आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुंकार... ‘ती’च्या आतल्या आवाजाचा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महेश मुंजाळे

‘ओटी, नारळ, खण, हळद, कुंकू, माँ-माती’ या फेऱ्यात अडकलेल्या सिनेमाचा प्रेक्षक नवीन काहीतरी मिळेल, या आशेने ‘रामायण-महाभारत’ पाहता पाहता पुन्हा ‘सासू, सून, जाऊ, कट-कारस्थान’ याच कचाट्यात गुरफटला. पण, आता वेबसिरीज नवी दृष्टी घेऊन आल्या आहेत. वेळेचं बंधन नाही, सेन्सॉरशिप नाही, त्यामुळे विषयाला बंधनंही नाहीत. सोशिक, सात्त्विक, अबलेच्या रूपातली स्त्री या माध्यमातून मानसिकता आणि मूलभूत मागण्यांवर वेगळ्या रूपात बोलते आहे. स्त्रीत्वाचे अनेक पदर उलगडणाऱ्या अशाच काही महत्त्वाच्या वेबसिरीज, वेब शोजचा हा वेध... व्हॉट वुमन वॉन्ट :


ती येते, नवनव्या लोकांना (शक्यतो महिलांना) आपल्या समोर आणते. त्यांच्याशी गप्पा मारते आणि त्यांच्या मनातलं महत्त्वाचं काही बाहेर काढते. ती म्हणजे करीना कपूर खान, आणि त्या म्हणजे- कधी मलाण्का अरोरा, कधी शर्मिला टागोर, कधी सारा अली खान तर कधी काजोल. कधी कोण तर कधी कोण.. पण विषय बाईच्या मनातले, तिच्या जवळचेच. या सगळ्या सेलिब्रिटीज असल्या म्हणून काय झालं? त्यांचं बाई असणं त्यांना कधी चुकलंय का? मलायकाच्या घटस्फोटापासून कल्की कोचलिनच्या अविवाहित असूनही गरोदरपणाच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींवर चर्चा ऐकताना आपल्या रूढीवादी मेंदूला धडाधड सुरुंग लागतात. महिलेला काय गरजेचं आहे हे आजवर सर्वांनी स्वतःच ठरवलं. तिला स्वतःला काय हवंय हे सांगणारा शो म्हणजे ‘व्हॉट वुमन वॉन्ट’.

मेड इन हेवन :


भल्या मोठ्या लग्न समारंभांच्या पार्श्वभूमीवर नात्यांचे, माणसांचे, त्यांच्या विचारांचे मुखवटे उतरवून खरे चेहरे दाखवणारी ही सिरीज तर भन्नाट आहेच, पण यातील चौथा भाग उल्लेखनीय म्हणावा असा आहे. लग्नमंडपाच्या दाराशी वरात येऊन उभी आहे, पण ती आत यायला का उशीर करतेय याची चौकशी केल्यावर समजलं की वरपक्षाकडून वधूच्या पित्याला तब्बल चार कोटी रुपये हुंड्याची मागणी केली जात आहे. आयत्या वेळी वरात मागे पाठवणे, लग्न मोडणे म्हणजे आपल्या समाजात आत्महत्याच जणू. म्हणून नाइलाजाने वधूपिता तयार होतो, पण प्रियांका, म्हणजे नवरीमुलगी हातातला हात काढते, गाठ सोडते आणि भर मांडवातून लग्न मोडून निघून जाते. आत्मविश्वासाने निर्णय घेणारी प्रियांका (श्वेता त्रिपाठी) नकळतपणे जगाला खूप काही सुनावून जाते.

गर्ल इन द सिटी :


अवघ्या २१ वर्षांची, मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी, कडक शिस्तीच्या बापाची मुलगी स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करत मुंबईसारख्या अवाढव्य शहरात एकटी दाखल होते. तिचे करिअर, कुटुंब, ऑफिस या सर्व पातळ्यांवर चालू असणारे संघर्ष सांभाळत ती या नवख्या शहरात रुळण्याचा प्रयत्न करते. आवडीच्या करिअरद्वारे स्वतःची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी हवी ती संकटे झेलणारी खमकी मीरा म्हणजे अभिनेत्री मिथिला पालकर पाहताना बांगड्या भरणारी, लेचीपेची, मुळूमुळू रडणारी बाई या संकल्पनेला थेट तडाच बसतो.

