श्टोरी सबकुछ / दोन हातांच्या टाळीची बेताल मानसिकता

या अशा विचारांमुळे एका मुलीला तिचं आयुष्य प्रचंड वेदनेत गमावावं लागलं

दिव्य मराठी

Aug 04,2019 12:07:00 AM IST

“ताली कभी एक हात से नहीं बजती, दोनो हाथो से बजती है. कोई शरीफ लडकी रात के नौ बजे नहीं घुमती’ असं मुकेश सिंग नावाचा आरोपी बीबीसीच्या डॉक्युमेंटरीमध्ये बोलतो. त्यांचा वकील स्वतः असं म्हणतो की “लेडी, वुमन, गर्ल आर मोअर प्रेशियस दॅन जेम. इफ यू पुट युवर डायमंड ऑन द स्ट्रीट सर्टन्ली डॉग विल टेक इट ऑफ, यू कांट स्टॉप.’ या अशा विचारांमुळे एका मुलीला तिचं आयुष्य प्रचंड वेदनेत गमावावं लागलं.

साउथ दिल्लीच्या डीसीपी छाया शर्मा यांच्या स्पेशल टास्क फोर्सद्वारे ही सर्व तपास मोहीम पूर्ण झाली. त्या नेतृत्वाला, त्या टीमच्या दिवसरात्रीच्या मेहनतीला सलाम म्हणून नेटफ्लिक्सने एक वेब सिरीज तयार केली तिचं नाव आहे ‘दिल्ली क्राइम’. निर्भया प्रकरणातील सर्व घटनांना एकत्र गुंफून, काहीसं कलात्मक स्वातंत्र्य घेत काल्पनिक गोष्टींचाही समावेश करत ही सात भागांची ‘दिल्ली क्राइम’ तयार झालीय.

"एखादी वस्तू महाग आहे, मौल्यवान आहे मग ती मी जपून ठेवायला नको? समाजात हे असं फिरणं समाज दूषित करण्यासारखं आहे. ते शरीर झाका, मग चादर का वापरेना, पण झाका. वृद्ध झालेल्या महिलांनी हे एक वेळ नाही पाळलं तरी चालेल पण तरुण महिलांनी हे पाळायलाच हवं. त्यांचं संरक्षण कोण करणार? निर्भया प्रकरण जे झालं ते दुर्दैवी होतं, पण ती जर घरात असती, गोषा पद्धतीत असती तर हे घडलच नसतं. तुम्ही काय केलंय, मुलांचे हातपाय बांधलेत आणि पाण्यात टाकलंय. वर म्हणतायं कपडे भिजू देऊ नकोस. कपडे तर भिजणारच, "ताली दोनो हाथ से ही बजती है ना.' ही वाक्ये आहेत एका प्रतिष्ठित, उच्चविद्याविभूषित, वयोज्येष्ठ, स्वयंघोषित विचारवंत व्यक्तीची. आता काही दिवसांपूर्वी एका लेखासाठी माहिती गोळा करताना या गृहस्थांशी बोलणं झालं आणि हे असे विचारधन कानी पडले.


तिच्या सुरक्षेपेक्षा आपल्या मालकी हक्काची, इज्जतीची, इभ्रतीची आपल्याला जास्ती चिंता आहे. स्त्री म्हणजे आपली संपत्ती आहे. ती इतर कुणी लुटू नये ही आपली काळजी आहे. "पोरगी म्हणजे जबाबदारी' असं कित्येक बापांच्या तोंडून आपण ऐकलं असेल. वेशभूषा, केशभूषा, वागणं, बोलणं, चालणं, हसणं या प्रत्येक गोष्टीद्वारे स्त्रीच्या जगण्यावर बंधन घालून पुरुषी वर्चस्व प्रस्थापित करतो आपण. जणू भारतीय संस्कृती जपण्याची आणि स्त्रीच्या सुरक्षेची आपल्या खांद्यांवर एवढी मोठी जबाबदारी आहे की ती जबाबदारी पाळण्यासाठी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो. असेच काही लोक त्यांची जबाबदारी निभावण्यासाठी गेले आणि सगळा देश हादरून गेला.


