आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णेच्या पाण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सरकार एकत्र, लवादाला आव्हान देणाऱ्या आंध्रच्या याचिकेला संयुक्तपणे विरोध

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कृष्णा पाणीवाटप लवादाला आव्हान देणाऱ्या आंध्र प्रदेशच्या याचिकेला आता संयुक्तपणे विरोध करण्याचा निर्णय महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने घेतला आहे. यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. बैठकीत याबाबत एकमताने निर्णय घेतला. यावेळी झालेल्या चर्चेत दोन्ही राज्यांतील पूर आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी संयुक्त उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉ. अश्वतनारायण, गृहमंत्री बसवराज बोम्मई, येडियुरप्पा यांचे चिरंजीव खासदार राघवेंद्र हे उपस्थित होते.

कृष्णा लवादाने तत्कालीन आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यादरम्यान पाणीवाटपावर निर्णय दिला आहे. तथापि, आंध्र प्रदेशने आता तेलंगणा राज्यनिर्मितीनंतर पाण्याचे फेरनियोजन व्हावे, अशी भूमिका घेतली आहे. त्यासाठी याचिका दाखल केली आहे. लवादाने तत्कालीन संयुक्त आंध्र प्रदेशासाठी निर्णय दिला आहे. त्यामुळे त्याच्या वाट्याला आलेल्या पाण्याच्या वाटपाबाबत आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांनी दोन्हींतच तोडगा काढणे अपेक्षित आहे. त्यामुळे लवादाला आव्हान देण्याच्या आंध्र प्रदेशच्या भूमिकेला महाराष्ट्र आणि कर्नाटक यांनी संयुक्तपणे विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.