आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राच्या वाट्याच्या गुजरातकडे वाहून जाणाऱ्या पाण्याची मोजणी, नियाेजनाचे आदेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - दमणगंगा-नार-पार खोऱ्यातील महाराष्ट्राच्या भूमीवर पडणाऱ्या आणि गुजरातला वाहून जाणाऱ्या पाण्याची मोजणी आणि नियोजन करण्याचे आदेश राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांंनी दिले. नदी जोड प्रकल्पांअंतर्गत महाराष्ट्र व गुजरात राज्यांमधील दमणगंगा-पिंजाळ व पार-तापी-नर्मदा या दोन आंतरराज्यीय योजनांच्या करारावर गुजरातच्या स्वाक्षऱ्या होण्याआधी महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी दुष्काळी भागाला वळविण्याच्या उद्देशाने मंत्रालयात ही बैठक झाली. अन्न व नागरी पुरवठा मंंत्री आणि नाशिकचे पालक मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून झालेल्या या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जलसंपदा सेलच्या वतीने प्रस्तावित योजनांना सुधारित पर्याय मांडण्यात आले. याचा आधार घेऊन दोन महिन्यात पुढील प्रस्ताव तयार करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री पाटील यांनी दिले. केंद्र सरकारने १९८० साली तयार केलेल्या नॅशनल परस्पेक्टीव्ह प्लानमध्ये देशातील एकूण ३० आंतरराज्यीय नदी जोड योजनांची आखणी करण्यात आली होती. या योजनांपैकी महाराष्ट्र व गुजरात राज्यांमधील दमणगंगा-पिंजाळ व पार-तापी-नर्मदा या दोन आंतरराज्यीय योजना प्रस्तावित आहेत. महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यातील द्विपक्षीय सामंजस्य कराराच्या माध्यमातून महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकीच्या राजकारण पेटत होता. दरम्यान, गुजरातने त्या प्रस्तावित पाणी वाटप करारास अद्याप सहमती कळविली नसून, तत्पूर्वी, महाराष्ट्राच्या वाट्याचे ६८ टीएमसी पाणी नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांपासून मराठवाड्याकडे हे पाणी वळविण्याच्या उद्देशाने नियोजन करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. दमणगंगा-पिंजाळ या प्रकल्पातून मुंबई शहराला पिण्यासाठी ३१ टीएमसी, नार-पार-गिरणा प्रकल्पातून तुटीच्या तापी खोऱ्यात (गिरणा) १०.७६ टीएमसी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी व पार-गोदावरी नदीजोड प्रकल्पातून दुष्काळी गोदावरी खोऱ्यात १५.६० टीएमसी, उर्ध्व वैतरणा प्रकल्पातून दमणगंगा-पिंजाळ प्रकल्प पूर्ण झाल्यावर गोदावरी खोऱ्यात अतिरिक्त १० टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते, याकडे जलचिंतन सेलचेे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी मांडणी केली. या दृष्टीने सध्याच्या प्रस्तावांमध्ये सुधारणा केल्यास मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या दुष्काळी तालुक्यांसाठी ६८ टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते असे ते म्हणाले. यासाठी आवश्यक स्थानिक पाटबंंधारे प्रकल्पांना यात सामावून घेत, पाणी उपसण्यासाठी सौर उर्जाचा प्रकल्प व वळवण्यासाठी बोगदा प्रकल्प यांचाही यात समावेश करून घेण्याची सूचना जलसंपदा मंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली. येत्या दोन महिन्यात याबाबतचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह आ. दिलीप बनकर, आ. हिरामण खोसकर, आ. नितिन पवार, आ नरहरी झिरवाळ आणि आ. माणिकराव कोकाटे यावेळी या बैठकीत सहभागी झाले होते.

जलचिंतनने केल्या या सूचना
- दमणगंगा - पिंजाळ लिंक प्रकल्प - याऐवजी दमणगंगा - गोदावरी लिंक केल्यास मराठवाड्याला फायदा होईल
- दमणगंगा-एकदरे-गोदावरी लिंक प्रकल्प - वेळेत डीपीआर केल्यास नाशिक जिल्ह्याला ५ टीएमसी पाणी मिळेल
- आडगाव (वाल) - वैतरणा - गोदावरी लिंक प्रकल्प - दमणगंगा - गोदावरी लिंकमध्ये समावेश केल्यास मराठवाड्याला फायदा
- मोखाडा (वाघ) - वैतरणा लिंक प्रकल्प - डीपीआर तयार केल्यास दमणगंगा - गोदावरी लिंकद्वारे मराठवाड्याला पाणी मिळू शकते
- वैतरणा - जायकवाडी लिंक प्रकल्प - दमणगंगा - गोदावरील लिंकद्वारे मराठवाड्याला पाणी मिळू शकते
- पार-गोदावरी (उनंदा) लिंक प्रकल्प -  सुधारिक डीपीआर लागू केल्यास चांदवड- येेवला - नांदगावला पाणी मिळू शकते
- नार - पार - गिरणा लिंक प्रकल्प, डीपीआरमध्ये दुरुस्ती करावी

बातम्या आणखी आहेत...