आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Maharashtra's Best Performance In Khelo India Competition; Wins 41 Gold Medal 

गत चॅम्पियन हरियाणाला मागे टाकत महाराष्ट्राचे पदकांचे शतक; 41 सुवर्णांसह सर्वाेत्तम कामगिरी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- यजमान महाराष्ट्र संघाने आपला दबदबा कायम ठेवताना खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये शनिवारी पदकांचे शतक साजरे केले. यासह महाराष्ट्र संघाचे वर्चस्व अबाधित राहिले. यादरम्यान आता महाराष्ट्राच्या नावे ११६ पदकांची नाेंद झाली. यात ४१ सुवर्ण, ३३ राैप्य अाणि ४२ कांस्यपदकांचा समावेश आहे. याच स्पर्धेत राजस्थानचे प्रतिनिधित्व करत असलेल्या मानवआदित्य राठाेडने सुवर्णपदकाचा वेध घेतला.त्याने शाॅर्टगन ट्रॅप प्रकारात हे साेनेरी यश मिळवले. ताे ऑलिम्पियन पदक विजेते आणि केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठाेड यांचा मुलगा आहे. महाराष्ट्र संघाने वेगाने प्रगती साधताना गत चॅम्पियन हरियाणा टीमला मागे टाकले. महाराष्ट्राने सर्वाेत्तम कामगिरी करताना ११६ पदकांची कमाई केली. महाराष्ट्राची ही गत स्पर्धेपेक्षा यंदाची कामगिरी सर्वाेत्तम ठरली. गत स्पर्धेत हरियाणा टीमचे १०२ पदके हाेती. 

अॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्रासह नाशिकच्या खेळांडूनी आपले वर्चस्व निर्माण केले आहे. ५००० मीटर स्पर्धेत सुवर्ण पटकावणारी नाशिकची धावपटू पूनम सोनुनने शनिवारी याच कामगिरीत सातत्य ठेवत २१ वर्षांच्या आतील गटात ३००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले.तर जिम्नॅस्टिकमध्ये अदिती दांडेकरने सुवर्ण, एरिक डे याने एक सुवर्ण व एका रौप्यपदकाची कमाई केली. महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमुळे शनिवारीपर्यंत महाराष्ट्राने ४१ सुवर्णपदक आपल्या नावावर केली. याच कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने स्पर्धेच्या पाचव्याच दिवशी पदकांचे शतक गाठले असून ४१ सुवर्णांसह ११६ पदक पटकावत आयोजक महाराष्ट्राने दावेदारी सिद्ध केली आहे. 

 

पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेेेल्या खेलो इंडिया स्पर्धेने शनिवारी निम्मा टप्पा गाठला आहे. या स्पर्धेत वेटलिफ्टिंग, अॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, स्विमिंग, कुस्ती या सर्वच प्रकारांत सुवर्णपदक मिळवत या स्पर्धेतील पदक तालिकेत आघाडी कायम ठेवली आहे. शनिवारी झालेल्या अॅथलेटिकमध्ये ३००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत नाशिकच्या पूनम साेनुनेने २१ वर्षांखालील गटात ३००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत १०:११.३३ सेकंद अशी वेळ नोंदवत रौप्य पटकावले.तसेच २१ वर्षे आतील गटात पूनम रावरे हिने १४.०७ मीटरची नोंद करत रौप्यवर नाव कोरले. 

 

तीन हजार मीटर्समध्ये पूनमला रौप्य : 
महाराष्ट्राच्या पूनम सोनुनेने तीन हजार मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले. तिला हे अंतर पार करण्यास १० मिनिटे ११.३३ सेकंद वेळ लागला. उत्तर प्रदेशच्या रेबी पाल हिने ही शर्यत १० मिनिटे ९.८८ सेकंदांत जिंकली. 

 

केंद्रीय क्रीडामंत्र्यांचा मुलगा मानवादित्यसिंह राठोड याला नेमबाजीत सुवर्ण : 
ऑलिंपिक स्पर्धेत स्थान मिळविणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी खेलो इंडिया हे उत्तम व्यासपीठ आहे, असे आंतरराष्ट्रीय नेमबाज मानवादित्यसिंह राठोड याने सांगितले. मानवादित्य हा केंद्रीय क्रीडा मंत्री व ऑलिंपिक रौप्यपदक विजेते नेमबाज राजवर्धनसिंह राठोड यांचा मुलगा आहे. त्याने येथे शनिवारी झालेल्या २१ वषार्खालील ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक मिळविले. 

 

गत स्पर्धेत हरियाणा संघाची हाेती ३८ सुवर्णांसह १०२ पदके, महाराष्ट्र ३६ सुवर्ण 
खेलाे इंडिया यूथ गेम्समध्ये शाॅर्टगन ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकाचा वेध घेताना मानवआदित्य. दुसऱ्या छायाचित्रात जिम्नॅस्टिक प्रकारात काैशल्य सादर करताना राैप्यपदक विजेती किमया कदम. 

