आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणसातल्या जनावराशी झुंज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेशकुमार मुंजाळे

'जल्लीकट्टू' तामिळनाडूमधला पारंपरिक खेळ, ज्यात रेड्याची आणि माणसाची झुंज असते. पण हा चित्रपट घडतोय केरळमध्ये, इथे "जल्लीकट्टू' खेळला जात नाही. वरवर ही त्या रेड्याची आणि सगळ्या गावाची झुंज दिसेल. पण ही झुंज आहे त्या प्रत्येक व्यक्तीची आणि त्यात छुप्या पद्धतीने पोसत आलेल्या हिंसक जनावराची. "अंगमली डायरीज' या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेल्या "लिजो जोस पेलीसरी' नावाच्या दिग्दर्शकाने घडवलेला सिनेमा म्हणजे "जल्लीकट्टू'. 


एक बैल, सगळा गाव. गावाचं उघड समाजकारण आणि छुपं राजकारण. हे आपण "उमेश कुलकर्णी' दिग्दर्शित "वळू' या चित्रपटात पाहिलंय. "विहीर' सारखा गंभीर आशयाचा दर्जेदार चित्रपट मराठी माणसाला समजला नाही. त्याच मराठी माणसाला व्यंगात्मक पद्धतीने आरसा दाखवत "वळू' आणि "देऊळ' सारखे चित्रपट निर्माण करून उमेश कुलकर्णीने एक प्रकारे स्वतःचा राग व्यक्त केला. हे असं दात काढत आपण स्वतःच स्वतःला पाहतोय आणि स्वतःवरच हसतोय हे आपल्या लक्षातही आलं नाही. याच "वळू' चित्रपटाची जणू गंभीर आवृत्ती मल्याळम सिनेमातून दाखल झाली आहे. "अंगमली डायरीज' या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेल्या "लिजो जोस पेलीसरी' नावाच्या दिग्दर्शकाने आणि "एस हरीश' व "आर जयकुमार' या पटकथा लेखक जोडगोळीने घडवलेला सिनेमा म्हणजे "जल्लीकट्टू'. विशेष प्रासंगिकता म्हणजे नुकत्याच गोव्यात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, "इफ्फी' मध्ये पेलीसरी यांना "जल्लीकट्टू' करिता सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

वार्के आणि अँटनी दोघे मिळून एक कसाईखाना चालवत आहेत. तिथे महिषीवंशाच्या मांसाची विक्री होते. एका रात्री त्यांचा एक रेडा त्या कसाईखान्यातून पळून जातो. तो गावांत, घरांत, बँकेत, शेतात सर्वत्र धुडगूस घालून मोकळा होतो. त्याला पकडण्यासाठी जवळपास सगळं गाव त्याच्या मागे लागलेलं दिसू लागतं. या सगळ्या गोंधळात कुट्टाचान नावाचा इसम तिथे दाखल होतो. शिकारीच्या बंदुकीने तो रेड्याला संपवणार म्हणून त्याचा उदोउदो करत एक गट त्याच्यामागे जातो तर व्यवस्थित नियोजनबद्ध सापळा रचणाऱ्या अँटनीमागे काही जण जातात. या कुट्टाचान आणि अँटनीचं जुनं वैर असल्याने ते या रेड्याच्या मागे लागता लागता स्वतःची वैयक्तिक खुन्नस काढण्याच्या विचारात संपूर्ण चित्रपटभर एकमेकांचा जीव घेण्यासाठी पळताना दिसतात.

एक साधा रेडा जो कसाईखान्यातून पळून गेलाय. होऊन होऊन काय होईल तर त्या कसाईखान्याच्या मालकाचं आर्थिक नुकसान होईल. रेडा कुठेतरी मोकाट फिरेल. पण स्वतःची मर्दानगी दाखवण्यासाठी, कुणाला फुकटचं मांस खायचंय यासाठी तर कुणाला वैयक्तिक हेवेदावे उकरून काढण्याची नामी संधी आहे यासाठी सगळं गाव त्या रेड्यामागे लागलं आहे. तो रेडासुद्धा एवढी जनता आपल्या मागे लागलेली पाहून बिथरून सैरभैर पळत सुटलाय. यामध्ये अनेकांच्या घराचं, दुकानाचं, शेताचं नुकसान होत आहे. या विध्वंसामुळे त्रासलेला मालकसुद्धा त्या रेड्यामागे पळताना दिसू लागतोय. अशी एका रेड्याची आणि सगळ्या गावातल्या वेड्यांची कहाणी म्हणजे हा जल्लीकट्टू चित्रपट.

