आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पॅव्हिलियन’ नसणारी प्लेअर!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महेशकुमार मुंजाळे

बहुचर्चित ‘थप्पड’ मध्ये एक बाप आपल्या मुलीच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला दाखवण्यात आला आहे. जेव्हा आपण स्त्रीप्रश्नावर भाष्य करत असतो तेव्हा तिला तिची ठाम भूमिका घेताना नवरा, बाप, भाऊ, ‘छपाक’ मधला प्रियकर किंवा ‘पिंक’ मधला अमिताभसारखा वकील अशा कोणत्या ना कोणत्या भूमिकेतून पुरुषच का लागतो? स्वबळावर ठामपणे कसं उभं राहायचं हे आजवर कुणी सांगितल्याचं शक्यतो पाहायला मिळणार नाही.
‘घराची, नवऱ्याची, सासू-सासऱ्याची मनापासून काळजी करणारी, त्यांच्यासाठी अहोरात्र झटणारी गृहिणी अमृता (तापसी पन्नू) विक्रम सोबत (पावेल गुलाटी) अगदी आदर्श म्हणावा असा संसार करत आहे. विक्रम एका मोठ्या कंपनीत चांगल्या मोठ्या हुद्द्यावर आहे. कंपनीच्या एका प्रोजेक्टसाठी विक्रम रात्र रात्र जागून मेहनत करतोय. जेणेकरून त्याला लंडनच्या ऑफिसचा सीईओ बनायचंय. या रामरगाड्यात काहीतरी उलटपालट होऊन जातं, विक्रमच्या मनासारखं काही घडत नाही, त्याचा पारा चढतो, भरपार्टीत त्याचा ऑफिसमधील सहकाऱ्यावर सूर वाढतो. अमृता त्याला समजवायला येते. ती त्याला बाजूला करू लागते..... आणि विक्रम सगळा राग अमृतावर काढतो, भरपार्टीत सगळ्या लोकांसमोर तिच्या कानाखाली एक ‘थप्पड’ ठेवून देतो. इथून अमृताच्या मानसिक प्रवासाला सुरुवात होते.’ ही गोष्ट आहे मागच्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘थप्पड’ या चित्रपटाची. थप्पड ही केवळ अमृताची किंवा त्या चित्रपटात असणाऱ्या इतर बायकांची गोष्ट नाही. ती गोष्ट आहे तुमच्या-आमच्या घराची, संसारांची.‘एक कानाखाली दिली ठेवून तर काय असा फरक पडलाय?’ असे म्हणणारे कित्येक लोक होतेच माझ्याही जवळ चित्रपटगृहात. अमृता माहेरी जाते तेव्हा तिच्या आईने जो प्रश्नांचा भडिमार सुरू केला तो थांबवण्यासाठी तिचे वडील मधे पडतात “उसे अपने घर आने के लिये कोई वजह बतानी पडेगी क्या?” त्यावर तिची आई “उसका अपना घर वो है, ये नहीं” असं जेव्हा म्हणते तेव्हा माझ्या शेजारचे लोक तिच्या आईची वाह वाह करत होते. हेच लोक घरी जाऊन बायकोकडून काही चूक झाली तर भांडणात ‘जा तू तुझ्या माहेरी, नीघ माझ्या घरातून’ असंही कित्येकदा म्हणत असतील याची मला खात्री आहे. मारहाण किंवा एक थप्पडच कशाला, अगदी मानसिक छळ झाल्यावर त्या बाईने त्या घरात राहायचं नाही असं ठरवलं किंवा तिला नवऱ्याने घरातून काढून दिलं तर ती जाणार कुठे? माहेरी?‘हारजीत तो चलती ही रहती है !’ पण ती हार पचवण्यासाठी किंवा जीत मनवण्यासाठी गरज असते आपले खंबीर साथीदार असणाऱ्या किंवा हक्काचं छत असणाऱ्या ‘पॅव्हिलियन’ची. पण अहोरात्र युद्धभूमीवरच असणारी आणि स्वतःचं म्हणावं असं ‘पॅव्हिलियन’ नसणारी प्लेअर म्हणजे ‘स्त्री’. भारतीय परंपरेने एवढंच शिकवलं आहे की ‘बेटी पराया धन होती है’, ‘बेटी जिस घर में तेरी डोली गयी है उसी घर से तेरी अर्थी निकलेगी’. माहेरच्यांनी तिला नवऱ्याकडे ढकलावं आणि सासरच्यांनी तिला माहेरचे थारा देणार नाहीत हे जाणून घेऊन तिच्याशी हवं तसं वागावं. अमृताच्या घरी येणाऱ्या मोलकरणीला, सुनीताला तिचा नवरा रोज मार मार मारतो. तो जेव्हा मारायला सुरुवात करतो तेव्हा ही मोठमोठ्याने ओरडत बाहेर येते आणि बाहेरून कडी लावते. अशा तऱ्हेने तिने मार वाचवण्यासाठी तिचा-तिचा काहीतरी मार्ग काढलाय. पण एकदा अमृताशी बोलताना ती सांगून जाते की “दीदी कल उसने फिर मारी, पर कल है ना मैंने सोची, इसने अंदर से कुंडी लगाली तो कहां जावेगी?” हाच मूळ प्रश्न घेऊन आज भारतात कित्येक स्त्रिया जगत असतील. “आम्ही तीस वर्षे संसार केला, आमचं काय लव्ह मॅरेज होतं का काय?” असं म्हणणाऱ्या बाईने स्वतःला एक प्रश्न विचारावा, कधी तिला या नवऱ्याचा वैताग आला नाहीये का? त्याला कधी सोडावा वाटला नाहीये का? पैज लावून सांगतो, असे विचार कित्येकदा आले असणार. पण आपल्या संस्कृतीने परतीचे दोर कापले आहेत.
