Home | Magazine | Rasik | Maheshkumar Mujale writes about web series

‘सास-बहू-साजिश’च्या पल्याड

महेशकुमार मुंजाळे | Update - Apr 28, 2019, 12:06 AM IST

वेबच्या जंजाळात काहीशी झाकोळून गेलेली एक वेब सिरीज म्हणजे ‘व्हॉट द फॉक्स'

 • Maheshkumar Mujale writes about web series

  वेबच्या जंजाळात काहीशी झाकोळून गेलेली एक वेब सिरीज म्हणजे ‘व्हॉट द फॉक्स'. डायस मीडियाने बनवलेली ही हिंदी-इंग्रजी भाषेची सरमिसळ असलेली वेब सिरीज यूट्यूबवर उपलब्ध आहे. टिपिकल सास-बहू-साजिश पेक्षा ही बरीच हटके आहे. ही सिरीज जेव्हा आपण पाहतो तेव्हा सरतेशेवटी सासूने कसं वागायला हवं, सुनेने कसं वागायला हवं आणि नवऱ्याने कसं वागू नये हे आपल्या लक्षात येतं.

  सासूने सुनेला छळणे किंवा सुनेने सासूला छळणे हे जवळपास सर्वसाधारण आहे. यामध्ये आता फारसा रस नाही. आता जनतेचा रस आहे या दोघींच्यात भरडल्या जाणाऱ्या मुलाची मानसिकता जाणून घेण्यात.

  ‘बाईन मना जवाई देव माणूस शे
  सकायमा जल्दी उठस, पानी भरस
  बठ्ठा काम मा मदत करस मनी पोरले

  तुन्ही व्हऊ कशी शे?
  मनी व्हऊ भलतीच फज्जास शे
  मना पोऱ्याले सकायमा उठाउस
  पानी भराले लावस भलतं राबाडी घेस त्याले. '

  असा एक मेसेज व्हॉट्सअप वर आला. अहिराणी भाषा असली तरी त्यातला विनोद लक्षात येणं सहज शक्य आहे. कारण जरा इकडे तिकडे मान वळवली तरी हे चित्र सगळ्याच घरांत पहायला मिळेल.


  आपला तो ‘बाब्या' आणि दुसऱ्याचं ते ‘कारटं' हा अगदीच जनरल स्वभाव आहे. त्यात सुनेचं आणि सासूचं नातं तर एवढं चटकदार असतं की त्यावर आपल्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीने कित्येक वर्षांपासून आपल्या चुली पेटवल्या आहेत. मराठी सिनेमांनी तर या विषयांचा तर एकेकाळी रतीब लावला होता. सालस, दुःखी आणि आदर्श सून म्हणून अलका कुबल यांना ध्रुव ताऱ्यासारखं अढळ पद मिळालं आहे. एका न्यूज चॅनलने तर त्यांच्या मनोरंजनात्मक बातम्यांच्या सेक्शनला थेट ‘सास-बहू-साजिश' असंच नाव दिलंय. याचा अर्थ एन्टरटेनमेन्ट इंडस्ट्री मध्ये ‘सास-बहू-साजिश' शिवाय अजून काही पाहायला मिळू शकतं यावर त्यांचा विश्वासच नाहीये जणू.
  ‘संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच' अशी आपल्याकडे एक म्हण आहे. अहो पण भांडी व्यवस्थित आपापल्या जागी राहतील, दुसऱ्या भांड्याला त्याची स्वतःची जागा देतील तर आदळण्याचा संबंधच येणार नाही ना? पण तसं झालं तर तो संसार कसला? मुळात सर्वसाधारण कुटुंबांचं बारकाईने निरीक्षण केलं तर एक गोष्ट लक्षात येईल की, सुनेला त्या घराची पक्की सदस्य मानलंच जात नाही. ती बाहेरून आलेली मेंबर आहे, तिला आपण रहायला जागा देतोय, जेवणाची मुभा देतोय एवढं पुरेसं आहे. अगदी लग्न होऊन तीस वर्षे उलटून गेलेली असली तरी नवरा किंवा त्याच्या घरचे ‘चल निघ तुझ्या तुझ्या घरी' असं म्हणून मोकळे होतात. तिचं घर म्हणजे तिच्या आई-बापाचं घर? म्हणजे तिने या आताच्या घरासाठी काहीच योगदान दिलेलं नाहीये? तिला कोअर सदस्य मानणं एवढं अवघड कसं काय जात असेल? अनेकदा भांडणं झाली की सासरकडचे तिला माहेरी सोडून जातात किंवा माहेरच्यांना बोलावून घेतात आणि तिला घेऊन जा म्हणतात. ही काय पद्धत झाली? ती तुमची आश्रित नाहीये, तिचं तुमच्याशी अतूट नातं तयार झालंय, तुमच्या एवढाच तिचाही त्या घरावर अधिकार आहे. खरी मेख इथेच आहे की तिला मनापासून स्वीकारलं नाही, तिचं तुमच्याशी रक्ताचं नातं नाही. रक्ताची नाती तोडणं त्रासदायक आहे पण हे असं नातं जे फक्त दोघांच्या होकाराने तयार झालंय ते कधीही तुटून जाऊ शकतं, अगदी चार-दोन मुलं होऊनही. ती मुलं स्वतःजवळ ठेऊन घ्यायची आणि त्यांच्या आईला घराबाहेर काढून द्यायची. तेही जर मुलगी असेल तर सोबत तिला घेऊन जा म्हणायचं, कारण मुलगी म्हटलं की तिच्या लग्नाचा आणि हुंड्याच्या खर्चाची गणितं करून झालेली असतातच मनातल्या मनात.

