आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

 मी (लपून-छपून) आलो! पुन्हा भाजपचेच सरकार, राजभवनात गुपचूप उरकला शपथविधी साेहळा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
राजकीय दाेस्ती - राज्यपालांनी शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. - Divya Marathi
राजकीय दाेस्ती - राज्यपालांनी शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.
  • पुन्हा भाजपचेच सरकार, सकाळी 8 ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचा शपथविधी
  • भाजपने राजभवनात गुपचूप उरकला शपथविधी साेहळा, बहुमतासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत
  • शरद पवारांनी दादांचे बंड काढले मोडून, आमदार स्वगृही

​​​​​​मुंबई : शुक्रवारी रात्री काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या निर्णयावर एकमत झाले. शनिवारी तिन्ही पक्षांचे नेते सत्तास्थापनेचा दावा करणार हाेते. मात्र शनिवारची सकाळ उजाडण्यापूर्वीच भाजपने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना हाताशी धरून 'द्रुतगती' खेळी करत थेट सत्ता स्थापन करत सर्वांनाच धक्का दिला. महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी विधिमंडळ नेते असलेल्या अजित पवारांनी शुक्रवारीच राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सह्या घेऊन ठेवल्या हाेत्या. ते पत्र राज्यपालांना देत भाजपला पाठिंबा देत असल्याचे सांगितले. राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची व अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. कुणालाही कानाेकान खबर लागू न देता हा साेहळा पार पडला.


माध्यमांमधून शपथविधीची खबर फुटताच मात्र 'राजकीय भूकंप' झाला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवारांच्या बंगल्याकडे धाव घेतली. काही वेळातच पवारांनी भाजपला पाठिंब्याचा निर्णय राष्ट्रवादीचा नसल्याचे स्पष्ट केल्याने अजितदादांनी बंड करून सत्ता मिळवल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली. अजितदादांनी अंधारात ठेवून राजभवनात नेलेल्या तीन आमदारांनाही हजर करून आम्ही पक्षासाेबतच असल्याचे वदवून घेतले. नंतर आमदारांची बैठक घेतली. त्यात दादांसाेबत गेलेले १६ पैकी धनंजय मुंडेंसह ९ आमदार परत आल्याचा दावा केला. राष्ट्रवादीचे ५४ पैकी ४२ आमदार रेनीसन्स हाॅटेलात ५ जण फाेनवर संपर्कात तर ७ नाॅट रिचेबल आहेत. सेनेचे आमदार ललित हाॅटेलात तर काँग्रेसचे आमदार भाेपाळला नेल्याची चर्चा आहे. दरम्यान, अजित पवारांची हकालपट्टी घटनाबाह्य असल्याचे भाजपचे आशिष शेलार म्हणाले.

दिव्य मराठीचे तीन प्रश्न


१) राष्ट्रपती राजवट राताेरात कशी हटवली?


२) पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्येची राज्यपालांनी खातरजमा का केली नाही?


३) महाराष्ट्राला अंधारात ठेवून मुख्यमंत्र्यांचा घाईघाईने शपथविधी का उरकला?

अजित पवारांची हकालपट्टी, जयंत पाटील नवे नेते

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रित सत्ता स्थापनेच्या तयारीत व्यग्र असताना शनिवारी सकाळी अजित पवारांनी राष्ट्रवादीचा गट फाेडून भाजपला सत्ता स्थापनेत मदत केली. राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. बहुमत सिद्ध करण्यास त्यांना ३० नाेव्हेंबरची मुदतही दिली. मात्र, काही वेळातच शरद पवारांनी बंड माेेडून काढत अजितदादांसाेबत गेलेले बहुतांश आमदार परत आणले. तसेच अजितदादांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टीही केली. आता जयंत पाटील यांना गटनेतेपदाचे सर्व अधिकार दिले आहेत.

राष्ट्रवादीचा आमदार शिवसेनेच्या कस्टडीत


अजितदादांसोबत गेलेले उदगीरचे आमदार संजय बनसोड यांना मुंबई एअरपोर्टजवळील सहार हॉटेलमधून शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ताब्यात घेतले. यानंतर त्यांनी बनसोड यांना कारमध्ये बसवून थेट राष्ट्रवादीची बैठक सुरू असलेल्या वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये आणून सोडले.

संख्याबळाचे पत्र पाहून राज्यपालांनी सत्ता स्थापन करण्यास दाखवला हिरवा कंदील


भाजपकडे १०५ आमदार आहेत. अपक्षांसह त्यांच्याकडील आमदारांची संख्या ११९ वर आली आहे. त्यातच अजित पवार विधिमंडळ नेते असल्याने त्यांनी राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांच्या सह्यांचे दिलेले पत्र अधिकृत मानून राज्यपालांनी या दाेन्ही पक्षांना सत्तास्थापनेची संधी दिली. नियमानुसार राज्यपालांचा हा निर्णय वैधच ठरताे. मात्र, राष्ट्रपती राजवट उठवून नव्या सरकारसाठी त्यांनी दाखवलेली 'तत्परता' मात्र टीकेचा विषय ठरली आहे.

वर्षावर होमहवन? व्हिडिओ व्हायरल


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही पुजाऱ्यांसह होमहवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शनिवारी सकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी वर्षा बंगल्यावर शुक्रवारच्या उत्तररात्री पहाटे ४ च्या दरम्यान ही पूजा करण्यात आल्याची चर्चा आहे. मध्य प्रदेशातील 'राजसत्तेची देवी' बगलामुखी मां देवीची पूजा असल्याची चर्चा असली तरी त्याला दुजोरा मिळू शकलेला नाही.

फडणवीस सरकार बहुमत सिद्ध करू शकत नाहीच; राष्ट्रवादी- शिवसेना नेत्यांचा दावा...


सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पत्र अजित पवारांनी राज्यपालांना दिले असले तरी त्यापैकी बहुतांश आमदार काही तासांतच शरद पवारांकडे परत आले. त्यामुळे विधानसभेत बहुमताचा १४५ आमदारांचा आकडा फडणवीस सरकारला सिद्ध करता येणार नाही. त्यामुळे ३० नाेव्हेंबरपर्यंतच हे सरकार काेसळेल व काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या आघाडीचे सरकारच महाराष्ट्रात सत्तेत येईल, असा दावा शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे.