आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mahesh Munjale Write About \'Cinema And Digital Medium\'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नो तामझाम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अचानक निद्रिस्त ज्वालामुखी प्रस्फोटित व्हावा, त्यातून तप्त लाव्हा नव्हे, सृजनाचे पाट वाहावेत आणि सबंध अवकाश बहुढंगी कलाकृतींनी व्यापून जावा, असेच काहीसे सिनेमा आणि डिजिटल माध्यमात सध्या घडत आहे. इथला कलानिर्मितीचा वेग आणि आवेग स्तिमित करणारा आहे. मनोरंजनाच्या या  नवउन्मेषी विश्वातल्या मनस्पर्शून जाणाऱ्या गोष्टगर्भ कलाकृतींचे सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक संदर्भांसह मर्म उलगडून सांगणारे हे पाक्षिक सदर...

 

‘नमश्कार, मै आशिष विद्यार्थी, आपका अपना कहानीबाज...’ अशी सुरुवात होत ‘गाना डॉट कॉम’च्या कहानीबाज सिरीजमधील एक-एक गोष्ट उलगडू लागते. मानवी स्वभावाचे वेगवेगळे पैलू उलगडणाऱ्या गोष्टी आपल्या कानांतून मनात उतरू लागतात. 

 

और भाई? आया देख के ‘झीरो'? कैसा था?' त्याने त्याच्या मित्राला औत्सुक्याने विचारलं. मित्राने दोन चार फुल्या फुल्यावाले शब्द वापरत उत्तर देऊ केलं, ‘अरे क्या XX, ढाई-तीन घंटे फुल XX चलरा था, दिमाग के उपर. गाणे वाने, कॅमेरा सबकुछ कडक, लेकीन साला स्टोरीच नहीं ना.' भाऊ चहाच्या टपरीवर चहा पीत एका वाक्यात चित्रपट समीक्षा करून मोकळे. एका अर्थाने बरोबरच आहे, त्याचं उत्तर. शाहरुखचा ‘झीरो' काय, रजनीकांतचा ‘रोबो २.०' काय अन् आमिर अमिताभचा ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ काय, तिन्ही नुकत्याच येऊन गेलेल्या बिग बजेट फिल्म्स. बिग बजेट म्हणजे, अगदी पाचशे - साडेपाचशे कोटी एवढं बिग! अभिनय उत्तम, गाणी उत्तम, व्हीएफएक्स  अर्थात, व्हिज्युअल इफेक्ट्स तर त्याहून उत्तम. फिल्म दिसायला सुंदर, चकचकीत पण; कथा? अतार्किक, अर्धवट आणि अवास्तव. चित्रपट किती चकचकीत बनलाय, या पेक्षा त्याची गोष्ट किती खिळवून ठेवतेय, यावर प्रेक्षकांची आवड नावड अवलंबून असते. म्हणूनच कुणी चित्रपट पाहून आल्यावर ‘व्हीएफएक्स कसा होता?' असा प्रश्न नसतं विचारत, ‘श्टोरी काय होती?' हे विचारतं.

 

छान एकतारी पाकात भिजवलेला सोनेरी तांबूस गुलाबजाम, त्यावर पिस्त्याचा तुकडा, सर्व्ह करण्यासाठी सुंदर नक्षीकाम असलेली चांदीची वाटी, खाण्यासाठी चांदीचाच चमचा. हे असं वर्णन ऐकलं, तर कुणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही? पण पहिला घास खाल्यावर जर तुमच्या लक्षात आलं की, हा गोळा खव्याचा नसून केवळ मैद्याचा आहे. तेव्हा जो काही हिरमोड होईल, तसाच हिरमोड स्टोरी नसलेला चित्रपट पाहताना, प्रेक्षकाचा होत असतो. पिस्ता, चांदीचा चमचा-वाटी या गोष्टी एकवेळ नसल्या, तरी चालतील पण; गुलाबजाम हा खव्याचाच हवा ही, माफक अपेक्षा कुणीही खवैय्या करत असतो. म्हणूनच कथेला डावलून मोठमोठ्या स्टार्सना, भव्य व्हीएफएक्सला प्राथमिकता देण्यात चित्रपटाचे भवितव्य नाही, याची जाणीव चित्रपट निर्मात्यांना-दिग्दर्शकांना असावी लागते.

