आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्योतिराव गोविंदराव फुले हे 19 व्या शतकातील एक महान विचारवंत, समाज सेवक, लेखक, क्रांतिकारी समाजसुधारक होते. त्यांना महात्मा फुले या नावानेही ओळखले जाते. आज (बुधवार) 28 नोव्हेंबर महात्मा फुलेंची पुण्यतिथी. यानिमित्ताने पाहुया या थोर समाजसुधारकाविषयी काही खास माहिती...
1. ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडीलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले.
2. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत 1852 मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण ज्योतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. ज्योतिरावांनी पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते.
3. विद्येविना मती गेली।
मतीविना नीती गेली।
नीतीविना गती गेली।
गतीविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
महात्मा फुलेंच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या या ओळींनी संपुर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली होती.
4. 'कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे' असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या 'शेतकऱ्याचा असूड' या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही ज्योतिरावांचे दर्शन होते. 'नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे' हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते.
5. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी 'शेतकऱ्यांचा आसूड' हा ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचे वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतिराव फुलेंनी आपल्या 'सार्वजनिक सत्यधर्म' संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे.
त्यातील काही महत्वाची वचने-
> स्त्री अथवा पुरुष एकंदर सर्व गाव, प्रांत, देश किंवा खंडाच्या संबंधात अथवा कोणत्याही धर्मातील स्वत:च्या संबंधात, स्त्री आणि पुरुष या उभयतांनी अथवा सर्व स्त्रियांनी अथवा एकमेकांत एकमेकांनी कोणत्याही प्रकारची आवडनिवड (भेदभाव) न करता या भूखंडावर आपले एक कुटंब समजून एकमताने सत्यवर्तन करून राहावे .
> आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणीमात्रांना उत्पन्न करतेवेळी मनुष्यास जन्मतःच स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण केले आहे आणि त्यास आपापसात साऱ्या हक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ केले आहे .
> आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने सर्व मानवी स्त्री-पुरुषांस धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे. जो आपल्यापासून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस कोणत्याही तऱ्हेचे नुकसान देत नाही, अथवा जो कोणी आपल्यावरून दुसऱ्या मानवांचे हक्क समजून इतरांना पीडा देत नाही त्याला 'सत्यवर्तन ' करणारा म्हणावे .
> आपल्या सर्वांच्या निर्मिकाने एकंदर सर्व स्त्री-पुरुषांस एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहे. त्यातून एखादा मानव अथवा काही मानवांची टोळी एखाद्या व्यक्तीवर जबरी करू शकत नाही. त्याप्रमाणे जबरी न करणाऱ्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे.
> स्त्री अथवा पुरुष जे आपल्या कुटुंबासह, आपल्या भाऊबंदास, आपल्या सोयऱ्याधायऱ्यास आणि आपल्या इष्टमित्र साथींना मोठ्या तोऱ्याने पिढीजात श्रेष्ठ मानून आपल्यास पवित्र मानीत नाहीत आणि एकंदर सर्व मानवी प्राण्यास पिढीजात कपटाने अपवित्र मानून त्यास नीच मानीत नाहीत त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे .
> स्त्री अथवा पुरुष जे शेतकरी अथवा कलाकौशल्य करून पोटे भरण्यास श्रेष्ठ मानतात. परंतु शेतकरी वगैरे यांना मदत करणाऱ्यांचा आदरसत्कार करतात त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे.
6. 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी 'सत्यशोधक समाजाची स्थापना' केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुवर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरवात केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर 19 स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. त्याचवेळी त्या कन्याशाळेच्या शिक्षिका म्हणूनही कार्य करीत होत्या. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्यावेळी लेखन प्रकाशनचे कार्य केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. न्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सर्वसाक्षी जगत्पती। त्याला नकोच मध्यस्ती॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली.
7. त्यांची समाजसेवा पाहून 1888 मध्ये मुंबईत एका विशाल सभेत त्यांना 'महात्मा' ही उपाधी देण्यात आली होती.
8.फुलेंनी त्यांच्या जीवनकाळात अनेक पुस्तके लिहली. त्यापैकी काही निवडक- तृतीय रत्न, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा, विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी आदी.
महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या या थोर महापुरूषाला दिव्य मराठी वेब टीमकडून विनम्र अभिवादन.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.