जबरदस्त दृश्यात्मकता, प्रचंड विश्वासार्ह अभिनय, अगदी श्वासोच्छ‌्वास आणि घड्याळाची टिकटिक ऐकू येईल एवढ्या बारकाव्यांचे साउंड डिझाइन असलेल्या चित्रपटाची कथा वरवर पाहता अगदीच सामान्य दिसेल; पण या रेड्याला पकडताना गावाच्या ज्या विविध छटा दिसू लागतात त्या पाहताना कधी हसू येईल, कधी आश्चर्य वाटेल तर कधी भीती. रेड्याच्या मागे व्यग्र झालेलं गाव आणि त्या संधीचं सोनं करत पळून जाण्याचा प्रयत्न करणारं जोडपं, मुलीचं लग्न ठरवणारा बाप, खाणं आणि पिणं एवढच आयुष्य मानत रेड्यापेक्षा जास्त हैदोस घालणारा गुंड कंपू आणि रेडा काबूत येऊ शकत नाही, नुकसान होतंय याचं खापर पोलिसांवर फोडत त्यांची जीप पेटवून दिलेला बुद्धिहीन जमाव. प्रत्येक प्रसंग माणसाच्या आतलं जनावर बाहेर काढू पाहतोय. त्या जनावराच्या विविध छटा दाखवू पाहतोय.

चित्रपटात एक फार मजेशीर प्रसंग आहे. पॉल नावाचा एक म्हातारा एका मडक्यात गाईचं मूत्र गोळा करत आहे. तेवढ्यात रेड्यामागे लागलेले काही लोक त्याच्याजवळून पळू लागतात. स्वतः लावलेल्या औषधी वनस्पती तुडवत हे लोक पळताना पाहून पॉल त्यांची विनवणी करू लागतो. रेडा पलायनाची सर्व हकीकत ऐकून पॉल त्यांना अतिशय सात्त्विक सल्ला देऊ पाहतो, "मित्रांनो, त्या मुक्या जनावराला त्रास देऊ नका. मनुष्याप्रमाणे त्याचाही या विश्वावर तेवढाच अधिकार आहे.' यावर त्या झुंडीतील एक जण "तुला आम्ही माणसं मरू लागल्यावर कळवळा नाही येत, त्या राक्षसी रेड्याचा कळवळा येतोय' असे विचारून शिव्या देऊ लागतो. तेवढ्यात तो सात्त्विक पॉल त्याला समजावतो आणि 'शिव्या देऊ नये, वातावरण दूषित होईल' असा आगाऊ सल्ला देऊ पाहतो. तेवढ्यात पॉलच्या रानातून रेडा पळताना दिसतो, त्याच्या समोरच मोठमोठी केळीची झाडं रेडा धडाधड जमीनदोस्त करत पुढे पळू लागतो. हे पाहून उद्विग्न पॉल सर्व सात्त्विकता विसरून ठेवणीतल्या सगळ्या शिव्यांची थैली रिती करू लागतो. त्याचा तो आकांत पाहून मघाचा इसम पुढे येतो आणि म्हणतो 'पॉल, शिव्या देऊ नये, वातावरण दूषित होईल'. हे ऐकून सगळा जमाव जोरजोरात हसू लागतो. या प्रसंगातून दिग्दर्शकाने अतिशय मार्मिक पद्धतीने सात्त्विकतेचा नारा देणाऱ्या "गोप्रेमी लिंचर्सना' शालजोडीतून मारण्याचा प्रयत्न केलाय. 

