आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉलिटिक्स ऑफ थिंग बिटवीन टू लेग्ज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय मानसिकतेचा, राजकीय (अ)संस्कृतीचा अभ्यास करून ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ प्रेक्षकांसमोर आली  आहे.  एका स्त्रीचा राजकारणाकडे असलेला कल, तिच्या उत्तुंग इच्छा-आकांक्षा पण तिला स्त्री म्हणून मिळालेलं दुय्यम स्थान, त्यातून तिने संघर्ष करून काढलेला मार्ग अशा चढउतारांच्या कथानकाची ही वेब सिरीज. नागेश कुकनूर दिगदर्शित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही वेब सिरीज भारतीय राजकारणातील स्त्री प्रतिमा, लिंगभेद, राजकीय खेळीच्या काळ्या बाजू उलगडताना दिसते.

 

विरोधी पक्षावर, त्यातील नेत्यांवर चिखलफेक करणे हेच सर्वात मोठे शस्त्र बनले आहे. त्यात जर विरोधी नेता स्त्री असेल तर थेट तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा मार्ग मोकळा असतो. स्त्रीच्या चारित्र्याला ‘पावित्र्याचं’ लेबल लावून ठेवल्यामुळे समोरच्या स्त्रीवर अश्लाघ्य टीका केल्यास ती तिथेच अर्धमेली होऊन जाते हे लक्षात न येण्याइतके आपले राजकारणी सन्मार्गी नक्कीच नाहीत.

 

 

"I want everything that was denied to me, not because I am incapable but because I have vagina between my legs. मुझे वो सबकुछ चाहिये जो मुझे नही मिला, क्योंकी मैं बेटा नहीं बेटी हूं.’ या धारदार संवादानंतर मानसिक तणावातून मुक्त होण्यासाठी त्या दोघींमधले काही प्रणय दृश्ये दिसू लागतात. तो संपूर्ण प्रसंग कथानकाचा टर्निंग पॉइंट म्हणून समोर येतो. पण, समाजाच्या खुज्या मानसिकतेला तो संवाद, ती गोष्ट, त्यामागचा उद्देश न दिसता ‘प्रिया बापट’ने हे असे "लेस्बियन सीन' दिले, मराठी संस्कृतीला काळिमा वगैरे फासला म्हणत समाज तिला "ट्रोल' करू लागतो. तुझ्या साध्या सोज्वळ इमेजला आमच्या दृष्टीने तडा गेला, असं म्हणत तिला सोशल मीडियावर टोळक्या टोळक्याने घेरून  टाकतो.

 


नुकत्याच काही दिवसांपूर्वी हॉटस्टारवर प्रसिद्ध झालेल्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स' वेब सिरीजमधला हा प्रसंग. प्रिया बापट, अतुल कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, संदीप कुलकर्णी, उदय टिकेकर, सचिन पिळगावकर यांसारख्या तगड्या कलाकारांचा समावेश असणारी नागेश कुकनूर दिग्दर्शित "सिटी ऑफ ड्रीम्स' ही वेब सिरीज भारतीय राजकारणातील स्त्री प्रतिमा, लिंगभेद, राजकीय खेळीच्या काळ्या बाजू उलगडताना दिसते. लोकसभा निवडणुकांचं वातावरण थंड झालं, निकाल लागले, त्यावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत बऱ्यावाईट चर्चा झडल्या, पण या रणधुमाळीत एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित राहिला तो म्हणजे भारतीय राजकारणातील स्त्री प्रतिमा. एखादी बाई आपल्याला राजकीय पटलावर शह  देऊ पाहतेय याचा राग आपल्या नेत्यांच्या घसरलेल्या जिभेवरून कित्येकदा समोर आला. पण त्यांच्या या बेताल वक्तव्यांबद्दल कुठे काही विशेष व्यक्त झालं नाही, ना त्यांचा निषेध करण्यासाठी फारसे लोक समोर आले.