  सासूने सुनेला छळणे किंवा सुनेने सासूला छळणे हे जवळपास सर्वसाधारण आहे.यामध्ये आता फारसा रस नाही. आता जनतेचा रस आहे या दोघींच्यात भरडल्या जाणाऱ्या मुलाची मानसिकता जाणून घेण्यात. बायकोची बाजू घ्यावी की आईची बाजू घ्यावी या द्वंद्वात अडकलेल्या त्या नवऱ्यात. एकीकडे तळ हाताच्या फोडाप्रमाणे लहानाचं मोठं केलेल्या आईची माया आणि दुसरीकडे स्वतःचं घरदार सोडून आपल्या भरवश्यावर आलेल्या बायकोचं प्रेम. मुळात सासू आणि सून दोघी एकमेकांच्या विरोधीपक्षात कशामुळे गेल्या याचं बेसिक कारण शोधायला हवं. जन्मभर ज्याला मायेने ममतेने वाढवला त्या मुलाच्या आयुष्यात सुनेच्या रूपात कुणी दुसरी स्त्री येते आणि तो तिच्यासोबत राहू लागतो, नकळतपणे तिच्या काही गोष्टी ऐकू लागतो, तिची काळजी करू लागतो हे त्या आईला कुठेतरी बोचू लागतं. आणि आता आपल्यासोबत लग्न झालंय. मी माझं सर्वस्व तुझ्यावर विश्वास टाकून अर्पण करत आहे मग आईचं काय ऐकायचं सतत? नुसता आईच्या पदराला धरून असतो ‘ममाज बॉय' कुठचा असं बायकोचं लॉजिक. मग हे भांडण दोघींच्या संस्कार, संस्कृती, चाली रीती, दैनंदिनी जीवनातल्या कामाच्या पद्धती या अशा वेगवेगळ्या गोष्टींतून बाहेर येऊ लागतात. या सर्व नोकझोकी मध्ये मुलाचा बिचाऱ्याचा फुटबॉल बनतो. ती म्हणते तुझ्या आईला समजावून सांग, आई म्हणते तिला नीट राहायचं तर राहा म्हणावं नाही तर निघ माहेरी. याला बायको सोडवत नाही आणि आईला सोडण्याची हिंमत नाही अशी अवस्था.

