आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : "तुमच्यामध्ये जर अभिनयाचा किडा असेल, जर तुम्हाला अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी एक उत्तम मंच हवा असेल, जर तुम्हाला मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून मार्गदर्शन हवं असेल. तर 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' हा कार्यक्रम पुन्हा एकदा ही संधी घेऊन आला आहे."
या कार्यक्रमाने १० वर्षांपूर्वी अनेक उदयोन्मुख कलाकारांसाठी उत्तम मंच उपलब्ध करून दिला. या मंचाने अनेक कलाकार देखील दिले आहेत जे आज त्यांच्या कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. अभिनय क्षेत्रात येण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला हवा हवासा असलेला हा मंच पुन्हा एकदा येतोय ही सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावेळी देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक टॅलेंटेड युवकांना आपली कला सादर करण्याची ही सुवर्ण संधी मिळेल. या मंचावरून पुढे आलेला अभिनेता अभिजीत खांडकेकर नव्या पर्वाच सूत्रसंचालन करताना पाहायला मिळेल. पण या कार्यक्रमाचं परीक्षण कोण करणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. सगळ्यांचे लाडके दिगदर्शक संजय जाधव आणि अभिनेते मकरंद देशपांडे हे या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसतील. संजय जाधव यांनी मराठी सिनेसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांची हटके स्टाईल आणि प्रतिभा त्यांच्या चित्रपटातून झळकते. सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शन आणि अभिनेता या सर्व भूमिका संजय जाधव यांनी निभावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कडून स्पर्धकांना चांगलंच मार्गदर्शन मिळेल यात शंकाच नाही. 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' हा कार्यक्रम १५ जानेवारी पासून बुधवार - गुरुवार रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
या कार्यक्रमाबद्दल बोलताना संजय जाधव म्हणाले, "मी या कार्यक्रमासाठी खूप उत्सुक आहे. मी जरी परीक्षकाची भूमिका निभावत असलो तरीही मी कुठलही दडपण घेतलं नाही आहे. हा एक उत्तम मंच आहे आणि स्पर्धकांनी त्यांच्या टॅलेंटच चांगल्याप्रकारे सादरीकरण करून स्पर्धेत पुढे जावं हेच मी त्यांना सांगू इच्छितो."
अभिनेते मकरंद देशपांडे यांचे टेलिव्हिजनवर पुनरागमन
रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावरचा अवलिया कलाकार म्हणून मकरंद देशपांडे ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत अभिनयात मोजक्याच तरीही लक्षवेधक, हटके आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. जवळपास ५० पेक्षा जास्त हिंदी नाटके लिहिणारे मकरंद देशपांडे यांनी मराठी रंगभूमीवरदेखील अभिनयाचा श्रीगणेशा केला. पण आता मकरंद टेलिव्हिजनवर पुनरागमन करून एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. "महाराष्ट्राचा सुपरस्टार" या कार्यक्रमाच्या परीक्षणाची धुरा मकरंद देशपांडे सांभाळणार आहेत. दिग्दर्शक संजय जाधव यांच्या सोबत मकरंद देशपांडे या स्पर्धेत परीक्षकाची भूमिका निभावतील. हा कार्यक्रम १५ जानेवारी सुरू होणार आहे. या कार्यक्रमाबद्दल बोलताना मकरंद देशपांडे म्हणाले, या मंचाने याआधी बरेच कलाकार या इंडस्ट्रीला दिले आहेत. आता हा मंच पुन्हा एकदा अनेकांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी सज्ज आहे. स्पर्धा कठीण आहे पण ती तितकीच रंजक पण असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.