political / पूर व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र-कर्नाटकची उच्चस्तरीय समिती 

मुख्यमंत्री फडणवीस यांची कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पांसोबत बैठक 

प्रतिनिधी

Sep 04,2019 09:54:00 AM IST

मुंबई : कृष्णा पाणी वाटप लवादाला आव्हान देणाऱ्या आंध्र प्रदेशच्या याचिकेला संयुक्तपणे विरोध करण्याचा निर्णय महाराष्ट्र आणि कर्नाटक यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येदियुरप्पा यांनी मंगळवारी एकमताने निर्णय घेतला.


कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत दोन्ही राज्यांतील पूर आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी संयुक्त उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉ. अश्वतनारायण, गृहमंत्री बसवराज बोम्मई, येदियुरप्पा यांचे चिरंजीव खासदार राघवेंद्र आदी उपस्थित होते. कृष्णा लवादाने तत्कालीन आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यादरम्यान पाणीवाटपावर निर्णय दिला आहे. तथापि, आंध्र प्रदेशने आता तेलंगणा राज्य निर्मितीनंतर पाण्याचे फेरनियोजन व्हावे अशी भूमिका घेतली आहे. त्यासाठी याचिका दाखल केली आहे. लवादाने तत्कालीन संयुक्त आंध्र प्रदेशसाठी निर्णय दिला आहे. त्यामुळे त्याच्या वाट्याला आलेल्या पाण्याच्या वाटपाबाबत आंध्र प्रदेश आणि तेलंगण यांनी दोहोतच तोडगा काढणे अपेक्षित आहे. त्यामुळे लवादाला आव्हान देण्याच्या आंध्र प्रदेशच्या भूमिकेला महाराष्ट्र आणि कर्नाटक यांनी संयुक्तपणे विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.


दोन्ही राज्यांतील पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी संयुक्त अशी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून दोन्ही राज्यांतील धरणांच्या पाण्याबाबत नियोजन करण्यात येईल.

X
COMMENT