माणूस  हा प्राणीच आहे जन्मजात. नागरीकरणाच्या नावाखाली त्याला बऱ्याच गोष्टी शिकवल्या गेल्या आहेत. खरे बोलणे, आदर करणे, व्यवस्थित जेवण करणे, अहिंसक असणे, चोरी न करणे या सर्व गोष्टी वरवरच्या आहेत. हे मूल्य शिक्षण माणसाचा अंतरिम भाव नक्कीच नाही. तो कुठल्याही एखाद्या जनावरासारखाच हिंसक आणि स्वार्थी आहे. "साम-दाम-दंड-भेद' या गोष्टी काय आहेत आणि त्या कशा वापराव्या हे कुठल्या शाळेत शिकण्याची गरज नाही, ते उपजतच अवगत झालेलं आहे. कुठल्याही थराला जाऊन "स्वतःला' आणि "स्व'ला जगवणं हेच अंतिम सत्य आहे. याच गोष्टी सातत्याने उद‌्धृत करत हा सिनेमा पुढे पुढे सरकताना दिसतो.

काळ्याकुट्ट अंधारात, घनदाट जंगलात माणसाच्या मनातली प्रत्येक काळी बाजू एवढी त्वेषाने समोर येतेय की चित्रपट पाहणारा अतिसंवेदनशील असेल तर हादरून जाईल. जमावाला स्वतःची अक्कल नसते, त्यांना खरं-खोटं, योग्य-अयोग्य यातला फरक समजत नसतो असं म्हणतात. कारसेवक बनत त्वेषाने बाबरी पाडण्यासाठी गेलेले कित्येक लोक आता त्या वागण्याचा पश्चात्ताप करताना दिसतात. हा पश्चात्ताप व्यक्त करण्याची संधी सर्वांनाच मिळते असं नाही, त्या जमावाच्या हिंसक ज्वालांत आपण कधी होरपळून मेलोय हे स्वतःलाही लक्षात येणार नाही एवढा त्या जमावाच्या धगीचा जोरदार प्रवाह असतो. "जल्लीकट्टू' तामिळनाडूमधला पारंपरिक खेळ, ज्यात रेड्याची आणि माणसाची झुंज असते. पण हा चित्रपट घडतोय केरळमध्ये, इथे "जल्लीकट्टू' खेळला जात नाही. वरवर ही त्या रेड्याची आणि सगळ्या गावाची झुंज दिसेल. पण ही झुंज आहे त्या प्रत्येक व्यक्तीची आणि त्यात छुप्या पद्धतीने पोसत आलेल्या हिंसक जनावराची. रेडा पळालाय आणि तो धुडगूस घालतोय म्हणून त्याला पकडण्याची मोहीम सगळं गाव राबवतंय हे केवळ निमित्त आहे. यात स्वतःचा प्रत्येक प्रकारचा स्वार्थ शमवून घेणं हा खरा उद्देश आहे. गर्दीगर्दीत कुणी दुकानातून चटकन चिप्सची पाकिटं पळवत आहे तर कुणी संधीचा फायदा उचलत ज्या स्त्रीने कधीच भाव दिला नाही तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. 

या सर्व गोष्टी चित्रपटात आहेत म्हणून काल्पनिक वाटू शकतात कदाचित. अशा वेळी युद्धाच्या, दंगलीच्या, खळखट्याक आंदोलनांच्या न सांगितलेल्या गोष्टी ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग दिसू लागतील खरे आदिमानव, जे आजही चकचकीत इस्त्री केलेले कपडे घालून आपल्यात फिरत आहेत. हेच लोक जे गुजरात दंगलीत, मुंबई बॉम्बस्फोटात, भारत-पाक युद्धात, काश्मीरच्या आंदोलनात, फेरीवाल्या यूपी-बिहारींच्या विरोधातील मोर्चांत छुप्या पद्धतीने घुसून जोर-जबरदस्ती लूटमार-बलात्कार करून आज राष्ट्रप्रेमाची गाणी गात आहेत. या अशा लोकांना खराखुरा आरसा दाखवणारा, माणसातलं जनावर दाखवून त्याच्याशीच झुंज लावून देणारा "जल्लीकट्टू' घडणं येत्या कट्टरवादी काळाची गरज आहे. मग निमित्त रेडा असो की वळू. भाषा मराठी असो किंवा मल्याळम. माणूस जनावर न होता माणूस राहण्यासाठी केलेला प्रत्येक छोटा प्रयत्नसुद्धा स्वागतार्हच.

महेशकुमार मुंजाळे
maheshmunjale@gmail.com
लेखकाचा संपर्क : ८३०८६३९३७७
 

बातम्या आणखी आहेत...