आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरींना आवडतो थाई भात, अजितदादांना भाजी-भाकरी, राज ठाकरे यांना सावजी मटण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामानिमित्त मला विविध क्षेत्रांतील असंख्य लोकांना भेटण्याची संधी लाभली, आजही लाभतेच म्हणा. यातून त्याच्या खाण्यापिण्याच्या आवडी, सवयी व एकंदरीत एका खाद्यसंस्कृतीचा परिचय होताे. या सर्व मांदियाळीत राजकीय मंडळींचे एक वेगळेच वैशिष्ट्य नजरेत भरले. राजकारणी-नेते मंडळी म्हटली त्यांच्या मागे असलेली सर्व क्षेत्रातील लोकांची गर्दी आणि अफाट जनसंपर्क आलाच. तसेच दररोज कुठे ना कुठे भेटी-दौरेही आलेच. या भटकंतीत त्यांनाही शेकडो खाद्यपदार्थ चाखण्याची संधी आपसूकच मिळते. यामुळे त्यांच्या आवडी-निवडीही खासच असतात. व्यवसायानिमित्त मला राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभला. त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी जवळून पहाता आल्या. त्यातील काही व्यक्तींच्या आवडींचा घेतलेला हा मागाेवा...


गडकरींचा वीक पॉइंट झणझणीत भाज्या अन् समोसे
खाण्याची प्रचंड आवड असणारे व्यक्ती म्हणजे नितीन गडकरी. ते जेथे जातात तेथील खाद्यपदार्थांची चव चाखतातच. पुरणपाेळी, समाेसे, झणझणीत भाज्या, या त्यांच्या वीक पॉइंट.. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर दिल्लीतील बंगल्यात त्यांनी तेलंगी पद्धतीचे आचारी नेले हाेते. बंगल्यावर खास बेत केल्यावर ते इतर पक्षातील खाद्यप्रेमींनाही बोलावत. गडकरींना विशेषकरून थाई पदार्थ खूप आवडतात.


थाई पद्धतीची ग्रेव्ही
साहित्य
: ४ कांदे, हळद १/२ चमचा, थाई जिंजर पेस्ट २ चमचे, तेल १/२ वाटी, मीठ, मीरपूड
कृती :  कांदे, थाई जिंजर बारीक वाटून घ्यावेत. पाटा वरवंटा वापरला तर चांगलाच. नंतर थाेडे पाणी घालून मिश्रणाला तेल सुटेपर्यंत परतावे. चवीनुसार मीठ, मीरपूड घालून उकळी आणून गॅस बंद करावा. 


थाई पद्धतीचा भात 
साहित्य
: भिजवलेला भात २ वाट्या, थाई पद्धतीची ग्रेव्ही २ वाट्या, शिमला मिरची (लांब कापलेली) १ वाटी, ब्राेकाेली अर्धी वाटी. 
कृती :  थाेडेसे मीठ घालून भात भिजवून घ्यावा. चमचाभर तेलात सर्व भाज्या परतून त्यात भात घालवा. त्या बराेबर यलाे ग्रेव्ही व मीठ घालावे. थाेडासा पाण्याचा हबका मारून मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे झाकून ठेवत शिजवावा. 


अजितदादांना भाजी-भाकरीची गोडी : अजित पवार पूर्वी नाॅनव्हेजचे चाहते होते. मात्र आता त्यांना साधे जेवण आवडते. सकाळी वरण-भात, पालेभाजी लागते. दाैऱ्यावर ते भरपेट नाष्टा करतात. त्यात दूध, फळ, इडली वा पोहे असतात. घरी रात्रीच्या जेवणात सुनेत्रा वहिनींच्या देखरेखीखाली तयार झालेली भाजी-भाकरी आवडते.