आता इथेच लढून मरायचंय म्हणून ती बळेबळेच हसून सुखी संसाराचे गाणे गातेय. ‘तुला जिथं कुठं तुझं तोंड काळं करायचंय तिथं कर, माझी पोरं नाय घेऊन जायची.’ हे असेही संवाद स्वतःच्या, शेजारच्या घरांत ऐकले असतीलच आपण. तिने यावं धुणी-भांडी, स्वयंपाक करावा. याची शय्यासोबत करावी, त्याच्या आईबापाची सेवाशुुश्रूषा करावी, पोरं जन्माला घालावी आणि काही खटके उडाले तर त्याने “तू काय करतेस माझ्यासाठी?” असं म्हणून ‘जा तुझ्या घरी’ म्हणत हाकलून द्यावी. मग तिने माहेरी जावं. त्यांनी तिलाच समजावून सांगावं, ‘बाईची जात आहे, एवढा राग बरा नाही, थोडी अॅडजस्टमेंट करावी लागते, आपणच संसार जोडून ठेवायचा असतो’. हेच अमृतालाही सांगितलं गेलं. अगदी वकिलाकडूनही; तेव्हा ती म्हणते ‘जोडने की कोशिश करनी पड रही है मतलब वो रिश्ता टूटा हुआ है ना.’‘नहीं मार सकता, एक थप्पड भी नहीं मार सकता’ म्हणत अमृता नवऱ्याच्या विरोधात उभी राहिली, ‘फार मोठं काही झालं नाहीये’ असं म्हणणाऱ्या सासूला विरोध सुनावून आली, ‘बाईने सहन करावं’ असं सांगणाऱ्या आईला समजावून सांगून आली कारण तिच्या पाठीशी तिचे वडील खंबीरपणे उभे होते. “बेटा जिद में आकर नहीं, दिल से आवाज आ रही है तो ये सब कर” असं म्हणणारा बाप तिच्या पाठीशी उभा होता. आणि इथेच आक्षेप घेणे गरजेचे आहे. अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा, त्याची कॉन्सेप्ट निःशंक भन्नाट आहेच, पण बाप पाठीशी असल्याने अमृताचा संघर्ष बराच सोपा झालाय. तिच्या पाठीशी असणारा बापाचा हात बाजूला काढून पाहाल तर घरदार नसलेली, रस्त्यावर आलेली गरोदर बाई दिसेल. तिच्याएवढं हतबल कुणीच सापडणार नाही. जेव्हा आपण स्त्रीप्रश्नावर भाष्य करत असतो तेव्हा तिला तिची ठाम भूमिका घेताना नवरा, बाप, भाऊ, ‘छपाक’ मधला प्रियकर किंवा ‘पिंक’ मधला अमिताभसारखा वकील अशा कोणत्या ना कोणत्या भूमिकेतून पुरुषच का लागतो? वास्तवात सगळ्या स्त्रियांना नाहीत मिळत असे पुरुष किंवा असं कुठलं सासर-माहेरचं घर जे तिच्या अशा कुठल्या प्रवाहाविरुद्धच्या निर्णयात तिला खंबीर साथ देईल. अशा वेळी त्या स्त्रियांनी काय करायचं? स्वबळावर ठामपणे कसं उभं राहायचं हे आजवर कुणी सांगितल्याचं शक्यतो पाहायला मिळणार नाही. खायला अन्न आणि राहायला हक्काची जागा नसेल तर कुठलीही लढाई सक्षमपणे दीर्घकाळ लढणं सोपं नाही. सासरचं घर नवऱ्याचं आहे हे नवऱ्याने आणि समाजाने हजारदा सांगितल्याने आणि तथाकथित संस्कार आणि रूढी-परंपरांनी मुलीला माहेरची चार दिवसांची पाहुणी केल्याने माहेरच्या घरावरसुद्धा तिला तिचा अधिकार नसल्याची खात्री पटली