 

पक्ष कोणताही असो, विचारधारा काहीही असो समोर उभी असणारी व्यक्ती प्रतिद्वंद्वी आहे या पेक्षा ती स्त्री आहे याच नजरेतून तिच्या विरोधात प्रचार केला गेला. "रामपुर वालों, उत्तर प्रदेश वालों...उसकी असलियत समझने में आपको १७  बरस लग गए, मैं १७  दिन में पहचान गया कि उनकी अंतर्वस्त्र खाकी रंग की है। ' असं जयाप्रदा यांच्याबद्दल वक्तव्य करणारा आझम खान, ‘कांग्रेस के एक नेता तो बड़ी जोर-जोर से बोलते हैं, अच्छे दिन आए? उन्हें अच्छे दिन दिखाई नहीं देते. अरे स्कर्ट वाली बाई साड़ी पहनकर मंदिर में शीश नवाने लगी, गंगाजल से परहेज़ करने वाले लोग गंगाजल का आचमन करने लगे’’ असं मेरठमधल्या एका सभेत विकृत पद्धतीने अच्छे दिनचे समर्थन करताना  प्रियंका गांधींना 'स्कर्टवाली  बाई' संबोधणारा जयकरण गुप्ता,  ‘आप तो पहले टीवी पर ठुमके लगाती थी, अब बीजेपी में शामिल होने के बाद राजनीतिक विश्लेषक बन गई हैं.' असं एका न्यूज चॅनेलवर स्मृती इराणींबद्दल बोलणारे संजय निरुपम हे सर्व त्याच घाणेरड्या भोगवादी, पुरुषसत्ताक मानसिकतेचे प्रतीक आहेत. आम आदमी पार्टीकडून उभ्या राहिलेल्या अतिशी मार्लेना यांना बदनाम करण्यासाठी “She is a prostitute. Think for once that if she wins, you will have to go to a prostitute for help or some work. - " अशा आशयाची  पत्रके भाजप उमेदवार गौतम गंभीरच्या कार्यकर्त्यांनी वाटल्याचा आरोप झाला होता. या पत्रकात आणखीही बऱ्याच वाईट पद्धतीने चारित्र्यहनन  करणारा मजकूर आहे. याबद्दल व्यक्त होताना अतिशी यांना स्टेजवरच अश्रू अनावर झाले होते. भारतीय राजकारणात विकासकामांवर किंवा आश्वासनांवर प्रचार करणे जणू आउट डेटेड झालंय.  आता विरोधी पक्षावर, त्यातील नेत्यांवर चिखलफेक करणे हेच सर्वात मोठे शस्त्र बनले आहे. त्यात जर विरोधी नेता स्त्री असेल तर थेट तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा मार्ग मोकळा असतो. मुळात भारतीय परंपरेत स्त्रीच्या चारित्र्याला 'पावित्र्याचं' लेबल लावून ठेवल्यामुळे समोरच्या स्त्रीवर अश्लाघ्य टीका केल्यास ती तिथेच अर्धमेली होऊन जाते हे लक्षात न येण्याइतके आपले राजकारणी सन्मार्गी नक्कीच नाहीत.
महाराष्ट्रातसुद्धा वेगळी परिस्थिती नाही. मागच्या लोकसभा निवडणुकांच्या काळात अमरावती मतदारसंघातून उभ्या राहिलेल्या नवनीत राणांचे काही फोटोज व्हायरल झाले होते. दाक्षिणात्य सिनेमात अभिनेत्री म्हणून काम केलेल्या नवनीत यांच्या मॉडेलिंगचे, विविध सिनेमांतील दृश्यांचे फोटोज  त्यांना बदनाम करण्यासाठी विरोधकांनी व्हायरल केले होते. स्त्री उमेदवाराविरोधात बोलताना तिच्या कामांवर, जनसंपर्कावर, तिच्या समजदारीवर न बोलता तिच्या कपड्यांवर, तिच्या रंगावर, तिच्या दिसण्यावर टिप्पणी करत जिभेला सैल सोडणं फार सोपं आणि हक्काचं वाटतं. बारकाईने निरीक्षण केल्यास आपल्या लक्षात येईल की राजकारणात सहभागी होणाऱ्या स्त्रीच्या वेशभूषेत आणि सामान्य स्त्रियांच्या वेशभूषेत बराच फरक असतो. सामान्य स्त्रिया वेळ प्रसंगानुसार, त्यांच्या आर्थिक-सामाजिक स्तरानुसार जीन्स-टॉप, टीशर्ट-स्कर्ट, डीप  नेक-स्लिव्हलेस ब्लाउज परिधान करू शकतात. पण एकदा राजकारणात तिने प्रवेश केला तर कॉलर असणारे, कोपऱ्यापर्यंत स्लिव्ह्ज असणारे ब्लाउज आणि प्लेन  रंगाच्या, बऱ्याचदा कॉटनच्या साड्या आपल्याला सर्रास पाहायला मिळतात. हा काही भारतीय राजकारणाचा ठरलेला ड्रेसकोड नाहीये. तरीही या अशा कपड्यांची गरज भासते; कारण आपलं राजकारण आता-आता रसातळाला जाताना दिसत असलं तरी आपलं समाजकारण बऱ्याच वर्षांपासून बाईसाठी तळातच आहे. तिच्या उघड्या शरीरावर तिचं चारित्र्य मोजण्याची इथे परंपरा आहे. जेवढं जास्त उघडं शरीर तेवढं त्या स्त्रीने त्या विशिष्ट पदापर्यंत जाण्यासाठी वापरलेले मार्ग इमॅजिन करण्याचे आपल्याकडे संस्कार आहेत.