१६ डिसेंबर २०१२, भारताच्या राजधानीतली घटना. ती आणि तिचा मित्र रात्री चित्रपट पाहून दिल्लीच्या मुनिरकावरून द्वारकेला जाण्यासाठी रिक्षा शोधत होते. इतक्या दूर रिक्षाचालक येण्यासाठी राजी होत नव्हते. शेवटी त्यांनी एक खासगी बस पकडली. बस मध्ये बसचालकासह पाचजण आधीपासूनच होते. त्यात एक वयाची अठरा वर्षेसुद्धा पूर्ण न झालेला मुलगा होता. त्या दोघांचं असं एवढ्या रात्री सोबत फिरणं, त्यांच्यात काही प्रेमसंबंध वगैरे असणं हे त्या सहा जणांतील एकाला पाहावलं नाही. त्याने तरुणाशी हुज्जत घालायला सुरुवात केली. त्याला मार मार मारलं, मग तरुणीमध्ये पडली तर तिलाही मारलं आणि तिला आयुष्याचा धडा शिकवायला पाहिजे असं म्हणून तिला समोरच्या सीटवरून मागे फरपटत नेलं. तिथे तिला मारत, तिचे कपडे फाडत तिच्या चेहऱ्याला, अंगाला चावे घेत तिच्यावर बलात्कार केला गेला. एकामागून एक जण तिथे मागे जात होता आणि तिच्यावर बलात्कार करत होता. या बलात्काऱ्यांत तो मुलगासुद्धा होता. तिने विरोध केला तर तिला लोखंडी रॉडने मारण्यात आलं. तिच्या योनीतून तो रॉड टाकला गेला. तिच्या सर्व आतडी बाहेर काढल्या गेल्या. स्वतःच्या हैवान शरीराची, मनाची भूक भागल्यानंतर त्यांनी त्या दोघांना नग्न अवस्थेतच रस्त्यावर फेकून दिलं आणि निघून गेले.


"ताली कभी एक हात से नहीं बजती, दोनो हाथो से बजती है. कोई शरीफ लडकी रात के नौ बजे नहीं घूमती' असं मुकेश सिंग नावाचा आरोपी बीबीसीच्या डॉक्युमेंटरीमध्ये बोलतो. त्यांचा वकील स्वतः असं म्हणतो की "लेडी, वुमन, गर्ल आर मोअर प्रेशियस दॅन जेम. इफ यू पुट युवर डायमंड ऑन द स्ट्रीट सर्टन्ली डॉग विल टेक इट ऑफ, यू कांट स्टॉप.' या अशा विचारांमुळे एका मुलीला तिचं आयुष्य प्रचंड वेदनेत गमावावं लागलं. या गंभीर प्रकरणाची माध्यमांनी मोठ्या प्रमाणावर दखल घेतली. संपूर्ण देश पेटून उठला. संसदेबाहेर, इंडिया गेटवर मोर्चे निघाले. देशभरातील शहरांच्या चौकाचौकांत मेणबत्त्या घेऊन जाणारे जागरूक भारतीय दिसू लागले. संसदेत गदारोळ झाला. आरोपी सापडले गेले. त्यांच्यावर फास्टट्रॅक कोर्टाद्वारे खटला चालवला गेला. बालगुन्हेगाराला सुधारगृहात टाकण्यात आलं तर इतरांना फाशी सुनावली. त्यातील एकाने तिहार तुरुंगात असताना आत्महत्या करून स्वतःला संपवलं.


हा सर्व घटनाक्रम जवळपास प्रत्येक भारतीय व्यक्तीला माहिती आहे. आपल्याला अशाच गोष्टी माहिती होतात ज्यांना न्यूजव्हॅल्यू आहे. सनसनाटी बातम्या आपल्यापर्यंत पोहचायला वेळ लागत नाही. आपल्यालाही फार खोलात जाण्याची गरज वाटत नसते. आपण "सविस्तर' पेक्षा "थोडक्यात'वर जास्त भर देतो. म्हणूनच विस्तृत बातम्या, संपादकीय किंवा दर्जेदार परिसंवाद वगैरेपेक्षा बातम्या ट्वेंटी ट्वेंटी, बातम्या सुपरफास्ट, एका मिनिटात पन्नास बातम्या, शंभर बातम्या. टॉप टेन बातम्या असा सगळा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. आयुष्य कसोटीपेक्षा वन डे आयपीएल म्हणून रुचकर झालंय. असो, तर अशा आपल्या "थोडक्यात' स्वभावामुळे आपण फार खोलात गेलो नाही आणि आपल्याला त्या निर्भया प्रकरणाचा तपास कुणी केला? कसा केला? हे आपल्यापर्यंत तेवढ्या त्वरेने पोहोचलं पण नाही.


