आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाचे चटके सोसले; आता हेच दु:ख निवारण्यासाठी घेतले १०० विद्यार्थी दत्तक ; महाराष्ट्र केसरीच्या उपविजेत्या अक्षय शिंदे व मल्ल पंकज हरपुडेचा सामाजिक उपक्रम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दाेन वर्षांपूर्वी दुष्काळामुळे प्रगतीच्या सर्वच मार्गांत अडसर निर्माण झाला. मात्र, काही जणांच्या दानशूरपणामुळे पुन्हा उमेदीने पुनरागमन करण्याचे बळ मिळाले. आपल्या वाट्याला आलेल्या या दु:खाची झळ गावातील चिमुकल्यांना बसू नये, म्हणून उपमहाराष्ट्र केसरी मल्ल अक्षय शिंदे आणि हिंद केसरीमधील कांस्यपदक विजेत्या पंकज हरपुडेने सामाजिक उपक्रम हाती घेतला. यातूनच त्यांनी आपल्या जिल्ह्यातील १०० विद्यार्थ्यांना दत्तक घेतले. त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च या दाेन प्रतिभावंत मल्लांनी उचलल्याने ऊसताेड कामगार, गरिबरांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग माेकळा झाला आहे. यातील काही विद्यार्थ्यांना कुस्तीचेही प्रशिक्षण देण्याचा त्यांचा मानस आहे. 

 

स्वत:च्या गावातील ८० विद्यार्थी 
बीड जिल्ह्यातील प्रतिभावंत मल्ल अक्षय शिंदे हा शिवणी गावात राहताे. यंदा दुष्काळामुळे महाराष्ट्रात सर्वत्र विदारक परिस्थिती आहे. याच दुष्काळाची झळ शिवणी गावच्या नागरिकांनाही बसली आहे. गावात माेठ्या संख्येत ऊसताेड कामगार आहेत. मात्र, यंदा त्यांच्याही हाताला काम नाही. तसेच पाहिजे तशी कमाई झाली नाही. यातून या सर्वांसमाेर माेठ्या अडचणी निर्माण झाल्या. हे लक्षात घेऊन अक्षयने गावातील ८० विद्यार्थ्यांना दत्तक घेतले. तसेच त्याने आष्टी तालुक्यातील जोगेश्वरी पारगावचे १० विद्यार्थी, जामखेड तालुक्यातील शिऊर गावच्या ७ विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे. 

 

कुस्तीत करिअर घडवणार
सर्वच विद्यार्थी गरीब घरचे आहेत. मात्र, त्यांच्यात प्रचंड प्रतिभा आणि गुणवत्ता आहे. मात्र, गरिबीमुळे त्याला चालना मिळत नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती बेेताची असल्याने अनेक संकटांना सामाेरे जावे लागते, याची मला जाण आहे. त्यामुळे या सर्वांना आर्थिक बळ देण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. यातूनच यातील काही जणांना कुस्तीचे तंत्रशुद्ध  प्रशिक्षण आम्ही देणार आहाेत. यामुळे त्यांना कुस्तीत करिअर करता येईल, अशी प्रतिक्रिया अक्षयने दिली.

 
 
गुणवत्तेला चालना 
गावातील आणि तालुक्यातील युवा खेळाडूंमध्ये प्रचंड प्रतिभा आणि गुणवत्ता आहे. याला आम्ही आता आर्थिक पाठबळातून चालना देणार आहाेत. यामुळे या सर्वांचा प्रगतीचा मार्ग सुकर हाेईल. त्यामुळे त्यांना यशाचा पल्ला गाठता आला.
अक्षय शिंदेे, उप महाराष्ट्र केसरी (२०१७), बीड

 

आता मॅटवर पुनरागमन : गतवर्षी जालना येथील ६२ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत बीडच्या मल्ल अक्षय शिंदेला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला पायावर शस्त्रक्रिया करावी लागली. मात्र, आता ताे दुखापतीमधून पूर्णपणे सावरला आहे. आता ताे सीनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. पुढच्या महिन्यात ही राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...