माेहन भागवतांना आवडताे चंद्रपुरी वडा
सरसंघचालक माेहन भागवत यांना खास वैदर्भीय पद्धतीचे ‘रच-मच’ म्हणजे बऱ्यापैकी तेल, तिखट, मसाला असलेले जेवण आवडते.  चंद्रपुरी वडा हा पदार्थ त्यांना खूप आवडतो. 


चंद्रपुरी वड्याची कृती
साहित्य
:  २ वाट्या भिजलेली चणाडाळ, २ वाट्या बारीक चिरलेला कांदा, २ ते ३ चिरलेल्या मिरच्या, काेथिंबीर अर्धी वाटी, भरडलेले धणे २ चमचे, हळद पाव चमचा, तिखट-मीठ, आले लसून पेस्ट २ चमचे, तळण्यासाठी तेल. 

कृती :  डाळ भिजवून वाटून घेणे. त्यात सगळे जिन्नस घालून ओल्या हातांनी त्याचे गाेल वडे करून तेलात हाफ फ्राय करून घेणे. हे करताना वड्यांना पुन्हा ओल्या हातानी चपटे करत मंद आचेवर डीप फ्राय करा. तळलेल्या मिरचीसोबत सर्व्ह करा.


राज ठाकरे यांना आवडते सावजी मटण
खाण्याच्या बाबतीत राज ठाकरे अत्यंत दर्दी आहेत. मात्र तसे त्यांचे जेवण कमीच आहे. त्यांना नियमित व्यायामाची आवड आहे. नागपूरचे सावजी मटण, चिकन हे त्यांचे अतिशय आवडते पदार्थ.


साहित्य : मटण १ किलाे, सावजी ग्रेव्ही ४ वाट्या. (आलं, लसून, काेथिंबीर, हिरव्या मिरचीचे वाटण १ वाटी), दही २ वाट्या, खडा मसाला अर्धा चमचा, कसुरी मेथी १ चमचा, काेथिंबीर. 
कृती : धुतलेल्या मटणात सर्व मसाले, हिरव्या मिरचीचे वाटण व दही मिसळून दीड ते दाेन तास ठेवून नंतर त्याला त्याच पाण्यात भिजवावे. भिजवलेल्या मटणात सावजी ग्रेव्ही घालून थाेडी कसुरी मेथी घालावी व ५-७ मिनिटे त्यास भिजवावे. काेथिंबीर घालून गरम गरम वाढावे.


लालूप्रसाद यादवांना आवडतात दह्या-दुधाचे पदार्थ 
लालूप्रसाद यादव यांचे दह्या-दुधाच्या पदार्थांसोबतच ग्रामीण पदार्थांवर विशेष प्रेम आहे. त्यांना स्वयंपाकघरात रमायला आवडते. याचा प्रत्यय बिहारमध्ये लालू यांच्या घरी गेलाे असताना मला आला. त्यांना बिहारी लिट्टी-चाेखा खूप आवडताे. त्यांनी ताे स्वत: करून मला खाऊ घातला.


लिट्टी-चाेखा
साहित्य
: ४ उकडलेले बटाटे, जिरे-माेहरी १-१ चमचा, शोप अर्धा चमचा, हळद पाव चमचा, १ वाटी दही, ४-५ हिरव्या मिरच्या, मीठ चवीनुसार. 
कृती :  बटाटे कुस्करून घ्यावेत. त्यात मीठ, हिरवी मिरची व दही घालावे. वरून माेहरी, जिरे व साेफेची फाेडणी घालावी. याला लिट्टीसाेबत खावे. 


साेनियांचे जेवण साधे : राष्ट्रकुल स्पर्धेसाठी डायनिंग कमिटीत असताना साेनियांच्या आवडीबाबत माहिती झाली. त्यांना जंकफूड आवडत नाही. त्यांना अत्यंत साधे जेवण लागते. दिवसातून थाेडे-थाेडे असे ३ ते ४ वेळा खाण्याचा त्यांचा कटाक्ष असतो.


शब्दांकन : नितीन फलटणकर

बातम्या आणखी आहेत...