आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्तीच्या आखाड्यात महाराष्ट्रातील रणरागिणींचे वर्चस्व!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुस्ती हा महाराष्ट्रातील अस्सल मातीतला रांगडा खेळ. मर्दानी खेळ म्हणूनच याची पारंपरिक आेळख. त्यामुळेच प्रचंड मेहनतीने कमावलेले शरीर आणि आत्मसात केलेली चपळता. यातूनच तळागाळातील मल्लांनी जागतिक पातळीवर मराठमाेळ्या कुस्तीचा झेंडा फडकवला. ही जबाबदारी आता माेठ्या धाडसाने पेलण्यासाठी महाराष्ट्राच्या रणरागिणी मैदानावर उतरल्या आणि वाघाच्या चपळाईने आॅलिम्पिक स्वप्नपूर्तीचा निर्धार केला. यातूनच कुस्तीच्या मॅटवरही आता महाराष्ट्रातील रणरागिणींचे वर्चस्व निर्माण हाेत आहे.  खास आखाड्यात महिला मल्लांच्या प्रतिभेला चालना देण्यासाठी पहिल्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या कौशल्या वाघ यांनी पुढाकार घेतला.  


ग्रामीण महाराष्ट्रात महिलांची कुस्ती रुजवण्यासाठी अकलूज (जि. सोलापूर) येथील ताराराणी महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली. येथे प्रतिभावंत मल्ल घडवण्यासाठी खास प्रशिक्षक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. महिलांच्या कुस्तीसाठी पहिला शिवछत्रपती पुरस्कार मिळवणाऱ्या कौशल्या वाघ येथे तरबेज असे कुस्तीपटू तयार करत आहेत. महिलांना महाराष्ट्र केसरीचे स्वप्न दाखवणारे कुस्ती केंद्र म्हणूनही या कुस्ती केंद्राकडे पाहिले जात आहे. 


महिलांची कुस्ती म्हटलं की ग्रामीण भागात विराेध दर्शवला जाताे. शहरात या खेळाला आता पसंती दर्शवली जाते. त्यामुळे ही विषमतेची सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी  शीतलदेवी मोहिते यांनी महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला.  

पाच महिला प्रशिक्षकांचे खास मार्गदर्शन : या प्रशिक्षण केंद्रात कोच म्हणून कौशल्या वाघ यांना जबाबदारी देण्यात आली. कौशल्या वाघ म्हणजे महाराष्ट्राच्या महिला कुस्ती क्षेत्राला पडलेले गोड स्वप्न आहे. महाराष्ट्रात केवळ पाच महिला  एनआयएस कोच आहेत. कौशल्या वाघ (अकलूज), अश्विनी बोराडे (पुणे), माधुरी घराळ (कोल्हापूर), शबनम शेख (औरंगाबाद) आणि अंजली देवकर (अहमदनगर). असे  प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षिका अकलूजच्या ताराराणी कुस्ती केंद्राला लाभल्याने या कुस्ती केंद्रातील महिला मल्लांनी केवळ आठ महिन्यांत राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली आहे. त्याशिवाय राज्य व जिल्हा स्तरावर येथील अनेक मुली कुस्तीमध्ये झळकल्या आहेत. कुस्तीचे धडे घेणाऱ्या मुलींना शिक्षणाच्याही चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. 


तंत्रशुद्ध प्रशिक्षणाने उंचावला कामगिरीचा दर्जा
काेच कौशल्य वाघ या माती आणि मॅटवरील कुस्तीत तरबेज आहेत. बबलू यादवसारख्या नामांकित मल्लास आस्मान दाखवणारी ही रणरागिणी येथील मुलींमध्ये कुस्तीची ऊर्मी ठासून भरत आहे. या ठिकाणी मॅट व मातीतील कुस्तीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जात आहेत. त्याशिवाय जिम, रखडी व्यायाम, संतुलित आहार या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष दिले जात असल्याचे कौशल्या यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...