आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे बाळ जन्माला येताच होतात विवाह!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजभोई समाजातले कटूसत्य
  • रूढी, परंपरांचा जबरदस्त पगडा, समाज वाढवण्यासाठी जुनी प्रथा
  • औरंगाबादच्या गंगापूर, कन्नड तालुक्यातले चित्र
  • बाळ जन्म:ताच लागतात विवाह, कुपोषण, आजार पाचवीला पूजलेले

महेश जोशी, औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर शहरातल्या ईदगाह रोड येथे राहणाऱ्या भारती श्याम फुलमाळे यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते. घरात गोडधोड आणि सोबतीला मटण शिजवणे सुरू होते. नातेवाईक मंडळी नटून थटून जमत एकमेकांना शुभेच्छा देत होते. निमीत्त होते भारती यांचा ४ महिन्यांचा मुलगा राजकुमार याच्या विवाहाचे. नवरी मुलगी म्हणून शेजारच्या झोपडीतल्या २ महिन्यांच्या राणी शामसुंदरला नटवले होते. महाराष्ट्र-आंध्रप्रदेशच्या सीमेवरील राजभोई समाजात बाळाचा जन्म होताच पोटाला टिळा लावून जवळच्या कुटुंबात विवाह लावण्याची प्रथा आहे. मुलगी वयात आली की कायमची सासरी पाठवली जाते. यामुळे कुटूंब एकसंघ राहते. मुलगी बाहेरच्या घरात दिल्याने वाद होत नाहीत. मुलगी पळून जाणे किंवा खानदानाची इज्जत धूळीत मिळवण्याची भीती राहत नाही. मात्र, बालपणाचा आनंद घेण्याच्या वयात घर, कुटूंब आणि मातृत्त्वाची जबाबदारी आल्याने मुलगी गोंधळते. कमी वयात आई झाल्याने जन्माला येणारे बाळ कुपोषित, आजारी राहते. पुढील पिढीचे नुकसान होते. महाराष्ट्र-आंध्रप्रदेशाच्या सीमेवरून ४०-४५ वर्षांपूर्वी मजुरांची एक टोळी कामाच्या शोधात महाराष्ट्रात आली. हाताला मिळेल ते काम केलेे. अनेक वर्ष शेतमजूर म्हणून राबवले. मात्र शेतीला व्यवसायाला लागलेली उतरती कळा त्यांच्या मूळावर उठली. दुष्काळ, अवकाळी पाऊस यातून उदभवणाऱ्या नापिकीमुळे काम मिळणे बंद झाले. मालगवर्ग कमी  पैशात राबण्यास सांगायचा. ते न परवडल्याने भीक मागण्यास सुरुवात केली. फिरता फिरता औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात पोहचले. येथे काही दिवस भीक मागीतली. दोन वर्षांपूर्वी एका जणाच्या ओळखीने कचरा वेचण्याचे काम सुरु केले. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गंगापूर नगर परिषदेनेही गावाबाहेर कचरा वर्गीकरण सुरु केले आहे. शेतात काम मिळत नसल्याने गावातल्या महिला तोंड लपवून येथे कामाला येतात. येथे सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत काम केल्यावर संध्याकाळी जमा झालेला कचरा विकून दिवसाकाठी २५० ते ३०० रुपये मिळतात. भंगारवाला या केंद्रात येऊन कचरा घेऊन जातो. भारती फुलमाळेला येथे काम नाही मिळाले. मात्र, कचरा जमा करून तो वर्गीकरण करण्याचे कौशल्य अवगत केले. तिच्या पाठोपाठ आता राजभोई समाजातील २५ ते ३० महिला हे काम करू लागल्या. यातून नियमीत पैसा मिळू लागल्याचे भारती सांगतात. यामुळे आता भीक मागण्याची गरज पडत नाही.

कचराकुंडीजवळ बाळाची झोळणी 


भारती तेलुगू राजभोई समाजातील आहेत. त्यांना मराठी येत नाही. मात्र, मराठी समजते. हावभावातून त्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात. दिव्य मराठी प्रतिनिधींनी भेट दिली त्यावेळी सर्व महिला टीळ्यासाठी जमलेल्या होत्या. त्यातील ज्येष्ठ सदस्य लक्ष्मीबाई म्हणाल्या, महाराष्ट्रात आम्हाला मसनजोगी म्हणतात. कदाचित आमचे पूर्वज हे काम करत असावेत. आम्ही मात्र मजूरी, भीक मागण्याचे  काम करत आलोय. ईदगाह रोडवर ही कुटुंबे झोपडी करून राहतात. सकाळी ८ वाजता कामाला सुरुवात होते. भारतीसोबत शीला, गुड्डी, सुनिता, दिपा दिवसभर पाठीवर पिशव्या घेऊन फिरतात. त्यापैकी ३-४ जणींना रांगणारी मुले आहेत. या मुलांना कचराकुंडीजवळ झोळणीत झोपवले जाते. एका मैदानात त्यातील कागद, प्लास्टीक, पुठ्ठे, कपडे, बाटल्या वेगळ्या केल्या जातात. येथेच दुपारचे जेवण होते. बाळांना दूध पाजले जाते. मुले उठली तर ती कचऱ्यात खेळतात. संध्याकाळी करीमभाई दोस्ती स्क्रॅप सेंटरकडे कचरा विकून प्रत्येकीला २५० ते ३०० रुपये मिळतात.

