आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंडाेबांना थंड करताना महायुतीच्या नेत्यांची दमछाक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी : जिल्ह्यातील परभणी वगळता तीनही मतदारसंघात महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली बंडखोरी शमवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची मोठी दमछाक होऊ लागली आहे. या उलट काँग्रेस आघाडीत केवळ परभणीतच सुरेश नागरेंच्या रूपाने झालेल्या बंडखोरीला थोपवण्यासाठी काँग्रेस नेते प्रयत्नांची शिकस्त करू लागले आहेत.

सोमवारी(दि.सात)उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असून त्यादृष्टीने सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत हे चर्चेचे गुऱ्हाळ व तडजोडी चालूच राहणार आहेत. प्रामुख्याने महायुतीला मोठी कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यातील परभणी वगळता तिन्ही मतदारसंघांत महायुतीमध्ये जागा वाटपाचा घोळ अखेरपर्यंत कायम होता. जागा वाटपाचे युतीचे जुने सूत्र पूर्णपणे बदलेले गेले. परभणीत गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व असल्याने ही जागा अपेक्षेप्रमाणे सेनेकडेच राहणार असल्याचे चित्र सुरुवातीपासून स्पष्ट होते. भाजपकडून महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांची अपेक्षित असलेली बंडखोरी सुरुवातीस स्पष्टपणे थोपवण्यास मुख्यमंत्र्यांना यश आले. त्यामुळे या ठिकाणी प्रश्‍नच निर्माण झाला नाही. गंगाखेड हा पूर्वापार भाजपचा मतदारसंघ होता. २०१४ मध्ये तो रासपला गेल्याने या जागे ऐवजी जिंतूरवर रासपने दावा करताच भाजपने पुन्हा तो मतदारसंघ मिळवण्याचा प्रयत्न केला. 


अनपेक्षितपणे शिवसेनेला हा मतदारसंघ सुटताच भाजपच्या सहा पदाधिकाऱ्यांनी बंडखोरीची भूमिका घेतली होती. परंतु खासदार संजय जाधव यांनी एकाच बैठकीत त्यांना शांत करण्याचे काम केले. परंतु रासपचे नेते रत्नाकर गुट्टे यांनी अखेरच्या क्षणी २.४५ मिनिटांनी कारागृहातूनच प्रतिनिधीमार्फत आपला अर्ज एबीफॉर्मसह दाखल केल्याने शिवसेनेचे उमेदवार विशाल कदम यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे. त्यादृष्टीने खा.जाधव हे गुट्टेेंना रिंगणाबाहेर काढण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. राज्यपातळीवर याबाबतीत या मतदारसंघात रासपच्या भूमिकेबद्दल चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. त्यामुळे गंगाखेडमधील बंडखोरीबाबत शिवसेना चिंताग्रस्त आहे. जिंतुरात शिवसेनेचे विधानसभा प्रमुख राम खराबे पाटील यांनीही बंडाचे निशाण राेवले. मात्र खा.जाधव यांनी पाटील हे निश्‍चितपणे उमेदवारी मागे घेतील, असा ठाम विश्‍वास व्यक्त केला आहे.

पाथरीत मात्र तिढा कायम
पाथरी मतदारसंघातून शिवसेनेने दोन वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. साहजिकच या मतदारसंघातून इच्छुकांची संख्या १७ वर पोहाेचली होती. परंतु भाजपचे सहयोगी सदस्य आ.मोहन फड यांच्यासाठी महायुतीतून ही जागा सोडवून घेण्यात येणार असल्याचे सुरुवातीपासून मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे या ठिकाणी सेना इच्छुक उमेदवार बंडखोरी करणार हे स्पष्ट होते. त्याप्रमाणे डॉ. जगदीश शिंदे, डॉ.राम शिंदे व माजी जिल्हाप्रमुख डॉ.संजय कच्छवे यांनी अर्ज दाखल केलेले आहेत. या तिघांनाही रिंगणाबाहेर काढण्यासाठी भाजप व सेनेचे नेते प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत. तरी देखील डॉ.जगदीश शिंदे हे रिंगणात राहण्याची शक्यता आहे.