 

लबाड कोल्हा, चतुर कावळा, भक्त प्रल्हाद, श्रावण बाळ, भोपळ्यातली म्हातारी या गोष्टी माहीत नसणारा विरळाच. लहानपणी ‘छान छान गोष्टी'च्या पुस्तकात वाचलेल्या या गोष्टी वयाची चाळिशी ओलांडलेल्या माणसालाही आठवत असणार. कारण गोष्ट, हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. शाळेतून घरी आलेली मुलगी आईकडे जाऊन ‘तुला माहितीय शाळेत आज काय झालं...?' असं म्हणून काही घडामोडी सांगत असते. घडून गेलेल्या गोष्टी शब्दांतून जिवंत करत असते. आपण सर्वच आपल्या आयुष्यात दिवसातून अनेकदा विविध लोकांसोबत बोलताना हे करत असतो. यालाच तर स्टोरीटेलिंग म्हणतात. फक्त कुणी भयंकर बोअर करतं, तर कुणी तो प्रसंग मीठ-मसाला लावून मजेशीर करून सांगतं. हे ज्याचं त्याचं स्किल म्हणूयात.

 

एखादा चित्रपट आपल्याला आवडतो म्हणजे नेमकं काय होत असेल बरं? या मागे बरीच वेगवेगळी कारणं आहेत. ती व्यक्तिपरत्वे बदलतात. पण सर्वसमावेशक असं एक कारण म्हणजे, आपण त्या चित्रपटाच्या नायकाशी एकरूप होऊ लागतो, त्याचा प्रवास आपला वाटू लागतो. त्याच्या आयुष्यात येणारी संकटं दूर होण्यासाठी आपणच प्रयत्न करतोय की काय, असं वाटतं, त्याच्या दुःखात आपलं दुःख, त्याच्या यशात आपलं यश जेव्हा सामावलं जातं, तेव्हा आपला प्रवास आपसूकच त्या चित्रपटाच्या गोष्टीसोबत घडू लागतो. तेव्हा तो चित्रपट आपलासा वाटतो. आपल्याला तो आवडू लागतो. काल्पनिक पात्रंसुद्धा खरी भासू लागतात. तर्कसंगत असतील तर अगदी सुपरपॉवर असणारी पात्रंसुद्धा खरी वाटतात. ती पात्रं स्वतःत शिरल्याचा भास होऊ लागतो. म्हणूनच ‘शक्तिमान’ पाहिलेली मुलं गोल गोल फिरून उडी मारण्याचा प्रयत्न करून पाहतात. ‘क्रिश’ पाहून आल्यावर अचानकच पावलं लांब लांब पडत असल्याचा, आपण हवेत उडाल्याचा भास होत जातो.

 

सनी देओलचे चित्रपट पाहून आर्मी जॉइन करण्याची इच्छा होणं, आमिर खानचे ‘थ्री-इडियट्स’ आणि ‘तारें जमीन पर’ पाहून शिक्षणव्यवस्था बदलण्याची खुमखुमी येणं, जुने अमिताभ बच्चनचे चित्रपट पाहून व्यवस्थेविरोधात आवाज उठवायला अंगात बळ आल्याचा भास होणं, हे सर्व काय आहे? हा आहे चित्रपटाच्या गोष्टीचा आफ्टर इफेक्ट. असा हा आफ्टर इफेक्ट आजकाल क्वचितच चित्रपट पाहून जाणवतो. कारण कथेकडे तेवढ्या कटाक्षाने लक्षच दिलं जात नाही.

 

अंधाधुन, बधाई हो, राजी, भावेश जोशी सुपरहीरो, कारवां हे २०१८ सालात तुलनेने कमी बजेट मध्ये तयार झालेले असे चित्रपट आहेत, ज्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. या सर्वांच्या तांत्रिक बाजू भक्कम होत्याच, पण त्यांच्या कथेत प्रेक्षकाला गुंतवून ठेवण्याची ताकदही होती. हीच परिस्थिती मराठी चित्रपटांच्या बाबतीत, एक तर भव्य दिव्य बजेट मराठी चित्रपटांसाठी मिळणंच कठीण. त्यामुळे त्याच्या कथा-पटकथा संवाद यांवर ज्यांनी व्यवस्थित काम केलं, त्यांना अगदी सेलिब्रिटी स्टार कास्टची गरज देखील पडली नाही हे अनेकदा सिद्ध झालंय.

 

‘नमश्कार, मै आशिष विद्यार्थी, आपका अपना कहानीबाज...' अशी सुरुवात होत ‘गाना डॉट कॉम'च्या कहानीबाज सिरीजमधील एक-एक गोष्ट उलगडू लागते. मानवी स्वभावाचे वेगवेगळे पैलू उलगडणाऱ्या गोष्टी आपल्या कानांतून मनात उतरू लागतात. मोठे कुणी स्टार कास्ट नाही, व्हीएफएक्सचा तामझाम नाही, किंबहुना दृश्येच नाहीत, कारण ही सिरीजच ऑडिओ आहे.

