आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांनी जमा केलेले शैक्षणिक शुल्क लिपिक, शिपायाने उधळले नर्तकींवर!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- लातूरच्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या लेखा विभागातील लिपिक आणि शिपायाने संगनमत करून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्कापोटी जमा केलेले नऊ लाख रुपयांच्या रकमेचा अपहार केला आहे. विशेष म्हणजे ही रक्कम या दोघांनी रेणापूर येथील एका कलाकेंद्रावरील नर्तिकांवर दौलतजादा करून उडवली. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात विनायक लोमटे हा लेखा विभागात लिपिक म्हणून तर सतीश अनमुलवाड हा शिपाई म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थ्यांनी जमा केलेले शैक्षणिक शुल्क आणि इतर माध्यमांतून आलेल्या पैशांची लेखाबुकात नोंद करून ते शुल्क बँकेत भरण्याची जबाबदारी या लिपिक लोमटेवर असायची. प्राचार्य नेहमी शैक्षणिक कामात व्यस्त असल्यामुळे लोमटे आणि अनमुलवाड या दोघांनी संगनमत करून या पैशांत गैरव्यवहार करण्याचा कट रचला. दिवसभर जमा झालेले पैसे लिपिक लोमटे याच्या ताब्यात असायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पैसे सतीशला देऊन बँकेत भरण्यास सांगितले जायचे. सतीश बँकेत जाऊन अत्यल्प रक्कम भरायचा. बँकेच्या भरणा करायच्या स्लीपवर तो अक्षर आणि अंकाच्या अलीकडे तो अशा पद्धतीने जागा शिल्लक ठेवायचा की बँकेचा शिक्का मारून झाल्यानंतर त्यावर नव्याने लिहिता येईल. उदाहरणार्थ ५५ हजार ३२७ रुपयांची रक्कम बँकेत भरायचे असेल तर तो स्लिपवर केवळ ३२७ इतकी रक्कम लिहून तेवढेच पैसे बँकेत जमा करायचा. ही रक्कम जमा करून झाल्यानंतर बँकेचा शिक्का पडल्यानंतर स्लीपवरील ३२७ या आकड्यांच्या अलीकडे ५५ हजार असे अक्षरांमध्येही लिहायचा. सुमारे दोन वर्षांपासून हा प्रकार बेमालूम सुरू होता. 


असा आला अपहार उघडकीस : काही दिवसांपूर्वी लिपिक लोमटे याच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्याला १० -१५ दिवसांची सुटी घ्यावी लागली. या काळात काम खोळंबू नये म्हणून दुसऱ्या विभागातील लिपिकची तेथे नेमणूक करण्यात आली. त्याने मागील लेखा बुक चेक केले असता आधीच्या स्लीपमध्ये खाडाखोड केली असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने हा प्रकार प्राचार्यांच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर अंतर्गत चौकशी सुरू असतानाच लेखा विभागातील सर्व बँक स्लीप गायब करण्यात आल्या. त्यामुळे जमा रक्कम आणि लेखाबुकातील रक्कम याचा मेळ घातला असता तब्बल ९ लाख १३ हजार ३२० रुपयांच्या रकमेचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले. या संदर्भात प्राचार्य श्रीकांत गायकवाड यांनी शिवाजीनगर ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. 


अपहारातील बहुतेक रक्कम कला केंद्रात खर्च केली 
पोलिसांनी विनायक लोमटे व सतीश अनमुलवाड या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्रारंभी त्यांनी असे काही झाल्याचा इन्कार केला. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच अपहार केल्याची कबुली दिली. त्यांनी हा अपहार कसा केला याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. ही रक्कम कोठे आहे याची विचारणा केली असता यातील बहुतांश रक्कम या दोघांनी रेणापूरच्या एका कला केंद्रातील नर्तकींवर उधळली असल्याचे सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...