज्य संपादक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे केबिनमध्ये बोलत बसले होते. अचानक झंप्या तिथे कुतूहलाने बघायला गेला. तिथे उदयनराजे भोसले, डॉ. पद्मसिंह पाटील, भास्कर जाधव, गणेश नाईक, सचिन अहिर, विजयसिंह मोहिते पाटील, जयदत्त क्षीरसागर, चित्रा वाघ, डावखरे, पिचड, तटकरे असे राष्ट्रवादीचे एकेकाळचे दिग्गज नेते बसलेले होते. ते बघून ओरडत झंप्या बाहेर आला, “अरे, मुख्यमंत्री आणि उद्धवजी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला रे!’ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट आहे ही. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. चर्चा आहे ती एकच - कोणी पक्षांतर केले! कोण उरले!! काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे बडे बडे नेते भाजप आणि शिवसेनेत जाऊ लागले आहेत. ही सुरुवात तशी २०१४ च्या लोकसभेनंतरच झाली होती. मात्र, या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेत जी प्रचंड मेगाभरती सुरू आहे ती ऐतिहासिक आहे. देशभरात कुठेही घडले नसेल आणि महाराष्ट्रातही यापूर्वी कधी दिसले नसेल, असे हे प्रमाण आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे बडे नेते. त्यांच्याकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद होते. मुलाच्या उमेदवारीच्या मुद्द्यावरून त्यांनी या लोकसभा निवडणुकीत पक्ष सोडला. (विखे पाटलांच्या ट्रॅक रेकॉर्डमध्ये निष्ठा नावाची गोष्ट नव्हतीच!) ते भाजपमध्ये गेले. त्यानंतर ही गळती वाढतच गेली. त्या अर्थाने महाराष्ट्रात राजेरजवाड्यांचे ‘राज्य’ नाही. राजघराण्यातील मंडळींचा राजकारणावर फार मोठा ठसा नाही. जे काही प्रस्थ आहे ते साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांचे. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्टाइलमुळे उदयनराजे चर्चेत असतात. शिवाजी महाराजांचे थेट वंशज असल्याने त्यांचा ‘भक्तसंप्रदाय’ मोठा आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भले भले पराभूत होत असताना राजे मात्र मोठ्या मताधिक्याने निवडून आले. आता हे राजेही भाजपमध्ये गेले. यापूर्वीही एकदा भाजपसोबत ते गेले होतेच! भाजपसोबत जाणारे उदयनराजे एकटे नाहीत. कोल्हापूरचे युवराज, साताऱ्याचे शिवेंद्रराजे असे सगळेच ‘राजे’ भाजपमध्ये गेले आहेत.  या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी होणार हे जसे पक्के आहे, तसेच भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढणार हे ठरलेले आहे! (युती होणे भाजपच्या हिताचे आहे आणि शिवसेनेसाठी तर ती अपरिहार्यता आहे!) त्यामुळे पक्षांतर करताना जी जागा शिवसेनेची आहे, तिथे सेनेत इनकमिंग होत आहे. मात्र, या पक्षातरांचे मुख्य सूत्रधार आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ईडी आणि चौकशांना घाबरून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये येताहेत याला फार अर्थ नाही. त्याची कारणे वेगळी आहेत.  महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतर देशातील सगळ्यात मोठे राज्य आहे. २८८ आमदार असणाऱ्या महाराष्ट्राची राजकीय प्रकृती वेगळी आहे. दीर्घकाळ काँग्रेस सत्तेत आहे. त्यातून मोठमोठे नेते इथे तयार झाले. यापैकी बहुतेक सर्वांचे आपापले ‘साम्राज्य’ आहे. सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था असे मोठे जाळे या नेत्यांनी उभे केले आहे. पक्षापेक्षा मोठे झालेल्या या नेत्यांना सत्तेशिवाय अन्य पर्याय दिसत नाही. शरद पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला तो १९९९ मध्ये. काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते पवारांच्या पक्षात सहभागी झाले. भाजप-शिवसेनेतील काही नेतेही आले. इतर पक्ष फोडण्याचा आणि त्यांचे नेते आपल्याकडे वळवण्याचा ‘होलसेल’ उद्योग महाराष्ट्रात सर्वप्रथम केला तो शरद पवारांनी. आता तोच उद्योग भाजपने आरंभलेला असताना सगळ्यात मोठी हानी झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसची. जन्माला आल्यापासून हा पक्ष सत्तेत आहे. सत्ता गेली की तो विखुरणे स्वाभाविकच होते. राज्यात विरोधक शिल्लक नाहीत. एवढ्या मोठ्या संख्येने अन्य पक्षांतील नेत्यांना भाजप वा शिवसेनेत घेतल्याने युतीचे कार्यकर्तेही अस्वस्थ आहेत. निष्ठावंतांची उपेक्षा आणि आयारामांना रेड कार्पेट यामुळे ही नाराजी वाढत चालली आहे. भ्रष्ट नेत्यांना तुरुंगात पाठवू म्हणणारा भाजप त्यांना आपल्याच पक्षात घेऊन पावन करत आहे. त्याचा त्रास भाजप समर्थकांना होतो आहे.  अर्थात, भाजप प्रचंड उत्साहात या निवडणुकीला सामोरा जात आहे. विरोधकांनी ही निवडणूक आधीच सोडून दिली आहे. मनसेसारखा पक्ष निवडणूक लढवायची की नाही हेही ठरवू शकत नाही. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत चांगली संधी होती हे खरे, पण एमआयएम आणि आंबेडकर वेगळे झाल्याने ती संधीही त्यांनी गमावली आहे. महाराष्ट्रात सत्ता कोणाची येणार हे स्पष्ट आहे. महाराष्ट्र शोधात आहे तो विरोधी पक्षाच्या.

बातम्या आणखी आहेत...