आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‌व्होट बँक, गुन्हेगारी राजकारणाने महाराष्ट्राचे नुकसान : नरेंद्र मोदी; मोदींच्या हल्ल्यात शरद पवार, अजितदादा, प्रफुल्ल पटेल टार्गेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेश जोशी 

अकोला - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोल्यातील प्रचारसभेत एका बाणात राष्ट्रवादीच्या तीन बड्या नेत्यांवर नाव न घेता निशाणा साधला. पाच वर्षांपूर्वी केलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होण्याच्या भीतीने या नेत्यांनी तपास यंत्रणांना बदनाम करण्याचे काम सुरू केले. याच नेत्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या गुन्हेगारांना पळून जाण्यास मदत केली. आता या गुन्हेगारांसोबत त्यांचे व्यावसायिक संबंध उघड होत आहेत. सिंचनाच्या नावावर झालेल्या भ्रष्टाचारामुळे राज्य कित्येक दशके मागे गेल्याचा आरोप करतानाच राज्य त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असे मोदी यांनी ठासून सांगितले. तर ३७० च्या मुद्द्यावर प्रश्न विचारणाऱ्यांंना लाज कशी वाटत नाही, असा खाेचक सवालही त्यांनी केला.

अकोला येथे चार जिल्ह्यांतल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मोदी बोलत होते. मोदी म्हणाले, कधीकाळी महाराष्ट्रात सातत्याने बाॅम्बस्फोट होत होेते. मुंबई हादरून जायची. मात्र, या प्रकरणातील मास्टरमाइंड शत्रुराष्ट्रात पळून गेले. एवढे मोठे गुन्हेगार कसे पळून गेले? राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे नाव न घेता ते म्हणाले, इतिहासाची पाने परत उघडू लागली आहेत. या गुन्हेगारांशी कोणाचे कसे व्यावसायिक संबंध होते, हे उघड होत असून व्होट बँकेच्या या राजकारणाने महाराष्ट्राचे नुकसान केले आहे.
 

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट धोरणाने पीछेहाट
अजित पवार यांचे नाव न घेता मोदी म्हणाले, पाच वर्षांपूर्वीपर्यंत सिंचन क्षेत्रातील योजनांच्या नावावर राज्यात काय खेळ व्हायचे, हे तुम्ही पाहिलेे. युतीपूर्वीच्या सरकारचे आपले कल्याण आणि आपल्या कुटुंबाचे कल्याण हे एकमेव धोरण होते. या धोरणामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टवादी युतीने महाराष्ट्राला अनेक दशके मागे ढकलले आहे.
 

३७० बाबत विचारणाऱ्यांना लाज कशी वाटत नाही?
मोदी म्हणाले, ३७० वर तुम्ही खुश पण ते दु:खी आहेत. त्यांना विभागलेला, विखुरलेला भारत पाहिजे. हीच त्यांची राजकीय चाल. ती संपली म्हणून दु:खी आहेत. ३७० चा, जम्मू-काश्मीरचा महाराष्ट्राशी संबंध काय, असे विचारताना त्यांना लाज कशी वाटत नाही? छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातला वीर जवान शत्रूंचे हल्ले परतवून लावत आहे. तेथे शांतता नांदावी म्हणून प्रत्येक देशवासी जवानासोबत आहे. असे असताना असा सवाल करण्याची ते हिंमतच कशी करतात? मतपेटीतून जनताच त्यांना उत्तर देईल. काँग्रेसने सावरकरांचा सतत अपमान केल्याची टीकाही त्यांनी केली.
 

आता वेळ बदलली आहे
शिखर बँकप्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात असलेले शरद पवार यांचे नाव न घेता मोदी म्हणाले, आपला भ्रष्टाचार उघड होणार हे लक्षात आल्याने या नेत्यांनी तपास यंत्रणा, तपास अधिकाऱ्यांना बदनाम करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, आता वेळ बदलली आहे. राज्यातील जनता त्यांच्या प्रत्येक कारनाम्याचा जबाब घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या याच कारनाम्यांना २०१४ मध्ये तुम्ही राज्य आणि केंद्रात भाजपचे सरकार आणून लगाम लगावला आहे. यंदा परत एकदा त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले जाणार आहे. 
 
 
 

बातम्या आणखी आहेत...