आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
माझे गाव खंडाळा (ता. वैजापूर) आहे. आम्ही तीन भावंडे आहोत. माझ्या वडिलांनी अतिशय गरिबीतून आपला व्यवसाय भरभराटीस आणला. नेकीने व्यवसाय करून सर्वांचा विश्वासदेखील कमावला. या गोष्टीला कमीत कमी 46 वर्षे झाली. त्या वेळी लहान गावांत एकमेकांवर फार विश्वास होता. आमच्या गावात विठ्ठलराव बाजीराव मगर नावाचे एक प्रतिष्ठित शेतकरी होते. माझ्या वडिलांचे ते चांगले मित्र आणि नियमित ग्राहक होते. त्यांना चारधाम यात्रेसाठी जायचे होते. यात्रेचा कालावधी दोन महिन्यांचा होता. जातेवेळी ते वडिलांकडे आले व त्यांनी त्यांच्याकडील सोन्याच्या दागिन्यांचा मोठा ऐवज अनामत म्हणून ठेवण्यास दिला. तो ऐवज जवळपास 10 ते 15 तोळ्यांचा होता. यात्रा पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यांनी ते गावी परतले. आठ -दहा दिवसांनी ते ठेवलेल्या वस्तू घेण्यासाठी वडिलांकडे घरी आले. वडिलांनी ज्या ठिकाणी वस्तू ठेवल्या तेथे पाहिले तर वस्तू जागेवर नव्हत्या. खूप शोध घेतला, पण वस्तू काही मिळाल्या नाहीत. वडिलांनी त्यांच्याकडे आठ दिवसांची मुदत मागून घेतली व वस्तू शोधून देतो असे सांगितले. ते काही न बोलता निघून गेले. दरम्यानच्या काळात खूप शोध घेतला, पण दागिने मिळालेच नाहीत. म्हणून वडिलांनी तसेच सारखे दागिने तयार करून घेतले व मगर यांना दागिने सापडले, येऊन घेऊन जा, असा निरोप धाडला. त्याप्रमाणे ते आले. त्यांनी दागिने पाहिले. ते म्हणाले, ‘हे दागिने माझे नाहीत. दागिने हरवले असतील तर तसे मला सांगा. माझे नशीब. पण तुम्ही मला दुसरे दागिने देऊ नका.’ वडिलांनी बरेच समजावून सांगितले, पण त्यांनी ऐकले नाही. ते तसेच निघून गेले. योगायोगाने पुढे 10 - 15 दिवसांनी दागिने एका कपाटात ठेवलेले सापडले. वडिलांनी त्यांना बोलावून ते दागिने परत केले. दागिने आपलेच असल्याची खात्री पटल्यानंतर ते त्यांनी स्वीकारले. वडील सांगायचे, ते फार भावनाविवश होते. त्या काळी लोकांमध्ये मनाचा मोठेपणा किती होता हे यातून लक्षात येते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.