आहे. म्हणूनच तिला स्वबळावर उभं करण्यासाठी अगोदर स्वतःचं ‘पॅव्हिलियन’ ओळखून ते निश्चित करावं लागेल किंवा स्वतः स्वतःचं ‘पॅव्हिलियन’ उभं करावं लागेल. औरंगाबादजवळच्या पाटोदा नावाच्या एका छोट्याशा खेड्यात ग्रामपंचायतीने स्वतः हुकूम सोडलाय आणि प्रत्येक घराच्या बाहेर नवरा-बायको दोघांची नावं लिहिण्याचे आदेश दिलेत. कुणी म्हणेल याने काय फरक पडेल? फरक पडतो, बाईच्या मानसिकतेमध्ये फरक पडतो. जोवर तिला ते स्वतःचं हक्काचं घर वाटत नाही तोवर ती मान वर करून पाहू शकत नाही. तिला थारा नसल्याने अशा कित्येक थपडा सहन कराव्या लागतात. भांडण झाल्यावर नवऱ्याला घराबाहेर हाकलून देण्याच्या घटना किती पाहिल्यात आपण? नाहीच ना? कारण तिला माहीतच नाही की याचा तिला हक्क आहे. हीच वस्तुस्थिती ‘हक्कसोड’ पत्राची, भावांनी तिला बोलवून घ्यावं हक्कसोड पत्रावर सह्या घ्याव्यात आणि साडीचोळीची बोळवण करून पाठवणी करून द्यावी. या माहेरच्या जमिनीवर, घरावर तिचा हक्क आहे हे तिच्या बिचारीच्या गावीच नाही. अधिकार माहीत असणं म्हणजे त्यांची लगेच अंमलबजावणी करणं नव्हे, त्या अधिकारातून आलेली निश्चिंतता अनुभवणं हासुद्धा त्या अधिकाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. वेळ पडल्यास दोन्ही घरचे हात वर करून तिला रस्त्यावर यायला भाग पाडू शकत नाहीत हे तिला माहिती असायला हवं.‘थप्पड’ रागाच्या भरात आलेली एक छोटी प्रतिक्रिया आहे असं म्हणून आपण सोडून देऊ शकतो, पण त्यामागच्या मानसिकतेला आपण कधी प्रश्न विचारणार आहोत? आपण राग आला म्हणून कुणावरही हात उगारत नसतो, समोरच्या व्यक्तीचं उपद्रवमूल्य किती आहे याची पडताळणी आपल्या मनात कुठेतरी झालेली असते म्हणूनच ती क्रिया घडते. समोरच्या व्यक्तीला गृहीत धरणं, तिचा आपल्याला काहीच उपद्रव नाही हे जाणून असणं किंवा आपण कसेही वागलो तरी तिला आपल्यासोबत राहण्यावाचून पर्याय नाही हे जाणून असणाऱ्या पुरुषी मानसिकतेवर हल्ला करत आत्ममग्न पुरुषाची अतिशय संयतपणे या चित्रपटात चिरफाड केली आहे. अमृताला वडिलांची आणि नंतर संपूर्ण घराची साथ मिळाली, पण स्त्रीला भूमिका घेण्यासाठी कुणी साथ दिली तर ठीक, नाहीच तर तिला तिच्या नोकरीचा, व्यवसायाचा आधार असावा किंवा ती गृहिणी असेल तर तिला तिच्या अधिकारांची कल्पना असावी. मग येऊदेत कितीही भल्या भल्या पुरुषी मानसिकतेचे लोक, फतवे नाहीतर स्वयंघोषित कीर्तनकार-तीर्थकरांचे समविषम थरथरणारे रानटी सल्ले... त्यांना दणदणीतपणे टोलवणं तिला नक्कीच सोपं जाईल कारण तेव्हा ती बिना ‘पॅव्हिलियन’ची प्लेअर नसेल.

संपर्क - ८३०८६३९३७७
 

बातम्या आणखी आहेत...