 

बालपणीच विवाह
भारती म्हणाल्या, मुली आम्हाला जड वाटतात. उगाच पाय भरकटला, वाया गेल्या तर काय करणार? यामुळे बालपणीच त्यांचा विवाह जुळवण्याची प्रथा आहे. यामुळे मुली घरातल्या घरातच राहतात. इतर सदस्य तिची काळजी घेतात. जन्माला आलेल्या बाळासाठी मुलगा किंवा मुलीचा शोध सुरू असतो. कधी कधी तर पोटातल्या  गर्भाशी विवाह लावला जातो. भारती फुलमाळे यांचा ४ महिन्यांचा मुलगा राजकुमार आणि शीला यांची २ महिन्यांची मुलगी राणी हिचा आज विवाह झाला होता. मुलगी वयात आल्यानंतर सासरी जाईल. आतापासून ती राजकुमारची पत्नी असेल. पतीचे एकच काम, फक्त आराम

राजभोई समाजातील पुरुष काम करत नाहीत. ते व्यसनाधीन आहेत. सकाळी निघताना महिला त्यांना दारूसाठी ४० रुपये देतात. संध्याकाळी घरी परतल्यावर परत एकदा १०० रुपये द्यावे लागतात. दिवसभर ते दारू पिऊन घरात राहतात. पैसे नाही दिले तर मारहाण करतात. शिवीगाळ करतात. त्यांची भांडणे बघण्यासाठी लोक गोळा होतात. आम्ही काम केले तर बायका काय करतील? आमचा आदर राखणे, काळजी घेणे त्यांची जबाबदारी असल्याचे महादेव म्हणाले. घरातील सर्वच महिला निरक्षर आहेत. त्यांची मुलेही शिकत नाहीत. मोठी मुले वडिलांसोबत घरात थांबतात. त्यांना कमी वयात व्यसनांची सवय लागते. काही मुले कचरा वेचण्यासाठी आईसोबत बाहेर जातात.  कुटूंबाची कुटूंब कचरा व्यवसायात


गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील लक्ष्मी आणि आरती जगधने या अनुक्रमे १६ आणि १४ वयाच्या सख्ख्या बहिणी. जगधने दाम्पत्याला ४ मुली आणि २ मुले आहेत. सुरुवातीला घरातील कर्ता पुरुष बाळू जगधने आणि त्यांच्या पत्नी सीता जगधने कचरा वेचायचे. आता जगधने दाम्पत्याच्या ३ मुली सविता, आरती आणि लक्ष्मी यासुद्धा कचरा वेचण्याच्या कामात आल्या आहेत. गावातल्या टुकार मुलांच्या नजरांनी त्या त्रस्त असतात. सकाळी कचरा वेचून शाळेत जातात. आता त्यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. औरंगाबाद शहराजवळील वाळूज एमआयडीसीतल्या कचरा डेपोत ३० ते ३५ कचरावेचक महिला आहेत. येथील ताराबाई संतोष यांची आई, बहिण, भाऊ, भावाची बायको, त्यांची मुलेही कचरा वेचतात. चिमुकला रोहन राठोड चुंबकाच्या सहाय्याने कचऱ्यातील खिळे, लोखंड जमा करतो. वैजापूरच्या कचरा वर्गीकरण केंद्रावर सुमन आणि तिची आई कचरा काम करते.  त्यांची लक्ष्मी आणि सोहम ही मुलेही दिवसभर येथेच असतात. कन्नडच्या सुमनताई मगर या कचरा वेचून झोपडीत राहतात. बाजूला नाला असल्याने दुर्गंधी, डासांचा त्रास असतो.        आजारी माता, आजारी मुले


भारती, लक्ष्मी, सुमन, ताराबाई आणि सर्वच महिलांचे प्रश्न गंभीर आहेत. त्यांच्या घरात स्त्री-पुरुष समानतेचा लवलेषही नाही. पुरुषात व्यसनाधीन आहेत. गरीबी, शिक्षणाचा अभाव यामुळे या महिला खचल्या आहेत. त्यांच्या आरोग्याची हेळसांड होते. बालपणात विवाह झाल्याने मुलेही लवकर होतात. पोटभर, पोषक खायला मिळत नसल्याने मुलांची वाढ होत नाही. बाळाच्या जन्मानंतरचे १०००  दिवस पुढील आयुष्यासाठी महत्त्वाचे असतात. मात्र, या महिलांच्या लेखी  यास काहीच महत्त्व नाही. या महिलांना चांगल्या आरोग्याचे महत्त्व पठवून देणे गरजेचे आहे. सरकारी दवाखान्यात मिळणारे उपचार, अंगणवाड्यात मिळणारा पोषक आहार या विषयी माहिती देणे क्रमप्राप्त ठरते.