आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत सस्पेन्स; मुंबईत लगबग, भाजप-शिवसेनेत मात्र मंत्रिमंडळाची यादी तयार करण्याची घाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेनेची ताठर भूमिका अन‌् भाजपच्या निर्णयाचे गूढ कायम असल्याने विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर १२ व्या दिवशीही सत्तास्थापनेचे काेडे सुटू शकले नाही. दाेन्ही पक्षांतील नेत्यांच्या चर्चेतून मार्ग निघत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साेमवारी दिल्लीत धाव घेऊन भाजपाध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची वेगवेगळी भेट घेऊन ‘मार्गदर्शन’ घेतले. ‘लवकरच नवे सरकार स्थापन हाेईल, याची खात्री बाळगा,’ एवढेच पत्रकारांना सांगून फडणवीसांनी सस्पेन्स कायम ठेवला. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधींशी चर्चा केली. कालपर्यंत विराेधी बाकावर बसण्याची भाषा करणाऱ्या पवारांनी साेनियांच्या भेटीनंतर मात्र सरकार स्थापनेबाबत  काेणतीही ठाेस भूमिका जाहीर करणे टाळले. मंगळवारी पुन्हा या दाेन्ही नेत्यांमध्ये चर्चा हाेणार आहे.  दरम्यान, अशा संभ्रमाच्या वातावरणातही युतीचेच सरकार सत्तारूढ हाेईल, असा विश्वास भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना वाटताे. याच आशेने मुंबईत दाेन्ही पक्षांत मंत्र्यांची यादी तयार करण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी कितीही आेढाताण केली तरी उपमुख्यमंत्रिपदासह १६ मंत्रिपदे घेऊन शिवसेना सत्तेत येईल आणि शनिवारपर्यंत शपथविधी हाेईल, असा दावा भाजपमधून केला जात आहे.

ठरल्याप्रमाणे निर्णय घ्या; मुख्यमंत्र्यांना अमित शहांचा सल्ला
आेल्या दुष्काळाने हाेरपळलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी साेमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. याच भेटीदरम्यान महाराष्ट्रात सत्तास्थापनेत निर्माण झालेल्या अडचणी व शिवसेनेची ताठर भूमिका याविषयीही त्यांनी शहांना माहिती दिली. यानंतर फडणवीसांनी गडकरी यांचीही भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले. ‘उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून ठरल्याप्रमाणे निर्णय घ्यावा आणि या आठवड्यातच सत्ता स्थापन करावी,’ असे अमित शहांनी फडणवीसांना सांगितल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली. तर ‘माताेश्री’शी चांगले संबंध असलेले गडकरी आता शिवसेनेशी चर्चेसाठी पुढाकार घेतील, अशी चर्चाही सुरू झाली आहे.

शिवसेनेकडून सत्तेबाबतचा प्रस्तावच आला नाही : शरद पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही साेमवारी सायंकाळी काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधींशी चर्चा केली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बाेलताना शरद पवार म्हणाले, ‘महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत आम्ही चर्चा केली. राज्यातील नेत्यांशी बाेलल्यानंतर उद्या पुन्हा चर्चा हाेणार आहे. नंतरच याेग्य ताे निर्णय घेतला जाईल. सत्तेत जाण्याएवढे संख्याबळ आमच्याकडे नाही. शिवसेनेनेही आम्हाला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच येत नाही. संजय राऊत १७० आमदार त्यांच्याकडे असल्याचे कसे सांगतात हे मला माहीत नाही. बहुधा त्यांच्याकडे भाजपचे आमदार असतील,’ असा टाेलाही पवार यांनी लगावला. दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसही अनुकूल नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्याचा मूड भाजपविराेधीच
जनतेचा मूड भाजपविराेधी असल्याचे या निवडणुकीतून दिसून आले. ही बाब आम्ही साेनिया गांधींच्या कानावर घातली आहे. भाजप- शिवसेनेला जनादेश मिळालेला आहे. माेठा पक्ष म्हणून सरकार स्थापन करण्याची जबाबदारी भाजपची आहे. तसे न झाल्यास काय करायचे, याचा निर्णय काँग्रेस पक्षाशी बोलून आम्ही घेऊ, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

लवकर सरकार स्थापन व्हावे; शिवसेनेचा अडथळा नाहीच; संजय राऊत यांचा राज्यपालांना शब्द
इकडे मुंबईतही शिवसेना खासदार संजय राऊत आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सायंकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.  पत्रकारांशी बोलताना खासदार राऊत म्हणाले, ‘आमची सदिच्छा भेट होती, यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. राज्यपालांना बाळासाहेब ठाकरे यांचे ‘फटकारे’ आणि उद्धव ठाकरेंचे एक अशी दोन पुस्तके भेट दिली. सरकार स्थापनेत शिवसेना अडथळा ठरत नाही, असे स्पष्ट करतानाच  राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावे, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे.’ दरम्यान, यानंतर राऊत यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राज्यपालांशी झालेल्या चर्चेची माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...