आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दिल्लीत अडकवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- मराठवाड्यातून रावसाहेब दानवे या एकमेव खासदाराला केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळातही त्यांनी शपथ घेतली होती, पण प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी नंतर राज्यमंत्रिपदावर पाणी सोडले होते. रावसाहेब हे महत्त्वाकांक्षी व्यक्तिमत्त्व आहे. केवळ खासदार म्हणून राहणे आता त्यांना मानवणारे नाही. देशात भाजपला मिळालेल्या यशाचा वाटा अमित शहांकडे गेला तसा राज्यात तो रावसाहेबांच्याही पदरात टाकावाच लागतो. अमित शहा यांना डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ मिळाली त्याच वेळी प्रदेशाध्यक्ष म्हणून रावसाहेबांनाही ती मिळाली आहे. डिसेंबरनंतर दोघांच्याही अस्तित्वाचा प्रश्न नको म्हणून मंत्रिपदे, असे हे गणित आहे. मराठवाड्यासारख्या प्रांतातून भाजप-सेनेला म्हणजे एनडीएला ७ खासदार मिळाले. त्यामुळे या प्रांताला प्रतिनिधित्व अपेक्षित होतेच. 

 

त्यात रावसाहेब म्हणजे अनुभवी नेता. या वेळी पाचव्यांदा ते खासदार झाले आहेत. इतका अनुभव असलेला अन्य खासदार मराठवाड्यात नाही. शिवाय महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असलेले मराठा प्रतिनिधित्व म्हणूनही दानवे उजवेच ठरतात. खरे तर त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात काम करणे फारसे आवडणारे नाही. त्यांचा खरा रस राज्यात (अन्य मराठी नेत्यांप्रमाणे) आहे. तेही एक कारण आहे की, त्यांना पहिल्याच शपथविधीच्या वेळी मंत्री करून दिल्लीत अडकवण्यात आले आहे.      


मागचा अनुभव 
२०१४ च्या पहिल्या मोदी मंत्रिमंडळात रावसाहेबांना ग्राहक कल्याण, अन्न आणि सार्वजनिक वितरण या खात्यांचे राज्यमंत्रिपद मिळाले होते. राज्यमंत्री हे अनेकांना फारसे प्रभावी नसलेले पद वाटत असते. पण अनेक राज्यमंत्र्यांनी उत्तम कामगिरी करून दाखवल्यामुळे पुढे त्यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळालेले आहे. अर्थात, त्यासाठी एक वेगळेच व्यक्तिमत्त्व लागते. रावसाहेब त्यातले नाहीत. त्यांनी स्वत:ची ओळख जाणीवपूर्वक ग्रामीण ढंगाचा नेता अशी ठेवली आहे. त्याच पद्धतीचे त्यांचे वागणे, बोलणे असते. त्यामुळेच मोदींच्या काॅर्पेारेट शाळेत रावसाहेबांचे मन रमत नव्हते. मोदींना अपेक्षित असलेल्या पद्धतीने त्यांना काम करणे जड जात होते. राज्य मंत्रिपदाचा राजीनामा देऊन ते आले तेव्हा ‘सुटलो एकदाचा’ अशीच त्यांची भावना होती. ती परिस्थिती आता किती बदलली असणार? त्यामुळे रावसाहेब एक सत्तेचे पद म्हणून त्याकडे पाहतील आणि जोवर दुसरी मोठी संधी येत नाही तोवर त्या पदावर टिकून राहण्याचा प्रयत्न करतील, असे दिसते. अर्थात, पुढची मोठी संधी म्हणजे नेमके काय, असा प्रश्न पडू शकतो. रावसाहेबांच्या निकटवर्तीयांना माहिती आहे की, एक दिवस या राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे ही त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. त्यासाठी यंदा लोकसभा न लढता विधानसभा निवडणूक लढायची, असाही विचार ते करीत असल्याचे सांगण्यात येत होते. पण ठरवून त्यांना लोकसभेत पाठवण्यात आले आहे.   


मराठवाड्याचे नेते व्हावेत..
कोणत्याही उद्देशाने आणि विचाराने रावसाहेब दानवेंना केंद्रात मंत्रिपद देण्यात आले असले तरी त्याचा लाभ घेत मराठवाड्याचे नेते अशी छबी त्यांनी तयार करावी, अशी आता मराठवाड्यातील जनतेची अपेक्षा आहे. त्याला कारण आज संपूर्ण मराठवाड्याचा नेता म्हणून ओळखला जाईल असा नेताच नाही. विलासराव देशमुख गेले तेव्हा मराठवाड्याचा एक मोठा नेता गेला, अशाच भावना राज्यभरातून व्यक्त झाल्या होत्या. गोपीनाथराव गेले तेव्हा तर मराठवाडा पोरका झाला, अशाच प्रतिक्रिया आल्या. अजूनही राज्यातल्या इतर प्रांता्ंतूनही मराठवाड्याला नेताच राहिलेला नाही, असेच म्हटले जाते. दोन वेळा मुख्यमंत्री झाल्याने अशोक चव्हाण यांना (त्यांनी जरी राज्याचे नेते होताना मराठवाड्याच्या प्रतिमेत न अडकण्याची काळजी घेतली असली तरी ) काही प्रमाणात त्या चष्म्यातून पाहिले जात होते. पण आता तर ते खासदारही होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे मराठवाड्याचा जननेता म्हणून प्रतिमा तयार करण्याची मोठी संधी आज दानवेंना आहे. त्यासाठी  मंत्री म्हणून त्यांनी मराठवाड्यात दौरे करावेत,   जास्तीत जास्त निधी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत द्यावा, अशी अपेक्षा आहे. तसे झाले नाही तर त्यांनी मोठी संधी वाया घालवली, असेच म्हणावे लागेल. 
 

बातम्या आणखी आहेत...