आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दलित' शब्दावर मराठी भाषा विभागाची काट, आता 'उपेक्षितांचे साहित्य' असा शब्दप्रयाेग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्याच्या मराठी भाषा विभागाने आपल्या सर्व व्यवहारातून 'दलित' शब्द हद्दपार केला आहे. दलित साहित्याला दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची नावे बदलण्यात आली असून 'दलित'ऐवजी 'उपेक्षितांचे साहित्य' असे संबोधन वापरण्यात यावे, असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मराठी भाषा विभाग हा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ चालवते. या मंडळामार्फत चांगल्या साहित्यकृतींना उत्तेजन देण्यासाठी दरवर्षी पुरस्कार देण्यात येतात. प्रौढ विभागात दलित साहित्य कलाकृतीस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हा एक लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येत असतो. मात्र भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३४१ अन्वये राष्ट्रपतींनी 'दलित' शब्दाऐवजी 'अनुसूचित जाती' किंवा 'नवबौद्ध' हा शब्द वापरण्याचे नुकतेच निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने सप्टेंबर २०१९ मध्ये एक परिपत्रक काढून शासनाच्या सर्व विभागास सरकारी व्यवहार, प्रमाणपत्रे, प्रकरणे इत्यादींमध्ये दलित शब्द न वापरण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याची अंमलबजावणी मराठी भाषा विभागाने या शासन निर्णयाद्वारे केली आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने दलित साहित्यकृतीस दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे आजपर्यंतचे नाव 'दलित साहित्य-लाेकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार' असे होते. ते आता उपेक्षितांचे साहित्य (शोषित, पीडित, आदिवासी, कष्टकरी, अनुसूचित जाती, नवबौद्ध) लाेकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार असे झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...