आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र येणार !

एका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • मंगळवारी होणार मुंबईत मेळावा, तिन्ही पक्षांचे नेते राहणार उपस्थित
  • भाजपकडून सत्ता खेचण्याची तयारी
  • औरंगाबाद निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांची बोलणी सुरू

मुंबई - काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर आता राज्यातील सर्व महापालिका आणि महानगरपालिकांमध्येही महाविकास आघाडी एकत्रच निवडणुका लढवणार आहे. एप्रिलमध्ये नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तयार झाली असून मंगळवारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक घेऊन या निवडणुकीची चर्चा केली. या मेळाव्याला शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील आणि काँग्रेसकडून अशोक चव्हाण, विश्वजीत कदम उपस्थित राहाणार असून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.विधानसभा निवडणुकीपूर्वी नवी मुंबई महापालिकेतील नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तेथे भाजपची सत्ता आली होती. गणेश नाईक यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते आमदार झाले. परंतु आता तेथून भाजपचा सूपडा साफ करण्याची मोहीम महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आखली आहे. त्याचाच भाग म्हणून मंगळवारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

गणेश नाईकांनी घेतली नगरसेवकांची बैठक

आमदार गणेश नाईक यांनीही काही दिवसांपूर्वी आपल्या ५० नगरसेवकांची एक बैठक आयोजित केली होती. यात महाविकास आघाडीला रोखण्यासाठी काय करता येईल याची चर्चा झाली आणि त्यासाठी ब्लू प्रिंटही तयार करण्यात आली. सागर नाईक, वैभव नाईक यांच्यावरया  निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनसेही या निवडणूकीत उतरणार असून त्यांनीही तयारी सुरू केली आहे.

मनसेकडेही लक्ष

२३ जानेवारी रोजी मुंबईत पक्षाचे पहिले अधिवेशन घेतल्यानंतर मनसे कार्यकर्ते आता जोमाने  कामाला लागले आहेत. मात्र, अनेकदा भूमिका बदल राहिल्याने कार्यकर्ते व जनतेत संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या निवडणुकीत मनसे रिंगणात उतरला तर राज यांच्या पक्षाला मतदार किती गांभीर्याने घेतात याकडेही राज्यासह सर्वांचे लक्ष असेल.औरंगाबाद निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांची बोलणी सुरू

नवी मुंबई महापालिकेच्या १११ प्रभागांपैकी शिवसेना ५०, राष्ट्रवादी ४० आणि शिल्लक २१ प्रभाग काँग्रेसच्या वाट्याला आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. औरंगाबाद महापालिका निवडणुकाही तोंडावर आहेत. या निवडणुकाही एकत्रच लढवणार का असे शिवेसना नेते अनिल परब यांना विचारले असता त्यांनी सांगितले, याबाबत तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बोलणी सुरू आहेत. अजून काही निर्णय झालेला नाही. प्रत्येक निवडणुकीवेळी निर्णय घेतले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.