लस्ट स्टोरीज :


राधिका आपटे, नेहा धुपिया, मनीषा कोइराला, भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी यांची ‘लस्ट स्टोरीज’ मधील पात्रं बऱ्याच वास्तववादी पद्धतीने उभी केली आहेत. फरक एवढाच की हे वास्तव पाहण्यासाठी आपले डोळे तितके जागृत नाहीत. पुरुषाच्या शारीरिक गरजा भागवण्याचे कित्येक उपाय आहेत, पण स्त्रियांनी त्यांच्या शारीरिक गरजेबद्दल बोलणंसुद्धा महापाप अशा समाजात या चार महिलांनी दाखवलेलं विश्व हादरे देणारं आहे. या स्त्रिया त्यांच्या लैंगिक वासनांचा निचरा करण्याचे मार्ग शोधून काढतात, ज्यातून कथा उलगडत जाते. एखाद्या स्त्रीची शारीरिक तृष्णा पूर्ण होणं हीसुद्धा एक समस्या असू शकते हे आपल्या ‘सभ्य, सुसंस्कृत’ मेंदूला कधी जाणवणार आहे? म्हणून तरी ‘लस्ट स्टोरीज’ पाहायलाच हवा.सिटी ऑफ ड्रीम्स :


भारतीय मानसिकतेचा, राजकीय (अ)संस्कृतीचा अभ्यास करून ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ प्रेक्षकांसमोर आली आहे. एका स्त्रीचा राजकारणाकडे असलेला कल, तिच्या उत्तुंग इच्छा-आकांक्षा पण तिला स्त्री म्हणून मिळालेलं दुय्यम स्थान, त्यातून तिने संघर्ष करून काढलेला मार्ग अशा चढउतारांच्या कथानकाची ही वेबसिरीज. बहिणीच्या,  बायकोच्या,  मुलीच्या आणि नंतर एका कणखर राजकीय नेतृत्वाच्या प्रत्येक व्यक्तीच्या छटा अभिनेत्री प्रिया बापटने यात व्यवस्थित साकारल्या आहेत. ‘राजकीय नेत्याचा उत्तराधिकारी होण्यासाठी त्याची मुलगी कितीही सक्षम दावेदार असली तरीही समाजच काय बापसुद्धा मुलावरच हात ठेवेल. कारण हे सगळं दोन पायांच्या मध्ये कोणता अवयव आहे यावरून ठरतं.’ म्हणजे लिंगभावाच्या आधारेच तुमच्या क्षमता ओळखल्या जातात. अशा आशयाचे दणदणीत डायलॉग्ज प्रिया बापटच्या तोंडून ऐकताना पाहणाऱ्यालाच रिअॅलिटी चेक बसतो. स्त्रियांच्या शारीरिक समस्यांपासून मानसिक गरजापर्यंत, तिच्या कौटुंबिक सन्मानापासून सामाजिक-राजकीय स्थानापर्यंत तिला काय हवंय आणि काय नकोय याचं चित्रण वेगवेगळ्या वेबशोज आणि वेबसिरीजमधून उभं राहतंय.  ‘गर्लीयापा’, ‘डाइस मीडिया’, नावाच्या वेबचॅनलद्वारे कॉलेजवयीन मुलींसाठी, पुरुषांसाठी टॅबू असणाऱ्या विषयांवर वेगवेगळ्या सिरीज येतच असतात. गोष्टी काल्पनिक असल्या तरी त्यांची मुळं वास्तवातच रुजलेली आहेत. जर पुरुष असू किंवा रूढीवादी महिला असू तर आजच्या स्त्रीची स्वप्नं काय आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांच्या क्षमता काय आहेत हे समजून घेणं उलट अधिक महत्त्वाचं आहे त्यासाठी ‘ती’चं म्हणणं मांडणारी ‘वेब’ फिरून यायला हवीच. 

संपर्क- ८३०८६३९३७७