 


२०१७ मध्ये एक बातमी आली होती. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडच्या सिनेटर लारिसा वॉटर्स यांनी संसदभवनात आपल्या छोट्या बाळाला स्तनपान करवले. त्या स्तनपान दृश्याचे फोटोज बातमीसह जगभर प्रसिद्ध झाले. त्या संसदभवनातील सदस्यांच्या प्रगल्भतेला जगभरातील मीडियाने चांगलेच नावाजले होते.   

 


हे सर्व आता आठवण्याचं कारण असं की आपल्याकडे एखाद्या स्त्रीने संसदेत जाऊ नये म्हणून तिच्या बाईपणाचा आधार घेऊन एवढे खालच्या पातळीचे प्रयत्न केले जातात तर त्या बाईने संसदेत असं स्तनपान करवल्यास किती घनघोर पाप होईल. तिच्या एकुणातच चारित्र्यावर, संस्कारांवर किती भयानक राळ उडवली जाईल, सांगता सोय नाही.

 


याच भारतीय मानसिकतेचा, राजकीय (अ)संस्कृतीचा अभ्यास करून ‘सिटी ऑफ ड्रीम्स' प्रेक्षकांसमोर आली  आहे.  एका स्त्रीचा राजकारणाकडे असलेला कल, तिच्या उत्तुंग इच्छा आकांक्षा पण तिला स्त्री म्हणून मिळालेलं दुय्यम स्थान, त्यातून तिने संघर्ष करून काढलेला मार्ग अशा चढउतारांच्या कथानकाची ही वेब सिरीज. काहीशी फिल्मी, काहीशी प्रेडिक्टबल अशा थोडक्या नकारात्मक बाबी सोडता एक कलाकृती म्हणून किंवा एका स्त्रीच्या मानसिकतेचा प्रवास म्हणून पाहण्यासाठी नक्कीच चांगली आहे. प्रिया बापटने या वेब सिरीज द्वारे हिंदी मध्ये पदार्पण केले आहे. एका बहिणीच्या, बायकोच्या, मुलीच्या आणि नंतर एका कणखर राजकीय नेतृत्वाच्या प्रत्येक व्यक्तीच्या छटा तिने व्यवस्थित साकारल्या आहेत.

 


इथल्या राजकारणात स्त्रीचं  अस्तित्वच पुरुषी मानसिकतेला मान्य  नाही, तिचा मान  सन्मान तर दूरची गोष्ट आहे. या अशा कलुषित वातावरणात ‘सिटी ऑफ ड्रीम्स' द्वारे आरसा दाखवण्याचं काम होताना दिसतंय हेच फार आशादायी आहे. त्या आरशात जाऊन पाहण्याचं कुणा राजकारण्याचं धाडस होणार नाही हा भाग वेगळा. आपले राजकारणी सोडा, सामान्य लोकंही राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणातील अलका लांबा, गुल पनाग, डिम्पल यादव आणि राज्य पातळीवर नवनीत राणा, ऊर्मिला मातोंडकर, प्रणिती शिंदे इत्यादी नावे असणारी, राजकारणातील सर्वात सुंदर, तरुण, हॉट महिलांच्या नावांची लिस्ट दाखवणाऱ्या बातम्यांना  प्रचंड टीआरपी बहाल  करत असतो. कारण आपणही ‘दोन पायांच्या मध्ये काय आहे' यावरूनच आपल्या जगण्याचं, भोगण्याचं, लालसेचं राजकारण ठरवत असतो.

 

महेशकुमार मुंजाळे
maheshmunjale@gmail.com
लेखकाचा संपर्क : ८३०८६३९३७७

बातम्या आणखी आहेत...