१६ डिसेंबरला ही घटना घडली. पांढऱ्या रंगाची खासगी बस, तिचे ढोबळ वर्णन आणि आरोपींच्या संभाषणातून ऐकलेली त्यांची नावे या व्यतिरिक्त हातात काहीच नसताना एवढ्या मोठ्या दिल्ली शहरात, एवढ्या प्रचंड लोकसंख्येत ते सहा आरोपी शोधणं किती जिकिरीचं असेल? तरीही पोलिस यंत्रणेने घटनेच्या केवळ दोन दिवसांत चार आरोपींना जेरबंद केलं आणि पुढच्या दोन दिवसांत उर्वरित दोन आरोपींतील एकाला दिल्लीतून आणि एकाला बिहारमधून अटक केली. केवळ अटक करून चालणार नव्हतं, सर्वांचे आरोप निश्चित व्हावेत, कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी सबळ पुरावे गोळा करण्याचे कामही पोलिसांनी केले. देशातील जनतेच्या मनातली त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी ही इच्छा न्यायाधीशांच्या शिक्षा सुनावणीतून स्पष्ट झाली त्याचे सर्वात मोठे श्रेय जाते पोलिसांच्या अथक परिश्रमाला. परंतु आजवर आपल्याला त्यांच्या मेहनतीबद्दल तर सोडाच, त्या तपासकार्याच्या प्रमुखाबद्दलसुद्धा माहिती नाहीये.


साउथ दिल्लीच्या डीसीपी छाया शर्मा यांच्या स्पेशल टास्क फोर्सद्वारे ही सर्व तपास मोहीम पूर्ण झाली. त्या नेतृत्वाला, त्या टीमच्या दिवसरात्रीच्या मेहनतीला सलाम म्हणून नेटफ्लिक्सने एक वेब सिरीज तयार केली तिचं नाव आहे "दिल्ली क्राइम'. निर्भया प्रकरणातील सर्व घटनांना एकत्र गुंफून, काहीसं कलात्मक स्वातंत्र्य घेत काल्पनिक गोष्टींचाही समावेश करत ही सात भागांची "दिल्ली क्राइम' तयार झालीय. रिची शर्मा लिखित-दिग्दर्शित या सिरीजमध्ये डीसीपी छाया शर्मा यांच्यावर प्रेरित होऊन डीसीपी वर्तिका चतुर्वेदी हे पात्र निर्माण केलं गेलंय. अभिनेत्री शेफाली शहा यांनी हे पात्र साकारलं आहे. सोबतीला रसिका दुग्गल, आदिल हुसेन व राजेश तेलंग यांसारख्या कलाकार मंडळींनी वेब सिरीजमध्ये प्राण ओतले आहेत.


कुठल्याही घटनेचं नाट्य रूपांतरण करताना त्यात काही काल्पनिक घटना टाकल्या जातातच. अपेक्षा एवढीच की सत्याशी फारकत असू नये. पोलिस म्हटलं की भ्रष्ट, नीतीहीन, कामचुकार असं काहीसं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. हे चित्र उभं करण्यासाठी अर्थातच पोलिसच कारणीभूत आहेत. परंतु,सामान्यीकरण करताना गव्हाबरोबर किडेही ररगडले जातात हे ही तितकच खरं आहे. कार्यक्षम, मेहनती पोलिसांच्या कर्तृत्वाला या अशा वेब सिरीजद्वारे जनतेच्या समोर आणल्यास पोलिसांची प्रतिमा सुधारेल आणि इतर खऱ्या कामचुकार पोलिसांना कदाचित प्रेरणासुद्धा मिळेल, पण आपल्या "दोन हाती टाळीच्या बेताल मानसिकतेचं' करायचं काय? की वाट पाहायची कठूआ क्राइमची, कोपर्डी क्राइमची आणि उन्नाव क्राइमची?

लेखकाचा संपर्क : ८३०८६३९३७७

X