कानात हेडफोन टाकायचे, डोळे बंद करायचे आणि आशिष विद्यार्थी या विविधांगी जवळपास अकरा भाषांतील सिनेमांत काम केलेल्या तगड्या अभिनेत्याच्या भारदस्त आवाजात गोष्ट अनुभवायची. गोष्टीतील स्त्री पात्र असो वा पुरुष पात्र, वय कोणतेही असो गोष्ट सांगता सांगता आशिष विद्यार्थी स्वतःच त्या पात्राचा आवाज लीलया काढत असतात. त्यांच्या आवाजाला साउंड इफेक्ट्स आणि म्युझिकची जोड मिळते, तेव्हा आपण जणू त्या गोष्टीतील एखादं पात्र बनून गेलोय, असा भास होतो. आजवर झालेल्या तीन सिझन्स, प्रत्येक सिझनमधील दहा अशा तब्बल तीस गोष्टी सस्पेन्स, थ्रिलर, मिस्ट्री, रोमान्स, हॉरर अशा विविध प्रकारच्या गोष्टींचा खजिना ‘गाना डॉट कॉम’च्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर आपल्यासाठी निःशुल्क उपलब्ध आहे. सौरभ भ्रमर लिखित या सर्व गोष्टींची बांधणी एवढी गोळीबंद आहे की आपणास ती गोष्ट मध्येच सोडून जाण्यची वेळ आली, तर तार मध्येच तुटल्याची हुरहूर लागून राहते. पहिल्या सिझनमध्ये गोष्टींच्या मध्येच गाणी असल्याने, ती गाणी कधीकधी त्रासदायक वाटू शकतात, हे जाणून घेऊन पुढील सिझन्समध्ये त्यांनी अखंड गोष्ट ठेवली आहे. ऑडिओ बुकचा रटाळ एकसुरी आवाज आपण ऐकला असेल, तर ही कहानीबाज सिरीज आपणास ऑडिओ फिल्म म्हणजे, काय याचा वेगळा अनुभव नक्कीच देईल.‘चला हवा येऊ द्या !' मध्ये अरविंद जगतापलिखित पत्रांना सागर कारंडे वाचून दाखवायचा तेव्हा कुठे गरज पडली कोणत्या तामझामाची? तरीही प्रेक्षकांच्या हृदयाला भिडलीच ना ती पत्रं? सगळ्या महाराष्ट्राला हसवण्याची, रडवण्याची ताकद त्या लेखकाच्या लेखणीत आणि सागरच्या वाचिक अभिनयात होती. एक शॉट पाच पाच वेळा घेऊन, देशभरातील जवळपास ६०० स्टुडिओंनी आपले तंत्रज्ञान पणाला लावून, प्रत्येक अभिनेत्याने, तंत्रज्ञाने जीव तोडून मेहनत घेऊन उभ्या केलेल्या ‘झीरो’ला एखादा प्रेक्षक स्टोरी नाही म्हणून, ‘झीरो स्टार' देऊन जातो, तेव्हा त्या सर्व मेहनती हातांबद्दल सहानुभूती निर्माण होते. दुनियेचा उसूल असाच आहे, हा काही गणिताचा पेपर नाही, की तुम्हाला स्टेप्सला मार्क मिळतील. प्रेक्षकांसमोर जी काही अंतिम कलाकृती उभी आहे, तिच्यावरच प्रेक्षक आपला अभिप्राय देऊन मोकळे होतात. चित्रपट निर्माते-दिग्दर्शक स्टोरीवर लक्ष देतील, तेव्हा देतील पण सुज्ञ प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या वेबसाइट-अॅप्सवर, विविध ऑडिओ आणि व्हिडिओ सिरीज उपलब्ध आहेत, ज्यांनी कथेची प्राथमिकता अजून तरी सांभाळली आहे. त्यातीलच एक म्हणजे, सौरभ भ्रमर लिखित आशिष विद्यार्थी यांच्या आवाजातील कहानीबाज. ‘श्टोरी सबकुछ' या सदरात मी सिनेमा, ऑडिओ-व्हिडिओ सिरीजची ‘कहानीबाज’ सौदर्य स्थळं उलगडणार आहे. गरज आहे, तुमची ‘कहानीप्यास' जागवण्याची...


(लेखक पुणेस्थित नव्या पिढीतले पटकथाकार - दिग्दर्शक आहेत.)
लेखकाचा संपर्क : ८३०८६३९३७७