आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाश्वत विकासासाठी महिलांची सुरक्षा महत्त्वाची

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेश जोशी

संयुक्त राष्ट्राच्या पाहणीनुसार जागतिक स्तरावर तीनपैकी एका महिला आयुष्यात कधी ना कधी शारीरिक किंवा लैंगिक हिंसेला सामोरे गेलेली आहे. 


स्त्री-पुरुष समानतेबाबत आज भरभरून बोलले जात असताना स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार आणि हिंसाचार काही केल्या कमी होत नाहीयेत. उलट ते वाढत चालले असून त्यांचे बदललेले स्वरूप चिंतेची बाब ठरत आहे. संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टात महिला हिंसाचाराची कारणे लपली आहेत. 

संयुक्त राष्ट्राच्या पाहणीनुसार जागतिक स्तरावर तीनपैकी एका महिलेला आयुष्यात कधी ना कधी शारीरिक किंवा लैंगिक हिंसेला सामोरे जावे लागलेले आहे. रणांगणातील सैनिकापेक्षा स्त्री स्वत:ला असुरक्षित समजत असल्याचे हा अहवाल सांगतो. अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांच्या मते १९९० पर्यंत जगभरातून १०० दशलक्ष मुली, महिला बेपत्ता झाल्या होत्या. २०१५ मध्ये बेपत्ता महिलांची संख्या १३६ दशलक्ष झाली. अशा हिंसाचाराचा केवळ पीडित महिलेलाच फटका बसत नाही, तर त्यामुळे कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीचा वेगही मंदावतो. आर्थिक नुकसान होते. कायदा -सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होतो. महिलांवरील वाढत्या अत्याचाराचे सर्वात मोठे कारण गरिबी हे अाहे. बालपणापासूनच मुलींना गरिबीत राहण्याची सवय लावली जाते. २५ वर्षांखालील मुली आणि महिला गरिबीत राहण्याचे प्रमाण याच वयोगटातील मुले आणि पुरुषांच्या तुलनेत ४ टक्के अधिक आहे. या अहवालाप्रमाणे महिलांवर अत्याचार करणारे घराबाहेरचे कमी आणि घरातले जास्त असतात. यात महिलांच्या सेक्स पार्टनरचाही समावेश आहे. १५ ते ४९ वयोगटातील १८ टक्के महिलांनी त्यांच्या पार्टनरकडून लैंगिक किंवा शारीरिक अत्याचार सहन करावा लागतो. यातूनच जगभरात दररोज १३७ महिलांची हत्या होते. महिलांच्या एकूण  हत्यापैकी ३८ ते ५० टक्के सेक्स पार्टनरकडून होत असल्याचे हा अहवाल सांगतो. 

जगातील ८० टक्के घरात अजूनही पाणी आणण्यासाठी नदी, विहीर, तलावावर जावे लागते. तिथपर्यंत जाण्याचा मार्ग धोकादायक असतो. उघड्यावार शौचाला जाण्यासाठी महिलांना अंधार होण्याची वाट बघावी लागते. या प्रतीक्षेमुळे तिचे आरोग्य खराब होते. जगातील ४४६ दशलक्ष महिलांना उघड्यावर शौचास जावे लागते. या ठिकाणी तिचे शोषण करण्यासाठी लोक टपलेले असतात.

घरात स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधनाचा अभाव हासुद्धा महिलांच्या शोषणाचाच प्रकार आहे. स्वच्छ इंधन असणाऱ्या घरात मुली आठवड्याला सरासरी ५ तास स्वयंपाकात घालवतात. लाकडे, शेणाच्या गौऱ्या असे पारंपरिक इंधन वापरणाऱ्या घरात स्वयंपाकासाठी १८ तास खर्च हाेतात. घरात होणाऱ्या हिंसाचारामुळे महिलांना उपाशी राहण्याची वेळ येते. पुरुषसत्ताक कुटुंबव्यवस्थेत हिंसाचारानंतर स्त्रीला उपाशी ठेवण्याची परंपरा आहे. २०१८ च्या अन्न सुरक्षा निर्देशांकाप्रमाणे महिलांचे उपाशी राहण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत १० टक्के अधिक आहे. 

नैसर्गिक संकटामुळेही स्त्रियांवरील अत्याचारात वाढ होते. पूर, भूकंप, वादळात निर्वासितांच्या छावण्यांमध्ये राहणाऱ्या महिलांना लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागते. अन्नाची कमतरता असल्याने मुलांना पोटभर जेऊ घातले जाते. उरलेले अन्न मुली-महिलांच्या वाट्याला येते. निर्वासित म्हणून आलेल्या ५ पैकी एका महिलेला लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागते.

हिंसाचाराच्या बहुतांशी घटनात महिलांच्या वेदनांना आवाज नसतो. महिलांनी या अन्यायाला आपल्या संस्कृतीचा एक भाग मानला आहे. याला छेद देऊन आज पुढे येण्याची गरज आहे. 

बातम्या आणखी आहेत...