 

वेटलिफ्टिंग : निखिलला सुवर्णपदक 
मुलांच्या २१ वर्षांखालील ८९ किलो गटात निखिल तुगनेट या पंजाबच्या खेळाडूने स्नॅचमध्ये १३४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १६० किलो असे एकूण २९४ किलो वजन उचलले. हरियाणाच्या मनीषकुमार याने अनुक्रमे १३० किलो व १५६ किलो असे एकूण २८६ किलो वजन उचलले आणि रौप्यपदक पटकावले. १७ वर्षांखालील ८९ किलो वजनी गटात तेलंगणाच्या कार्तिकने सुवर्णपदक जिंकले. त्याने स्नॅचमध्ये ११२ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १४६ किलो असे एकूण २५८ किलो वजन उचलले. भोला सिंगने खेळाडूने स्नॅचमध्ये ९८ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १२१ किलो असे एकूण २१९ किलो वजन उचलले. पंजाबच्या गुरकरणला कांस्य मिळाले. त्याने स्नॅचमध्ये ९५ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ११८ किलो असे एकूण २१३ किलो वजन उचलले. 

 

जलतरण : यजमानांचा सुवर्ण चौकार 

महाराष्ट्राच्या अपेक्षा फर्नांडिस हिने १७ वर्षांखालील गटात चारशे मीटर्स मिडले शर्यत ५ मिनिटे २३.३६ सेकंदांत जिंकली. या शर्यतीत महाराष्ट्राच्या सिया बिजलानी हिचे ब्राँझपदक थोडक्यात हुकले. याच वयोगटात महाराष्ट्राच्या केनिशा गुप्ता हिने १०० मीटर्स फ्रीस्टाइल शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले. तिने हे अंतर ५९.७८ सेकंदांत पार केले. मुलींच्या २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या साध्वी धुरी हिने शंभर मीटर्स फ्रीस्टाइल शर्यतीचे विजेतेपद पटकावले. तिला ही शर्यत पूर्ण करण्यासाठी एक मिनिट १.०२ सेकंद वेळ लागला. पंधराशे मीटर्स फ्रीस्टाइल शर्यतीत ऋतुजाने रौप्यपदक पटकावले. तिने हे अंतर १८ मिनिटे ५३.३६ सेकंदांत पूर्ण केले.

तामिळनाडूच्या भाविकाने ही शर्यत १८ मिनिटे १३.०७ सेकंदांत पूर्ण करीत सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राला शनिवारी चौथे सुवर्णपदक मिहिर आम्ब्रे याने जिंकले. त्याने २१ वर्षांखालील गटात शंभर मीटर्स बटरफ्लाय शर्यतीला ५६.१० सेकंद वेळ लागला. ४०० मीटर्स फ्रीस्टाइल शर्यतीत महाराष्ट्राच्या सुश्रुत कापसे याला रौप्यपदक मिळाले. 

 

कुस्तीत दबदबा कायम; चार कांस्यपदके जिंकली 
महाराष्ट्राच्या मल्लांना कुस्तीमधील २१ वर्षांखालील गटात केवळ चार कांस्यपदकांवर समाधान मानावे लागले. फ्रीस्टाइल विभागाच्या या स्पर्धेतील ५७ किलो गटात जोतिबा अटकाळे याला कांस्यपदक मिळाले. ६५ किलो गटात देवानंद पवार याला कांस्यपदकाची कमाई झाली. ९७ किलो गटात विक्रम पारखी याने ब्राँझपदक पटकावले. ७१ किलो गटात सागर शिंदे यालाही ब्राँझपदक मिळाले. 

 

एरिकला सुवर्णपदक 
मुलांच्या २१ वर्षांखालील पॉमेल हॉर्स प्रकारात एरिक डे या महाराष्ट्राच्या खेळाडूने सुवर्णपदक पटकावले. त्याने ११.७० गुण नोंदवले. दिल्लीचा शिवमकुमार याने ११.५५ गुणांसह रौप्यपदक मिळवले. अग्निवेश पांडे या उत्तर प्रदेशच्या खेळाडूला ब्राँझपदक मिळाले. त्याने ११.४० गुण मिळवले. फ्लोअर एक्झरसाइजमध्ये महाराष्ट्राच्या एरिक डे याने रौप्यपदक मिळवले. त्याने १२.४० गुण नोंदले. उज्ज्वल नायडू या कर्नाटकच्या खेळाडूने १२.५० गुणांसह सुवर्णपदक

मिळवले, तर उत्तर प्रदेशच्या अग्निवेश पांडे याने १२.१० गुणांसह ब्राँझपदक पटकावले. 

 

जिम्नॅस्टिक : अदितीला सुवर्णपदक 
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिम्नॅस्टिकमध्ये आपला दबदबा कायम राखला. त्यांच्या अदिती दांडेकर हिने २१ वर्षांखालील रिबन्स प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तिने ४६.४० गुण नोंदवले. तिची सहकारी किमया कदम हिने ४१ गुणांसह रौप्यपदक पटकावले. तेलंगणाच्या मेघनाला कांस्यपदक मिळाले. तिने ३९.३० गुण नोंदवले. व्हॉल्टमध्ये त्रिपुराच्या अस्मिता पॉल हिने सुवर्णपदक नोंदवताना १२.७५० गुणांची नोंद केली. पश्चिम बंगालच्या स्वस्तिस्का (१२.६७५ गुण) व पूजा नास्कर (११.६२५ गुण) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य मिळाले. 
 

बातम्या आणखी आहेत...