  एक मित्र स्वतःचा अनुभव सांगताना म्हणत होता, "हे बघ हा सासू सुनेच्या भांडणाचा राष्ट्रीय प्रश्न आहे. यावर तोडगा कधीच निघत नसतो. जेव्हा बायको आपल्याकडे आईची गाऱ्हाणी करते तेव्हा तिचं सर्व नीटनेटकं ऐकून घ्यायचं. अगदी मनोभावे मान डोलवायची. तिचं बोलणं पूर्ण होऊ पर्यंत अजिबात मध्ये बोलायचं नाही उलट मध्ये मध्ये सांत्वन केल्यासारखे हावभाव करायचे. ‘खरंय तुझंच’ असं म्हणत राहायचं. सर्व झालं की मग म्हणायचं ‘तू जे जे सांगितलं ते सर्व बरोबरच असणार, तू काही खोटं सांगू शकत नाहीस; मला एवढा विश्वास आहे तुझ्यावर. तू तुझ्याजागी बरोबरच होतीस. आई चुकीची आहे मलाही दिसतंय पण कसंय ना, कितीही चुकली तरी आई आहे गं ती माझी, तिला मी बोलू नाही शकत काही, तिला चुका दाखवल्या तर ती माझ्यावरच चिडेल. तू समजदार आहेस, मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे, माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. तू समजून घे. होईल सगळं नीट.’ हे असं केविलवाणं तोंड करून सांगितलं की बायको खुश होते, आपण मध्ये पडलो नाही म्हणून आई खुश होते. आपण आपलं सेफ राहतो' हे असं एवढं स्ट्रॅटेजिक राहणं सर्वानांच जमेल असं नाही. तेवढी समजदार बायको प्रत्येकाला मिळेल अशी शास्वती सुद्धा नाही. अशा वेळी काय? अशा वेळी आई आणि बायकोचं नातं घट्ट होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत हाच सर्वांग सुंदर चिरकाळ टिकणारा उपाय आहे. मुलापेक्षा आईचा सुनेकडे जास्त ओढा निर्माण व्हायला हवा एवढं सुनेने त्या सासूला आपलंस करून घ्यायला हवं. नाहीतर तू माझ्याशी लग्न केलंय आपण दोघेच एकमेकांसाठी पुरेसे आहोत, चला वेगळी चूल मांडू, असं म्हणणाऱ्या सुनाही कित्येक आहेत. कुटुंबातल्या कुठल्याही समस्येवर बोलण्यासाठी, स्वतःचं मत मांडण्यासाठी सर्वाना समान अधिकार असायला हवेत. नव्या काळात सिनेमा, सिरियल्स पेक्षा तरुणाईत वेब सिरीजची जास्त चलती आहे. त्यातून मनोरंजन होतंच पण दैनंदिन जीवनात उपयोगी पडेल असं काही मूल्य त्यातून फारसं मिळत नसणाऱ्या सिरीज जास्त ट्रेंडिंग आहेत. अशाच वेबच्या जंजाळात काहीशी झाकोळून गेलेली एक वेब सिरीज म्हणजे ‘व्हॉट द फॉक्स'. डायस मीडियाने बनवलेली ही हिंदी-इंग्रजी भाषेची सरमिसळ असलेली वेब सिरीज युट्युबवर उपलब्ध आहे. टिपिकल सास-बहू-साजिश पेक्षा ही बरीच हटके आहे. मुंबईसारख्या ठिकाणी सेटल होऊ पहात असलेल्या नव्या जोडप्याकडे मुलाचे आई-वडील आणि काही दिवसांत त्याची बहीण येऊन राहू लागतात तेव्हा त्या सुनेचा जॉब आणि सासू सासऱ्यांसमोर संस्कारी बहु दाखवण्यासाठी होत असलेली दमछाक आपल्याला दिसतो. आई-वडिलांच्या आवडी निवडी, त्यांच्या काही पद्धती आणि बायकोचा जॉब पाहून घर सांभाळण्यासाठी होत असलेली तारांबळ, असं सर्व नीट नेटकं जुळवून आणण्यासाठी मुलाने केलेले प्रयत्न पहायला मजा येते. विनोद, किस्से, काही ठिकाणी भांडण आणि कुठे कुठे भांडणात नकळतपणे बोलून गेलेली वाक्ये अशा सर्वानी कथा पुढे पुढे सरकत जाते. ही सिरीज जेव्हा आपण पाहतो तेव्हा सरतेशेवटी सासूने कसं वागायला हवं, सुनेने कसं वागायला हवं आणि नवऱ्याने कसं वागू नये हे आपल्या लक्षात येतं. भारतीय कुटुंब व्यवस्था आता जॉईंट फॅमिली कडून चौकोनी कुटुंबाकडे आलीय आता हळूहळू दुहेरी होऊ लागलीय. अशा या बदलत्या काळात नाती टिकवून ठेवण्यासाठी या अशा काही सिरीजची खरोखर गरज आहे. नाहीतर प्रेक्षक म्हणून आणि एक भारतीय कुटुंबाचा सदस्य म्हणून आपण सास-बहू-साजिश मध्येच गुरफटलो जाऊ. मग जगण्याचा आनंद घ्यायचा कधी?

  महेशकुमार मुंजाळे
  [email protected]

  लेखकाचा संपर्क : ८३०८६३९३७७

Trending