आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Maharashtra Won 56 Gold Medals And 156 Medals In The Khelo India Youth Competition

खेलो इंडियात व्यंगावर मात करून धनुषचा सुवर्णवेध; महाराष्ट्र संघ 56 सुवर्णपदकांसह 156 पदके पटकावून राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल स्थानावर 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- 'खेलो इंडिया' यूथ गेम्समध्ये राष्ट्रीय पातळीवरील नामांकित प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान पेलत तेलंगणाच्या १६ वर्षीय धनुष श्रीकांतने (१६) १० मीटर एअर रायफल स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात रविवारी सुवर्णपदकाचा वेध घेतला. धनुषची ही कामगिरी आणि जिद्द अधिक कौतुकास्पद ठरली, कारण जन्मत:च कर्णबधिर आणि स्पष्टोच्चाराचा अभाव अशा व्यंगावर मात करत त्याने हे यश मिळवले. 

 

मुलाच्या व्यंगामुळे धनुषचे वडील चिंताक्रांत असत. यादरम्यान त्याच्या कानावर शस्त्रक्रिया झाली आणि मशीन बसवल्यावर ऐकू येऊ लागले. तो सामान्य मुलांसारखा शाळेत जाऊ लागला. त्याचा क्रीडा क्षेत्राकडे असलेला कल आणि फुटबॉल, हॉलीबॉलचा छंद त्याच्यातील हे क्रीडागुण दाखवत होता. त्याला चित्रपटाचीही आवड होती. पडद्यावरील हीरो हाती बंदूक घेऊन गोळ्या चालवे तेव्हा आपणही असे नेमबाज व्हावे, असे धनुषला वाटू लागले. 

 

गगन नारंग अकॅडमीत प्रशिक्षण : 
हैदराबादमधील ऑलिम्पियन गगन नारंगच्या अकॅडमीत धनुषने प्रशिक्षण घेतले. १० मीटर एअर रायफलमध्ये तो पारंगत झाला. हे कौशल्य त्याला पुण्यातील स्पर्धेत कामी आले. २४८.९ गुणांसह १० मीटर एअर रायफलमध्ये त्याने सुवर्ण पटकावले. 

 

आंतरराष्ट्रीय नेमबाजीचे स्वप्न : 
धनुषचे वडील परदेशात आहेत. आई आशा श्रीकांतने धनुषकडे लक्ष देताना यावे म्हणून शिक्षिकेची नोकरी सोडली. आशा म्हणतात, एरवी धनुष खूप मस्ती करतो. मात्र शूटिंग करताना तो गंभीर असतो. स्पष्ट ऐकू येत नाही याची त्याला खंत वाटत नाही. तो आंतरराष्ट्रीय नेमबाज व्हावा हे आपले स्वप्न असल्याचे त्या सांगतात. 

 

नाशिकच्या दिलीप गावितची कामगिरी 
ताेरणडाेंगरीच्या (जि. नाशिक) दिलीप गावितला लहानपणी हाताला गंभीर दुखापत झाली. परिस्थिती बेताची असल्याने याेग्य उपचार घेता आले नाहीत. परिणामी डावा होत काेपरापासून काढावा लागला. मात्र त्याची जिद्द पाहून प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी १३ वर्षांचा असताना त्याचे पालकत्व स्वीकारले. ३ स्टेट चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्ण पटकावले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...