आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंका चतुर्वेदी, राजीव सातव यांच्यासह फौझिया खान यांनी भरला राज्यसभेचा उमेदवारी अर्ज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसकडून राजीव सातव आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून फौझिया खान यांनी शुक्रवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. 26 मार्च रोजी राज्यसभा निवडणूक होणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी आधीच आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागा 2 एप्रिलपासून रिक्त आहेत. त्यासाठीच ही निवडणूक होत आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शुक्रवारी अर्थात 13 मार्च ही शेवटची तारीख होती. याच तारखेला काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

राज्यसभा निवडणुकीत शिवसेना, भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजी
राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी देत असताना शिवसेना आणि भाजपच्या गोटात नाराजी दिसून आली. शिवसेनेने माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांना डावलून काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली. यावर खैरेंनी माध्यमांसमोर आपली छुपी नाराजी व्यक्त केली. प्रियंका चतुर्वेदी यांचे काम दिसले आणि माझे काम दिसले नसेल अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी दर्शवली. तर दुसरीकडे, भाजपकडून तीन उमेदवार जाहीर करण्यात आले. यात तिसऱ्या उमेदवारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या नावावर आग्रही असल्याचे म्हटले होते. परंतु, ऐनवेळी औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यावरून एकनाथ खडसे नाराज दिसून आले.