आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - केरळ पूरग्रस्तांसाठी २० काेटी रुपयांची तातडीची अार्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी जाहीर केली. त्याचबराेबर तब्बल ११ टन अन्नपुरवठा केरळला पाठवण्यात येणार अाहे. विविध सामाजिक संघटना तसेच स्वयंसेवी संस्थांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यावा या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या अावाहनाला प्रतिसाद देत अनेक संघटनांनी या कामी पुढाकार घेतला अाहे.
सरकारी कर्मचाऱ्यांनीदेखील अापला एक दिवसाचा पगार केरळमधील मदत कार्यासाठी दिला अाहे. गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये हाेत असलेल्या अतिवृष्टीमुळे माेठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी झाली अाहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सचिवालयाच्या पुढाकाराने राज्य अापत्ती व्यवस्थापन कक्षाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची शनिवारी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत एका विशेष पथकाची नियुक्ती करण्यात अाली अाहे. या पथकावर समन्वय अाणि कार्यवाहीची जबाबदारी साेपवण्यात अाली अाहे. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार केरळ सरकारशी सतत संपर्कात असून त्यांना अावश्यक ते सर्व सहकार्य देण्यात येत अाहे.
केरळमधील पूरग्रस्तांसाठी अन्न पुरवठा तसेच इतर मदत करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून त्यासाठी सर्व स्तरातील सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी, असे अावाहन फडणवीस यांनी केले. त्याला प्रतिसाद देताना एमसीएचअाय- क्रेडाई या बांधकाम क्षेत्रातील संघटनेने दीड काेटी रुपये किमतीचे अन्न उपलब्ध करून दिले अाहे. अातापर्यंत ६ टन अन्नपुरवठा शनिवारी पाठवण्यात अाला आहे. दरम्यान, काँग्रेस आमदार एक महिन्यांचे वेतन देणार आहेत.
पुण्यामधून जलदूत रेल्वे केरळला रवाना; २९ वॅगनमधून पाणी रवाना
केरळमधील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणेही कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मध्ये रेल्वेच्या पुणे विभागाकडून केरळमधील नागरिकांसाठी १४ वॅगनमध्ये ७ लाख लिटर शुद्ध पिण्याचे पाणी पाठवण्यात आले. तसेच रेल्वेच्या रतलाम स्थानकातून १५ वॅगन भरून १४ लाख ५० हजार लिटर पाणी पुण्यात विशेष रेल्वेने आणून ते शनिवारी पुण्याहून केरळला रवाना करण्यात आले.
राज्यातील दीड लाख सरकारी अधिकारी देणार १ दिवसाचा पगार
पूरग्रस्तांना दीड लाख सरकारी अधिकारी अाॅगस्ट महिन्याच्या पगारातून एक दिवसाचा पगार या देणार आहेत. नैसर्गिक अापत्तीच्या वेळी सरकारी अधिकाऱ्यांनी यापूर्वीही एक दिवसाचा पगार अनेकदा दिला अाहे. केरळ पूरग्रस्तांसाठी एक दिवसाचा पगार कर्तव्यभावनेतून परस्पर कापून घ्यावा, असा प्रस्ताव महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाने सरकारला दिल्याची माहिती मुख्य सल्लागार ग.दि. कुलथेंनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.